शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (10:57 IST)

इंजिनिअर युवतीची जाळून हत्या, एकतर्फी प्रेम करणाऱ्या ट्रान्स पुरुषाशी जोडलेले गुन्ह्याचे धागेदोरे

murder
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनिअर तरुणीच्या हत्येचं प्रकरण समोर आलं आहे.
या तरुणीची ओळख पटविण्यात आली असून तिचं नाव नंदिनी आहे. ती मदुराई जिल्ह्यातील होती.
चेन्नईमधील आयटी कॉरिडोरच्या जवळ पोनमर भागात शनिवारी (23 डिसेंबर) रात्री नंदिनी जळालेल्या अवस्थेत मिळाली होती. तिचे हात-पाय बांधलेले होते. रविवारी (24 डिसेंबर) सकाळी तिचा मृत्यू झाला.
 
या घृणास्पद गुन्ह्यासाठी नंदिनीचा माजी प्रियकर वेट्रीमारन कथितरित्या जबाबदार असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
 
वेट्रीमारन नंदिनीच्या शाळेतील मैत्रीण होती आणि तेव्हापासून तिच्यावर प्रेम करत होती. नंतर ती ट्रान्स पुरूष (लिंग बदल शस्त्रक्रिया करून) बनली.
 
या घटनेबद्दल जी माहिती समोर आली आहे, त्यामध्ये एकतर्फी प्रेम, ईर्ष्या आणि शेवटी एका भयानक गुन्ह्याची गोष्ट कळते.
 
ही घटना सर्वांसाठीच धक्कादायक आहे.
 
नेमकं काय झालं?
नंदिनी व्यवसायाने एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होती आणि थोरईपक्कम भागात एका खाजगी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होती.
 
गेल्या आठ महिन्यांपासून ती चेन्नईमध्ये राहात होती.
 
स्थानिक रहिवाशांना नंदिनी एका सामसूम भागामध्ये जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यांनी तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवलं. मात्र, खूप जास्त भाजल्यामुळे तिला वाचवण्यात यश आलं नाही.
हत्येच्या तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून एक सेलफोन मिळाला. त्यानंतर या गुन्ह्याच्या मुख्य आरोपीची ओळख वेत्रीमारन असल्याचं समोर आलं.
 
शाळेमध्ये असताना वेट्रीमारन पंडी महेश्वरी (एक मुलगी) होता. शाळेत नंदिनी आणि महेश्वरीची चांगली मैत्री असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
 
शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी पंडेश्वरीने लिंग बदल शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर ट्रान्स पुरुष बनली. तिने आपलं नाव बदलून वेट्रीमारन केलं.
 
तपासात कोणत्या गोष्टी समोर आल्या?
वेट्रीमारनच्या चौकशीनंतर या हत्याकांडाचा उद्देश समोर आला.
 
पोलिसांच्या मते, तो आणि नंदिनी एकेकाळी प्रेमात असल्याचं वेट्रीमारन याने मान्य केलं होतं.
 
पण नंदिनी आपल्यापासून दूर जात आहे आणि इतर काही जणांसोबत तिची जवळीक वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांचे संबंध बिघडायला लागले.
 
प्रेमातील असुरक्षितता आणि ईर्ष्या यांमुळे त्याने नंदिनीची हत्या करण्याची योजना आखली.
 
नंदिनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेट्रीमारन तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. तिचे हात-पायही बांधले होते. त्यानंतर त्याने हे क्रूरकर्म केलं.
 
पहिल्यांदा त्याने नंदिनीवर धारदार हत्यारानं वार केले आणि मग नंतर तिच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. यानंतर तो घटनास्थळावरून तो पळून गेला.
 
पोलिसांनी वेत्रीमारनला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात अटकेचा गुन्हा दाखल केला आहे.
 
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
 
महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या दुःखद घटनेनं महिलांची सुरक्षा आणि नाकारल्यानंतर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.
 
स्त्रीवादी कार्यकर्त्या निवेदिता लुईस यांचं म्हणणं आहे की, "पितृसत्ताक मानसिकतेमध्ये महिलांना आपली इच्छा व्यक्त केल्यावर, आपल्या अधिकारांबद्दल आग्रही राहिल्याबद्दल धमक्यांना सामोरं जावं लागतं, अनेकदा त्याच्या हिंसक प्रतिक्रियाही उमटतात."
 
निवेदिता लुईस सांगता की, "महिलांना जेव्हा जेव्हा आर्थिक स्वातंत्र्य आणि आपल्या इच्छ व्यक्त करण्याचं बळ मिळतं, तेव्हा-तेव्हा हा पितृसत्ताक व्यवस्थेसाठी धक्का समजला जातो."
 
त्या सांगतात, "स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी पुरुष हिंसाचाराचा आधार घेत स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात. नंदिनी आणि वेत्रीमारनशी संबंधित ही घटना विखारी पुरुषत्वाचे परिणाम आणि एकतर्फी प्रेमाची काळी बाजू समोर आणणारं उदाहरण आहे," लुईस सांगतात.
 
Published By- Priya Dixit