गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 24 एप्रिल 2021 (22:03 IST)

वाकड, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, पिंपळेनिलखमधील 91 सोसायट्या सील, 550 कंटेन्मेंट झोन

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कंटेन्मेंट झोन वाढत आहे. शहरात 354 मेजर, तर 2 हजार 17 मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. यामध्ये महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. या भागातील 91 गृहनिर्माण सोसायट्या सील केल्या असून 550 मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे.
 
कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाइन करून कंटेन्मेंट झोन जाहीर केले जात आहेत. मात्र, रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत. या भागात दिवसाला चारशे ते साडेचारशे नवीन रुग्ण आढळत आहेत. हा भाग गृहनिर्माण सोसाट्याचा आहे. अनेक जण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
 
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील वाकडमध्ये 32, पिंपळेनिलखमध्ये 18, पिंगळेसौदागरमध्ये 25 आणि पिंपळेगुरव मध्ये 16 असे 91 मेजर कंटेन्मेंट झोन आहेत. रूग्ण असलेल्या 91 सोसायट्या सील केल्या आहेत. सद्या 550 मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. प्रभागातील कंटेन्मेंट झोनची संख्या 1508 वर गेली होती. त्यातील 958 झोन निरस्त झाले असून सध्या 550 कंटेन्मेंट झोन आहेत. या भागात 4 हजार 350 रुग्ण आहेत.
 
त्याखालोखाल ‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात 3 हजार 750 आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात 3 हजार 300 रुग्ण आहेत.
 
‘ड’ क्षेत्रीय अधिकारी सुषमा शिंदे म्हणाल्या, “वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव या भागात 91 मेजर कंटेन्मेंट झोन आहेत. 91 गृहनिर्माण सोसायट्या सील केल्या आहेत. प्रभागातील मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या 1508 वर गेली होती. ती कमी होऊन 550 वर आली आहे. प्रभागात दिवसाला साडेतीनशेच्या आसपास रुग्ण सापडत आहेत.
 
ताथवडे, पुनावळे, वाकड, पिंपळेनिलख, गुरव, सौदागर या भागातील नागरिकांचे फिरण्याचे प्रमाण जास्त आहे. आयटीचे लोक आहेत. मोठ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे प्रभागात रूग्णवाढ होताना दिसून येत आहे.