पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे काही दिवसांपूर्वीच अमेरिकेवरुन उपचार करून आले मात्र आता त्यांना अपचनाचा त्रास जाणवू लागल्याने ते पुन्हा उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार आहेत. पर्रिकर बुधवारी अमेरिकेला रवाना होणार आहेत. त्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर ही नेते मंडळी लीलावती मध्ये जाऊन पर्रिकर यांची भेट घेणार आहेत. पर्रिकर हे 22 ऑगस्ट रोजी अमेरिकेहून अकरा दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही. दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजप नेत्यांकडून हाती घेतला व ते लोकांच्या गर्दीत सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.