गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (17:11 IST)

हेलिकॉप्टर क्रॅशचा भीषण व्हिडीओ

तामिळनाडूच्या कुन्नुर या ठिकाणी लष्कराच्या हेलकॉप्टरला अपघात झाला, या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत हे होते असं भारतीय वायूसेनेने सांगितले आहे.
 
या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. त्यांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे. तामीळनाडूचे मंत्री रामचंद्रन यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर ही माहिती दिली.
 
रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या असं सांगितलं जात आहे.
 
स्थानिक सैन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्थानिकांनी 80 टक्के भाजलेल्या दोन व्यक्तींचे देह रुग्णालयात पोहोचवल्याचे सांगण्याच येत आहे. काही देह पर्वताच्या उतारावर पडल्याचे दिसून येत आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचे व ओळख पटवण्याचे काम सुरू आहे असं एएनआयच्या सूत्रांनी सांगितले आहे.
घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं वायूसेनेने स्पष्ट केलं आहे.
हेलिकॉप्टर क्रॅशचा भीषण व्हिडीओ समोर आला आहे. हे बघून अपघात किती भयंकर असेल याचा अंदाज लागत आहे.
 
हेलिकॉप्टर क्रॅश तामिळनाडूमधील नीलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये झालं. हेलिकॉप्टर सुलुर आर्मी बेसवरून निघालं होतं. जनरल रावत यांना घेऊन हे हेलिकॉप्टप वेलिंग्टन लष्करी छावणीच्या दिशेने जात होतं.

जनरल रावत हे एक जानेवारी 2020 मध्ये देशाचे पहिले चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
 
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संसदेत लवकरच यासंबंधी माहिती देणार असल्याचं समजतं. ऑल इंडिया रेडिओने यासंदर्भात ट्वीटरवरुन माहिती दिली आहे.
 
राजनाथ सिंह यांनी काही वेळापूर्वी जनरल रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांचीही भेट घेतली.