शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (08:24 IST)

खळबळजनक आरोप, ठाकरे कुटुंबियांचे आणि अन्वय नाईक यांचे आर्थिक संबंध

पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केलेले अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात संयुक्तरित्या जमिनीचे व्यवहार केले असल्याबाबतची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. हे व्यवहार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत असल्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. किरीट सोमैय्या यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ.सोमैय्या यांनी ही माहिती दिली. या संदर्भात डॉ. सोमैय्या यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांना पत्र पाठवले आहे. या पत्राची प्रत रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकानांही पाठवण्यात आली आहे.
 
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षता अन्वय नाईक, आज्ञा अन्वय नाईक, रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी एकत्रित जमीन खरेदी केल्याची कागदपत्रे डॉ.सोमैय्या यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठवली आहेत.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आणि अन्वय नाईक यांचे आर्थिक व अन्य कोणत्या प्रकारचे संबंध होते याचा खुलासा होण्याची गरज आहे. रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील ९ जमीन व्यवहारांचे सात बारा उतारे आम्ही सादर केले आहेत. त्याच बरोबर ठाकरे परिवाराचे आणखी कोणा कोणाबरोबर अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार आहेत हेही जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्यात असलेल्या आर्थिक व्यवहारांची माहितीही जाहीर होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात खुलासा करावा, अशी आमची मागणी आहे, असेही डॉ. सोमैय्या यांनी नमूद केले.