बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (09:52 IST)

महिलेची निष्काळजीपणे केली प्रसूती, २ डॉक्‍टरांना न्यायालयाकडून १० वर्षांची शिक्षा

पुणे येथे प्रसूती प्रक्रियेत तज्ज्ञ व सिझेरीयन ऑपरेशन करण्यास सक्षम नसतानाही निष्काळजीपणे महिलेची प्रसूती करणाऱ्या दोन डॉक्‍टरांना न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शस्त्रक्रियेत गुंतागुंत झाल्यानंतर योग्य शैक्षणिक पात्रता नसलेल्या डॉक्‍टरांकडे न पाठविल्याने 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.
 
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. आर. जगदाळे यांनी सदोष मनुष्यवधाच्या कलमानुसार ही शिक्षा सुनावली आहे. डॉ. जितेंद्र शिंपी (वय 40) व सचिन हरी देशपांडे (वय 39) अशी शिक्षा झालेल्या डॉक्‍टरांची नावे आहेत. तर भूल तज्ज्ञ डॉ. विजय अगरवाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या घटनेत राजश्री अनिल जगताप (वय 22) या विवाहितेचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांनी जन्म दिलेली मुलगी सुरक्षित आहे.
 
 2012 साली हा प्रकार घडला होता. डॉ. शिंपी यांचे किवळे परिसरात “अथश्री’ रुग्णालय आहे. डॉ. सचिन देशपांडे हे तेथे काम करत होते. दोघांचेही एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. तर त्यांनी आयुर्वेदात पदवी घेतली आहे.
 
अनिल जगताप हे रुग्णवाहिकेवर चालक आहेत. राजश्री यांना 30 एप्रिल 2012 रोजी डॉ. शिंपी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची परिस्थिती पाहता डॉक्‍टरांनी सीझर करण्याचे ठरले होते. त्यानंतर त्याचे कुटुंब नियोजनाचे देखील ऑपरेशन करण्यात येणार होते. पण सीझर करत असताना डॉक्‍टरांकडून हलगर्जीपणा झाल्याने राजश्री यांची अचानक तब्येत बिघडली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यांना खासगी वाहनातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. पण या कालावधीत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचार सुरू असताना राजश्री यांचा मृत्यू झाला.