गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (22:28 IST)

नरेंद्र मोदींची कोरोनासंदर्भात मोठी घोषणा, 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण

नव्या वर्षात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. शनिवारी रात्री देशाला संबोधित करताना त्यांनी यासंदर्भात घोषणा केली.
 
जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.
 
शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची, पालकांची चिंता कमी होण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 
सरकारने हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्करसाठी लशीचा प्रिकॉशन डोस देण्यात येईल. याची सुरुवात 10 जानेवारीपासून होईल.
 
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
"भारताने आतापर्यंत 141 कोटी लशीचे डोस दिलेत. घाबरून जाऊ नका, मास्क परिधान करा, नियम पाळा", असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
 
"लसीकरण हे कोरोना लढाईतलं मोठं अस्त्र आहे. 18 लाख आयसोलेशन बेड्स आहेत. 5 लाख ऑक्सिजन पुरवठा असलेले बेड्स आहेत. आयसीयू आणि नॉन आयसीयू मिळून लहान मुलांसाठीही स्वतंत्र बेड्स आहेत", असं पंतप्रधानांनी सांगितलं.
 
"देशात 3000 हून अधिक ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत", असं त्यांनी पुढे सांगितलं.
 
देशातील आरोग्य सेवकांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस 10 जानेवारी 2022 पासून देण्यात येईल. सहव्याधी असलेल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्यात येईल. लवकरच नाकावाटे लस तसंच डीएनए लसही लवकरच उपलब्ध होईल असं पंतप्रधान म्हणाले
 
देशात आतापर्यंत कोरोना लशीचे 141 कोटी डोस देण्यात आल्याची माहिती यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिली.
 
कोरोनाची देशातील सद्यस्थिती काय?
भारतात डेल्टा व्हेरियंट आणि त्याच्या उपप्रकारांनी बाधित लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येतेय.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात सद्य स्थितीत कोव्हिड-19 ने संक्रमित 78 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
बुधवारी (22 डिसेंबरला) देशभरात 7 हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. आधीच्या दिवसाच्या तुलनेत या संख्येत 18 टक्क्यांनी वाढ झालीये.
 
सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आढळले. तर महाराष्ट्रात तब्बल 48 दिवसांनंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1201 नोंदवण्यात आलीये. तर, मुंबईत 490 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसंच दिल्लीत 125 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
 
केंद्र सरकारची सूचना
केंद्र सरकारनेही ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या पाहता काही राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत.
 
केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सर्व राज्यांच्या सरकारला पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंट धोकादायक असून सरकारने खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावं अशी सूचना केली आहे.
 
राज्यांनी स्थानिक पातळीवर पॉझिटिव्हिटी रेट आणि ओमिक्रॉन रुग्णसंख्या वाढत असल्यास तात्काळ निर्णय घ्यावे.
 
लोकांची गर्दी होणार नाही हे पहाणं, कंटेनमेंट झोन तातडीने जाहीर करणं, संपर्कातील लोकांना शोधणं अशा प्रक्रिया वेगाने राबवाव्या असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.