सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: उस्मानाबाद , गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (19:45 IST)

उस्मानाबाद तालुक्यतील बेबळीत अंध गतिमंद मुलीवर बलात्कार

उस्मानाबाद तालुक्यतील बेबळी या गावातील शेतात वास्तव्य करणाऱ्या एका गतिमंद , मुकबधिर , अंध युवतीवर अत्याच्यार करणाऱ्या नराधमाला बेंबळी पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर ४८ तासातच बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान , सदर मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पोलिसांनी एक दोन नव्हे तर तब्बल २० जणांची कसून चौकशी केली होती.  यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे गतिमंद मुलीवर अत्याचार करणारा आरोपी हा मुलीच्या भावकीमधील आहे.
 
बेंबळी या गावातील  २१ वर्षीय गतिमंद, मूकबधिर आणि अंध असणाऱ्यामुलीला शेतातील घरात ठेवून उपचार करण्यात येत होते. मात्र, सदर मुलीला अधून मधून वेड्याचा झटका येत होता आणि ती लहान मुलांना मारहाण करत होती. त्यामुळे, तिच्या या त्रासाला कंटाळून घरातील मंडळींनी तिला शेतात एक पत्र्याचे शेड तयार करून त्यामध्ये ठेवले होते. परंतु शनिवारी तिचे वडील आजारी असल्यामुळे ते घरीच थांबले होते. हे सर्व आरोपीला माहिती होते, आणि त्याने या संधीचा फायदा घेत शेतात येवून शेडचे कुलूप तोडले आणि सदर मुलीला अमानुषपणे मारहाण केली करत तिच्यावर अमानुषपणे अत्याचार देखील केला.
 
दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलीचे वडील सकाळी ९ वाजता शेतात आले हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या गतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच मुलीच्या वडिलांच्या पायाखालची जमीनीच सरकली त्यांनी तात्काळ बेंबळी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला आणि तपासाला सुरुवात केली. मात्र, मुलगी गतिमंद , मुकबधिर , अंध असल्याने आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते . तरीदेखील पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरावली आणि श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले.  पोलिसांना आरोपीचा शोध लागत नसल्याने खबऱ्याद्वारे माहिती घेण्यास सुरुवात केली आणि तब्बल २० जणांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर, पोलिसांना धागेदोरे लागले आणि त्यांनी सापळा रचून २६ वर्षाच्या युवकाला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हा आरोपी लांबून पिडीतेचा चुलतभाऊ असल्याचे समोर आले असून, त्याने केलेल्या गुन्ह्यची कबुली देखील दिली असल्याची माहिती मिळाली आहे.