सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (21:00 IST)

राज्यपाल हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे,आदित्य ठाकरे यांचे मत

aditya thackeray
महाराष्ट्राचे राज्यपाल हे राज्यपाल नसून राजकीय नेते आहेत. या राज्यपालांनी आम्हाला सत्तेतून बाहेर काढून टाकले. विधानसभा अध्यक्ष आमच्या काळात नेमला गेला नाही. मात्र, सरकार बदलल्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्ष नेमले गेले. तसेच राज्यपालांनी विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारांचा विषय प्रलंबित ठेवला. त्यामुळे हे राजकीय राज्यपाल हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे, असे मत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केले. बोरिवलीत युवा सेनेने महायुथ फाऊंडेशनच्या सहकार्याने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. 
 
आदित्य ठाकरे यांनी यावेळी रामदेवबाबा यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला. रामदेव बाबांचे विधान अतिशय दुर्दैव आहे. आपण महिलांकडे कसे बघतो? असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
 
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरही टीका केली. महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला चालले आहेत. बेरोजगारी वाढत आहे. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी फिरत आहेत. आता गुवाहाटीला गेलेत तिथून आणखी कुठे जाणार?, असा सवाल करत महाराष्ट्रासाठी काम करायचे त्यांच्या मनात कधीच नव्हते,असा आरोप त्यांनी केला. राक्षसी महत्त्वाकांक्षा असणारा मुख्यमंत्री राज्यासाठी काहीच करत नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

Edited by : Ratnadeep Ranshoor