सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जून 2021 (11:08 IST)

बेशिस्तांवर कारवाईचा बडगा विनापरवानगी साखरपुडा; कांचन रिसॉर्टवर गुन्हा दाखल

अमरावती, शहरातील नवसारी रिंगरोडवरील कांचन रिसॉर्ट येथे विनापरवानगी साखरपुडा समारंभ आयोजित केल्याचे निदर्शनास आल्यावरुन गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह विलगीकरणाचे नियम मोडणा-यांविरुद्धही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथकाद्वारे नियमित कारवाई होत असून, जिल्ह्यात दोन बेशिस्तांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
 
कोविड- 19 साथीमुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू असून, सार्वजनिक समारंभावर मर्यादा घालण्यात आली आहे. त्याचे पालन न केल्यास कारवाईची तरतूदही आदेशात करण्यात आली आहे. साथीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा भंग होता कामा नये, अन्यथा दंडात्मक कारवाईबरोबरच फौजदारी दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
 
शहरातील कांचन रिसॉर्ट येथे  विनापरवानगी व सुमारे 50 व्यक्तींच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ होत असल्याचे तहसीलदार पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार रिसॉर्टचे मालक व वर-वधू यांच्याविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार संतोष काकडे यांच्या निर्देशानुसार नवसारी मंडळ अधिकारी बी. जी. गावनेर व तलाठी जितेंद्र लांडगे यांनी तक्रार दिली. त्यानुसार गाडगेनगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 269, 270, 271, 291, साथ रोग अधिनियमाचे कलम 2, 3 व 4, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे कलम 51 (ब) अन्वये गुन्हा दाखल केला.
 
अंजनगाव सुर्जी नगरपरिषद क्षेत्रातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्यामुळे गृह विलगीकरणात राहण्याबाबत कळविण्यात आले होते व परवानगी देताना तसे हमीपत्रही लिहून घेण्यात आले होते. मात्र, गृह विलगीकरणाच्या काळात ही व्यक्ती रस्त्यावर फिरताना आढळल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांच्या पथकाने या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली. त्यांच्या तक्रारीनुसार अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिली.