शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (08:11 IST)

नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणाकडे "इतके" हजार क्युसेसने विसर्ग सुरु...

उत्तरा नक्षत्रातील परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्हाभरात जोरदार हजेरी लावल्याने गोदावरी, दारणा, कादवा नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या उजव्या बाजूकडील पाच वक्राकार गेटमधून 13 हजार क्यूसेसचा विसर्ग करण्यात येत आहे.
 
पावसाची संततधार सुरूच राहिली, तर नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढू शकते. परिणामी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. यंदा पावसाळा संपत आला असतानाही नदी-नाले कोरडेठाक होते. परिणामी यंदा पावसाळ्यातील पहिला पाऊस खऱ्या अथनि पडू लागला. गोदावरी, दारणा, कादवा नद्यांना पावसाचे पाणी येऊन मिळाल्याने या नदीपात्रातील, तसेच धरणात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पाणवेली वाहून जाण्यास मदत झाली.
 
दोन दिवस जिल्हाभरात बरसणाऱ्या पावसाचे पाणी नदी- नाल्यांद्वारे नांदूरमध्यमेश्वर धरणात येत असल्याने या धरणाच्या आठ गेटपैकी उजव्या बाजूकडील पाच गेटमधून विसर्ग करण्यात येत आहे.सुमारे एक किमी लांबी असलेल्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या धरणाची पूर्वीची 1050 दशलक्ष घनफूट असणारी साठवणक्षमता आता अवघी 250 दशलक्ष घनफूट झाली आहे. या धरणावर शेकडो पाणीपुरवठा योजना असून, धरणाची साठवणक्षमता वाढावी, यासाठी धरणात साचलेला गाळ काढणे गरजेचे आहे.
 
आतापर्यंत या धरणाला आठ गेट बसवूनदेखील थोडाही गाळ वाहून जाऊ शकला नाही. त्यामुळे धरणातील गाळ नदीपात्राच्या कोठुरे गावापर्यंत काढणे गरजेचे आहे, तसेच गाळ काढताना घरणाची लांबी-रुंदी विचारात घेऊन गाळ काढण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.



Edited By - Ratnadeep ranshoor