रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (15:58 IST)

तुकाराम सुपेकडून आणखी ५८ लाख रुपये जप्त; पुणे पोलिसांची कारवाई

पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याच्या कार्यालयातून गेल्या चोवीस तासात ५० लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या परिचिताकडून काल रात्री २५ लाख रुपये जप्त केले होते. त्यानंतर आणखी एकदा त्याच्या कार्यालयावर छापा टाकत पुणे पोलिसांनी ३३ लाख रुपये जप्त केले आहेत. पुणे पोलिसांना २४ तासात तुकाराम सुपेकडून ५८ लाख रुपये जप्त करण्यात यश आलं आहे. यापूर्वी १ कोटी ५८ लाख आणि ९० लाखाचे दागिने सुपे आणि त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आले होते. तुकाराम सुपेकडून आतापर्यंत ३ कोटी ८७ लाख रुपये आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेची आणखी चौकशी केली असता त्याला पैसे लपवण्यात त्याची मुलगी कोमल पाटील आणि जावई नितीन पाटील यांनी मदत केल्याचं समोर आलं होतं. पुणे पोलिसांनी यानंतर त्या दोघांना चौकशीला बोलावलं. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी करुन छापा टाकून १ कोटी ५८ लाखांची रोकड आणि ७० लाखांचं सोनं हस्तगत केलं होतं.
 
पहिल्या छाप्यात ९० लाखांचा ऐवज जप्त
पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेला अटक केल्यानंतर त्याच्या घरी पहिला छापा टाकला होता. त्यावेळी सुपेच्या घरातून ८८ लाख ४९ हजार ९८० रोख, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे, ५ लाख ५० हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय सुपेने त्याच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचेही माहिती मिळाली आहे, असं पुणे पोलिसांनी सांगितलं होतं. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी जी.ए सॉफ्टवेअर कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरा हिंजवडीतून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोघांची सायबर शाखेत चौकशी सुरु आहे.