गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019 (13:05 IST)

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना बसने चिरडले

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना भरधाव बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास झाला असल्याचे म्हटले आहे.
 
नरौरा गंगाघाटवर ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. मृतांमध्ये चार महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व भाविक वैष्णवदेवीचे दर्शन घेऊन गंगास्नान करण्यासाठी हाथरस येथून नरौरा येथे आले होते. पहाटे 4 च्या सुमारास थकलेले काही भाविक रस्त्याच्या कडेला झोपले होते. त्याचवेळी भरधाव बसने त्यांना चिरडल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अपघातानंतर बस चालक घटनास्थळावर बस सोडून फारार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु असून आरोपी बसचालकाचा शोध घेत आहेत.