गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जुलै 2024 (15:55 IST)

200 वर्षं जुनी टोपी झाली ऑलिंपिकचं बोधचिन्ह

paris olympics
पॅरिस 2024 हे इतर ऑलिंपिक्स आतापर्यंत झालेल्या ऑलिंपिकपेक्षा वेगळं होण्याची शक्यता आहे.पहिल्यांदाच या स्पर्धेत कोणताही लिंगभाव न बाळगता लोकांना खेळायची संधी मिळणार आहे.

या ऑलिम्पिकचा मॅस्कॉट - म्हणजे बोधचिन्ह अगदी सहज ओळखता यावं अशी आयोजकांची इच्छा होती. आणि त्यामुळे 33 व्या ऑलिंपिक स्पर्धेत परंपरेला छेद देण्यात आला आहे.एखादा प्राणी, व्यक्ती किंवा यजमान देशातील एखादी व्यक्ती यांच्यापेक्षा देशभरात माहिती असणारी एक ऐतिहासिक टोपी ऑलिंपिकचा मॅस्कॉट म्हणून तयार केली आहे.

Phryges हे या ऐतिहासिक टोपीचं नाव. या फ्रेंच शब्दाचा उच्चार Fri-jee-uhs - फ्रीज्ह/ फ्रीज असा केला जातो. ही टोपी फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यानचं स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. (मे 1789 ते नोव्हेंबर 1799)
ही टोपी म्हणजे एक कोनासारखी आहे. त्याचा वरचा भाग समोर झुकला आहे. टोपीला हात आहेत ज्यामध्ये फ्रान्सचा लाल, पांढरा आणि निळ्या रंगाचा तिरंगा धरता येऊ शकतो.

खेळ आपलं आयुष्य बदलू शकतात आणि या ऑलिंपिकमुळे खेळाच्या जगात क्रांती होईल असा विश्वास असल्याने या चिन्हाची निवड केल्याचं आयोजकांनी म्हटलंय.पॅरालिंपिकचा लोगो सर्वसमावेश करण्यासाठी अशीच एक टोपी डिझाईन करण्यात आलीय जिला पायाच्या जागी रनिंग ब्लेडचा प्रॉस्थेटिक म्हणजेच कृत्रिम पाय आहे.
 
यावेळच्या ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिकचं घोषवाक्य आहे - "Alone we go faster, but together we go further." म्हणजेच आपण एकट्याने वेगाने जाऊ शकतो, पण सगळे एकत्र गेलो तर अधिक पल्ला पार करू शकतो.
 
टोनी एस्ताँग्युएट हे तीन वेळा ऑलिंपिक पदकं जिंकणारे माजी अॅथलिट या पॅरिस ऑलिंपिक 2024 समितीचे अध्यक्ष आहेत. ते सांगतात, " मॅस्कॉट म्हणून एखाद्या प्राण्याऐवजी आणि द्योतकाची निवड केली. आम्ही फ्रिजिअन टोपीची निवड केली कारण ही फ्रेंच सार्वभौमत्व सांगणारी महत्त्वाची खूण आहे. फ्रेंच लोकांसाठी ही टोपी त्यांच्या स्वातंत्र्याचं द्योतक आहे आणि ही टोपी सर्वांना माहिती आहे."
पण या टोपीचा उगम खूप पूर्वीचा आहे.
 
एक प्राचीन प्रतीक
फ्रिजिअन टोपीचं नाव फ्रिजिया या मध्य पश्चिम अॅनातोलियामधील एका पुरातन खेडं असलेल्या फ्रिजिया या नावावरून आलं आहे.
ग्रीक लोकांनी एका समुदायाला फ्रिजिस असं नाव दिलं होतं. हिटाईटचा (Hittite) अस्त (इसपू 12 ) आणि लिडियाचा उदय (इसपू7) या दरम्यान ते अँटोलियावर त्यांचा प्रभाव होता. अशी माहिती ब्रिटानिका एन्सायक्लोपेडियामध्ये दिली आहे.
मात्र रोमन साम्राज्यातील काही भागात अशाच एका टोपीला पायलिअस (Pileus) असं म्हणत.
 
ज्या शेतकऱ्यांची आणि गुलामांची त्यांच्या मालकांनी मुक्तता केली आहे. ते लोक ही टोपी घालायचे, असं इतिहासकार सर्जिओ संचेझ कोलॅन्टेस म्हणतात. ते स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ बुरगोस मध्ये काम करतात.
एका विशेष समारंभामध्ये दंडाधिकारी (Magistrate) गुलामाला एका दांड्याने स्पर्श करत आणि त्याची मुक्तता जाहीर करत. त्यानंतर त्यांच्या डोक्याचे केस भादरून डोकं टोपीने झाकलं जाई. एका नवीन सामाजिक ओळखीचं ते प्रतीक होतं.
 
इतिहासातील पुस्तकांत याबद्दलचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. ज्युलिअस सीझरच्या मारेकऱ्यांना The Liberators म्हटलं जातं. हे लिबरेटर्स त्यांचे रक्ताळलेले खंजीर घेऊन रस्त्यांतून मिरवत गेले तेव्हा त्यांच्याकडे एका भाल्याच्या टोकावर ही गुलामगिरीतून मुक्तता झालेल्यांची टोपी अडकवलेली होती.
 
इतिहासातील गोंधळ
स्पेनकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या डच लढ्यादरम्यान 17 व्या शतकात ही टोपी पुन्हा चर्चेत आल्याचं इतिहासकार जे. डेव्हिड हार्डर यांनी 'लिबर्टी कॅप्स अँड लिबर्टी ट्रीज' या त्यांच्या पुस्तकात नोंदवून ठेवलं आहे.
 
