शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (23:48 IST)

पुण्यातील चार विद्यार्थी गहुंजे जवळ अपघातात जागीच ठार

मुंबईला फिरायला चाललेल्या पुण्यातील चार विद्यार्थ्यांवर काळाने आळा घातला. पुणे -मुंबई एक्सप्रेसवर गहुंजे स्टेडियम जवळ स्कोडा कारचा भीषण अपघात होऊन कारचा चक्काचूर झाला. या अपघातात कार मधील चौघे जागीच ठार झाले. भरधाव वेगाने येणारी ही स्कोडा कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक ला पाठीमागून जाऊन धडकली आणि या अपघातात कारमधील चौघे विद्यार्थी जागीच ठार झाले. शिवम राहुल कोकाटे(19) रा.पुणे, प्रियम सत्येंद्र राठी वय वर्ष 20 रा. नारायण पेठ, ऋषिकेश शिंदे वय वर्ष 21 बिबडेवाडी पुणे आणि मोहसीन संगम विश्वकर्मा वय वर्ष 20 रा.धनकवडी पुणे असे हे चौघे मृत्युमुखी झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास स्कोडा कार भरधाव वेगाने जात असताना रस्त्याच्या कडेला उभारलेल्या ट्रकला जाऊन धडकली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरश: चुरडा झाला आणि त्या कार मधील चौघेही गंभीर जखमी झाले . त्यांना सोमाटणेच्या रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. हे चौघे विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकत होते. ते मुंबईला फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्या गाडीत कॅमेरा देखील आढळला आहे.