शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (21:44 IST)

बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी हायस्पीड गस्ती नौका घेणार

राज्याच्या सागरी हद्दीत एलईडीच्या सहाय्याने होणारी बेकायदा मासेमारी आणि परराज्यातील नौकांची मोठ्या प्रमाणावरील घुसखोरी रोखण्यासाठी पाच गस्ती नौका भाडयाने घेण्याचा महत्वाचा निर्णय राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला आहे.परराज्यातील मासेमारी नौका राज्याच्या सागरी हद्दीत घुसतात आणि बेकायदा मासेमारी करतात. त्यातून स्थानिक मच्छिमार आणि परराज्यातील मच्छिमारांध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष होतो.
 
या मासेमारी नौकांचा वेगही प्रचंड असतो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे अनेकदा मुश्कील होते. त्याशिवाय बंदी असूनही मासेमारीसाठी एलईडी दिवे आणि पर्सनीन जाळ्यांचा वापर होत असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी हायस्पीड गस्ती नौका घेण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.
 
अवैध मासेमारी आळा घालण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नवीन सागरी मासेमारी कायद्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर राज्याचा मत्स्यव्यवसाय विभाग अवैध मासेमारी विरोधात कमालीचा सक्रीय झाला आहे. राज्याच्या सागरी हद्दीत एलईडी आणि अवैध मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि परराज्यातील मासेमारीला आळा घालण्यासाठी पाच गस्ती नौका भाड्याने घेण्यास मत्स्य विकास विभागाने मान्यता दिली आहे.