डच लोकांनी ही टोपी अमेरिकन क्रांतीकारकांसाठी स्वीकारली. या क्रांतिकारकांनी दक्षिणेतील 11 राज्यं यूएस युनियनमधून वगळली. त्यामुळे नागरी युद्धाला - Civil Warला सुरुवात झाली.
आजही ही टोपी अमेरिकन सैन्याच्या अधिकृत ध्वजावर आणि अमेरिकन सिनेटच्या Coat of Arms वर- चिन्हावर आढळते.
 
फ्रान्समध्ये ही टोपी कशी आली?
मग ही टोपी फ्रान्समध्ये कशी पोहोचली?
मध्ययुगात भूमध्य सागरातील खलाशी आणि शेतकऱ्यांनी यासारखी दिसणारीच एक टोपी घालायचे अशी नोंद फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर आहे
 
Marianne - Ministry for Europe and Foreign Affairs (diplomatie.gouv.fr).
मात्र 18 व्या शतकाच्या शेवटी फ्रेंच राज्यक्रांतीच्या नेत्यांनी ही टोपी त्यांच्या बोधचिन्हावर घेतली आणि स्वातंत्र्य दर्शवणारी टोपी यापेक्षा तिची ओळख अधिक व्यापक झाली. कालानुरूप याचं महत्त्वं आणि अर्थ बदलल्याचं सँचेझ कोलान्तेस सांगतात. ते म्हणतात, "क्रांतीदरम्यानच्या एका टप्प्यानंतर ही टोपी हे प्रजासत्ताकाचं द्योतक बनली."
 
14 जुलै 1789 ला पॅरिसमधल्या बॅस्टील (Bastille) किल्ल्यावर हल्ला झाला आणि फ्रान्समध्ये सोळाव्या लुईसच्या सत्तेचा अस्त झाला. यावेळी टोपीचं हे चिन्हं इतिहासात आणखी ठसलं.आता ही टोपी कलाकृती, नाणी, आणि स्टँम्पवर स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून नांदते. फ्रान्समध्ये विविध टाऊन हॉल आणि संस्थांमध्ये लागलेल्या चिन्हांमध्ये त्याचा समावेश असतो.
 
पुन्हा अटलांटिक समुद्रापार
मात्र फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराने अमेरिकेच्या स्थापनेच्यावेळी या टोपीने लोकप्रियता गमावली. या नवोदित प्रजासत्ताक देशाने 4 जुलै 1776 ला ब्रिटिश साम्राज्याकडून स्वातंत्र्य मिळवल्याचं जाहीर केलं होतं.
 
कोलॅरोडो विद्यापीठातील इतिहासकार अँड्र्यूज डेच यांनी स्मिथसोनिअन म्युझियम मॅगझीनला सांगितलं की, “ही टोपी जहालमतवादाचं प्रतीक झालं. त्याची 18 व्या शतकातील अमेरिकन नेत्यांना भीती वाटत होती.”
त्यानंतर ही टोपी 19 व्या शतकात अटलांटिक भागात पोहोचली. लॅटिन अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांनी ही टोपी घातली.
 
“ अनेक देशांमध्ये ओळखलं जाणारं हे प्रतीक अमेरिका खंडातल्या देशांमध्येही पोहोचलं. क्युबा आणि अर्जेंटिनासारख्या देशांच्या चिन्हशास्त्रात (Iconography) आणि अधिकृत चिन्हांमध्ये ते आजही अस्तित्वात आहे,’ असे सँजेझ कोलांतेस म्हणतात.आता बोलिव्हिया, कोलंबिया, एल साल्वाडोर, हैती आणि निकाराग्वा या देशांच्या राष्ट्रीय ध्वजावर किंवा Coat of Arms वर या टोपीला कायमची जागा देण्यात आलीय.
 
ऑलिंपिकचे मॅस्कॉट
1968 मध्ये मेक्सिकोमध्ये झालेल्या स्पर्धेत वापरलेला आक्रमक पवित्र्यातला लाल जॅग्वार हा पहिला ऑलिंपिक मॅस्कॉट होता. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत झालेल्या 27 ऑलिंपिक खेळांमध्ये मॅस्कॉट म्हणून अनेक प्राणी होते.

परंतु 1996 मध्ये अमेरिकेच्या अटलांटा शहरात झालेल्या शतक महोत्सवी खेळांमध्ये, आयोजकांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वादग्रस्त आणि संगणक निर्मित इझी (Izzy) हा त्या वेळेच्या सर्व उदयोन्मुख तंत्रज्ञानाचं प्रतीक म्हणून निवडला.
 
पण कदाचित सर्वात जास्त लक्षात राहिलेला मॅस्कॉट म्हणजे मिशा हा अस्वल होता. तो 1980 च्या मॉस्को ऑलिंपिक खेळांचा चेहरा होता. समारोप समारंभात खेळाडूंना निरोप देताना, शेकडो लोकांनी त्याच्या रडणाऱ्या चेहऱ्याचा एक मोठा कोलाज तयार केला होता.
 
मग फ्रेंच फ्रिजला ही प्रतिष्ठा मिळेल का? मिळेलही कदाचित. स्वातंत्र्य, समता बंधुता (Liberté, Égalité, Fraternité) या तत्त्वांची आठवण करून देणारा हा मॅस्कॉट कदाचित सर्वांत लोकप्रिय मॅस्कॉट होऊ शकतो.
Published By- Priya Dixit