गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (16:57 IST)

जवाद चक्रीवादळामुळे मुंबई, पुणे, कोकण आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन पुढच्या 12 तासांमध्ये त्याचं रुपांतर चक्रीवादळात होईल, असं भारतीय हवामान खात्यानं सांगितलं आहे.
हे वादळ शनिवारी सकाळी आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकेल, असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे.
 भारतीय हवामान खात्यानं जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशाच्या 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट घोषित केला आहे.
या व्यतिरिक्त 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
3 ते 5 डिसेंबर दरम्यान समुद्र तटावरील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला  देण्यात आला आहे.  
"4 डिसेंबरच्या दुपारपासून सीमावर्ती भागात हवेचा वेग 60 ते 80 किलोमीटर दरम्यान असेल. या भागातील लोकांनी घरातून बाहेर पडू नये असे सांगण्यात येत आहे. 
परिणामी महाराष्ट्रातल्या मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाचे वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
जवाद चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात उत्तर भागात तयार झालेला कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.