मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2023 (08:48 IST)

अटल सेतू पुल वाहतुकीसाठी बंद ,पर्वरी, पणजी, मेरशी भागात वाहतूक कोंडी

traffic
अटल सेतू हा महत्त्वाचा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवल्याचे पारिणाम दिसू लागले असून काल सोमवारी दिवसभर पर्वरीपासून पणजी बसस्थानक परिसरापर्यंत तसेच राजधानी पणजीत अतंर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली. अटल सेतू हा पुल 27 मार्च पर्यंत म्हणजे पुढील आठवडाभर बंद रहाणार असल्याने तोपर्यंत वाहतुकीची कोंडी कायम राहील, अशी चिन्हे दिसत आहेत. दुरूस्तीच्या कामासाठी अटल सेतू बंद करण्यात आल्यामुळे वास्को-पणजी व दक्षिण गोव्यात जाणाऱ्या वाहनांना पणजीत बसस्थानकाच्या परिसरात येण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्याचा परिणाम म्हणून अटल सेतूच्या खाली पर्वरीच्या बाजूने वाहने तुंबली. तीन बिल्डींगपर्यंत वाहनांची भली मोठी रांग लागल्याचे दिसून आले. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची पुरती दमछाक झाली.
 
पर्वरी, पणजीत वाहतूक कोंडी
पर्वरीच्या बाजूने सुरू झालेले हे ‘ट्रॅफिक जाम’ पणजी बसस्थानक तसेच राजधानी पणजीच्या अनेक भागात चालू होते. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले. वास्को-मडगाव व दक्षिण गोव्यात जाणाऱ्या वाहनांना अटल सेतू बंद केल्यामुळे विनाकारण पणजीत उतरावे लागले. त्यामुळे पर्वरीच्या बाजूने व पणजी बसस्थानक परिसरात वाहनांची मोठी गर्दी घेऊन वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
 
पोलिसांचे प्रयत्नही फसले
ती कोंडी फोडण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले परंतु वाढत्या वाहनांसमोर त्यांचे प्रयत्न कमी पडले. ते अधिक काहीही करू शकले नाहीत. सकाळ, दुपार, सायंकाळी देखील वाहतूक कोंडी चालूच असल्याचे दिसून आले. त्यामुळे अटल सेतूचे खरे महत्त्व कळून चुकले. हा सेतू लवकरात लवकर खुला केल्याशिवाय पर्वरी आणि पणजीत होणारी वाहतूक कोंडी सुटणार नाही हे सत्य त्यामुळे उघड झाले. अटल सेतू जर खरोखरच 27 मार्चपर्यंत दिवसा-रात्री बंद ठेवला तर ही वाहतूक कोंडी वाहनचालकांना सोसण्याशिवाय पर्याय नाही हे सत्य अधोरेखीत झाले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor