गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (09:37 IST)

‘हिंदुत्व, निवडणूक आणि आरक्षण...’ दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात 6 सभांमधून राजकीय शिमगा?

खरंतर महाराष्ट्रासाठी दसरा आणि राजकीय सभा हे समीकरण नवं नाही. पण यंदा दसऱ्यादिवशी राज्यात एक,दोन नव्हे तर एकूण पाच वेगवेगळ्या सभा होणार आहेत.
राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती, सत्तासंघर्ष, आगामी निवडणुका, विचारधारांची राजकीय लढाई, आरक्षण आणि नोकरभरतीचा वाद अशा अनेक मुद्यांवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात दसऱ्याचं निमित्त साधत यंदा राज्यात पाच ठिकाणी राजकीय भाषणं होतील.
 
आता यावेळी विचारांचं सोनं लुटलं जाणार की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष होणार, हे पाहावं लागेल.
 
नेमक्या या 6 सभा किंवा दसरा मेळावे कोणते आहेत? त्यांचं राजकीय महत्त्व काय आहे? आणि महाराष्ट्रात दसरा आणि शक्तीप्रदर्शन याचा इतिहास काय सांगतो? जाणून घेऊया.
 
1. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा
ठिकाण – शिवाजी पार्क, दादर
 
30 ऑक्टोबर 1966 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला होता. त्याला आता 57 वर्षं पूर्ण होतील.
 
यंदाही शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे.
 
शिवसेनेत फूट पडल्यानंतरचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. गेल्यावर्षीही शिवसेनेच्या दोन्ही गटांनी स्वतंत्र दसरा मेळाव्यांचं आयोजन केलं होतं.
 
यंदाच्या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून केला जाईल.
 
शिवाय, एकाबाजूला आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कायदेशीर लढाई सुरू असताना दुसऱ्याबाजूला जनतेच्या दरबारात न्याय मागण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आपल्या भाषणाच्या माध्यमातून करताना दिसतील.
 
शिवसेनेसाठी, शिवसैनिकांसाठी दसरा मेळाव्याचं महत्त्व आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात आपल्या अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामुळे बाळासाहेब दसरा मेळाव्यात काय भाषण करणार याची उत्सुकता शिवसैनिकांना असायची.
 
1982 मध्ये गिरणी कामगारांच्या संपाच्या अनुषंगाने बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी काँग्रेसमध्ये असणाऱ्या शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांना बोलवलं होतं.
 
1996 साली राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत शिवउद्योगसेना सुरू करण्यात आली होती. याची घोषणा दसऱ्या मेळाव्यात करण्यात आली होती.
 
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधाची घोषणाही दसरा मेळाव्याच्या मंचावरून करण्यात आली होती.
 
यानंतर 2010 मध्ये आपला नातू आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हातात तलवार देऊन त्यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश घडवून आणला होता. तसंच अनेक मोठी आणि वादग्रस्त भाषणंही बाळासाहेबांनी याच मंचावरून केली होती.
 
आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठं आव्हान दिलं आहे. यामुळे आपली हिंदुत्वाची व्याख्या भाजपपेक्षा कशी वेगळी आहे हे सुद्धा ते वारंवार सांगताना दिसतात.
 
यंदाच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपली ही भूमिका शिवसैनिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसतील.
 
2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा
ठिकाण – आझाद मैदान, दक्षिण मुंबई
 
गेल्यावर्षीपासून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे स्वतंत्र दसरा मेळाव्याचं आयोजन करत आहेत.
 
यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या शिंदे गटासाठीही तितकाचा महत्त्वाचा आहे. त्याचं कारण म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.
 
तसंच सरकारमध्ये असल्याकारणाने आणि सरकारचं नेतृत्त्व स्वत: एकनाथ शिंदे करत असल्याने त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत.
 
एकाबाजूला शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आम्हीच पुढे नेत आहोत हे जनतेला सातत्याने पटवून देण्याचं आव्हान तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री म्हणून सरकारी नोकरभरती, विविध समाजांच्या आरक्षणाच्या वेगवेगळ्या मागण्या, कायदा-सुव्यवस्था, आरोग्य व्यवस्था, जुनी पेन्शन योजना, अशा अनेक संघर्षांच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.
 
यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या भाषणात उद्धव ठाकरे लक्ष्य असले तरी मुख्यमंत्री म्हणूनही ते राज्याच्या जनतेला काय संबोधित करतात याकडेही सर्वांचं लक्ष असेल.
 
3. रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेत शरद पवारांची सभा
ठिकाण- पुणे
 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्षबांधणीचं काम करण्यास सुरुवात केलीय.
 
अजित पवार आणि त्यांच्यासह मोठ्या संख्येने आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर शरद पवार यांचे नातू आमदार रोहीत पवार यांनी राज्यव्यापी संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे.
 
पुणे ते नागपूर या मार्गावर 45 दिवसांची ही यात्रा असणार आहे. यावेळी विविध जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न विशेषत: युवकांच्या प्रश्नांची दखल घेतली जाणार आहे. तसंच या यात्रेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शनही केलं जाणार आहे.
 
शरद पवार यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या भाषणाने या संघर्ष यात्रेची सुरूवात होणार आहे. यामुळे दसऱ्याला पुण्यात शरद पवार आणि मुंबईत उद्धव ठाकरे अशा महाविकास आघाडीतल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं होणार आहेत.
 
4. पंकजा मुंडे यांची सभा
ठिकाण- भगवान भक्ती गड
 
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडच्या भगवान गडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली.
 
यानंतर त्यांच्या कन्या आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस सचिव पंकजा मुंडे यांनीही ही परंपरा कायम ठेवत भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली.
 
अनेकदा आपल्या दसऱ्याच्या भाषणात त्या भावनिक आवाहन करताना दिसल्या. तर अनेकदा आपल्यावरील अन्यायावर त्यांनी भाष्य केलं आहे.
 
आता सध्याची त्यांची राजकीय घुसमट, पक्षातील नाराजी आणि साखर कारखान्यावरील कारवाईनंतर यंदाच्या भाषणात पंकजा मुंडे कोणती मोठी घोषणा करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
5. आरएसएसचा विजया दशमी सोहळा
ठिकाण – नागपूर, आरएसएस मुख्यालय
 
दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात विजया दशमी सोहळा साजरा करण्यात येतो. 1925 साली विजयादशमीच्या दिवशीच आरएसएसची स्थापना करण्यात आली.
 
यादिवशी आरएसएसचं पथसंचलन, कवायत आणि यानंतर आरएसएसच्या सरसंघचालकांचं संबोधन होतं.
 
यंदा निवडणुकीच्यानिमित्ताने आणि देशातील राजकीय आणि धार्मिक वातावरण पाहता राष्ट्रीय राजकारणावर मोहन भागवत काय भूमिका मांडतात याकडे सर्वांच लक्ष लागलंय.
 
6. धनगर आरक्षणासाठी मेळावा
ठिकाण – चौंडी,अहमदनगर
 
मराठा आरक्षणाचा तिढा सरकारसमोर असताना त्याला ओबीसी समाजाकडून होणारा विरोध आणि दुसऱ्या बाजूला धनगर समाजानेही एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू केलेलं आंदोलन यामुळे राज्यात पुन्हा एकदा विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागणीवरून राजकारण सुरू झालेलं दिसतं.
 
धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी धनगर समाजातील यशवंत सेनेने अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
 
यापूर्वीही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नेत्यांनी आमरण उपोषण पुकारलं होतं. राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं होतं.
 
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाचे शासन निर्णय आहेत आणि इतर काही राज्यांनीही त्याची अंमलबजावणी केलेली आहे असं धनगर समाजातील नेत्यांचं म्हणणं आहे.
 
चौंडी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन या मेळाव्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे यावेळी राज्य सरकारला यशवंत सेनेकडून नेमका काय इशारा दिला जातो हे पहाणं महत्त्वाचं ठरेल.
 
‘विचारांचं सोनं’ की शक्तीप्रदर्शन?
 
महाराष्ट्रात दसरा या दिवसाला सांस्कृतिकदृष्ट्या जसं महत्त्व आहे तसंच कालांतराने राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झालं आहे.
 
दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. तर दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या राजकीय सभांना ‘विचारांचं सोनं लुटण्यासाठी’ म्हणून संबोधलं जातं.
 
पण प्रत्यक्षात खरंच विचारांचं सोनं लुटलं जातं की केवळ राजकीय हेतू साध्य केला जातो? हा प्रश्न उपस्थित होतो आणि यंदा तर राजकीय संभाची संख्या वाढली आहे.
 
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्राध्यपक आणि राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सांगतात, "हिंदू वेगळं आणि हिंदुत्व वेगळं. महाराष्ट्रात दसऱ्याच्या शुभेच्छा देण, सिमोल्लंघन करणं याला हिंदू जनमानसात महत्त्व आहे. त्या दिवशीच्या राजकीय सभा या पक्षाचा विस्तार, कार्यकर्त्यांना दिशा देणं यासाठी असतात.
 
एक महत्त्वाचा बदल किंवा नवीन ट्रेंड आपल्याला दिसतो की हिंदुत्ववादी पक्ष सोडून इतर पक्षही दसऱ्यासारखा दिवस कॅप्चर करू पाहत आहेत. संस्कृती, हिंदू या गोष्टी आतापर्यंत भाजपला आंदण दिल्यासारख्या होत्या. हिंदुत्ववादी पक्ष नसूनही हिंदुत्ववादी लाईन किंवा भूमिका कॅप्चर केली पाहिजे याची जाणीव इतर नेत्यांना, पक्षांना झालेली दिसते.
 
समजा 100 मतदार आहेत. आतापर्यंत सगळेच शिवसेना आणि भाजपच्या कार्यक्रमाला जात होते. आता शरद पवारही दसऱ्याला सभा घेत असतील तर किमान 20 टक्के मतदार तरी त्यांच्या सभेकडे वळतील. म्हणजेच 'हिंदुत्ववादी' मतदार तिकडे वळतील."
 
शिवसेनेसाठी दसरा मेळाव्याचं महत्त्व अधिक आहे हे वेगळं सांगायला नको. आता निवडणुका जवळ आल्याने इतर पक्षांनीही मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, “दसऱ्याचा दिवस म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवस असं आपल्याकडे मानतात किंवा काही राजकीय पक्षही याकडे तसंच पाहतात. आता दोन पक्षांचे चार पक्ष महाराष्ट्रात झाले आहेत. यामुळे राजकीय घडामोडीही वाढल्या आहेत. त्यात निवडणुका तोंडावर आहेत. यामुळे यंदा दसऱ्याच्या राजकीय कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला दिसते आहे.”
 
“आपल्या पक्षांची प्रतिमा जनतेपुढे उजळवण्याचा हा एक प्रयत्न म्हणून याकडे आपण पाहू शकतो. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणांसाठी लाखो शिवसैनिकांची गर्दी व्हायची. आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. दोन्ही गटांचे आपआपले मुद्दे आणि भूमिका आहेत. ते पटवून देण्यासाठी, राजकीय वक्तव्यांसाठी, गर्दी जमवण्यासाठी किंवा राजकीय स्पर्धेसाठी म्हणूनही याकडे पाहिलं जाऊ शकतं,”
 
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. तर येत्या दहा ते अकरा महिन्यात लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यात राजकीय परिस्थिती आणि समीकरणांमध्ये ऐतिहासिक बदल झाले आहेत. यामुळेही यंदाच्या दसरा मेळाव्यांना राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे.
 
यापूर्वीही दसऱ्याच्या दिवशी नवीन घोषणा केल्या जात होत्या. एखाद्या नवीन उपक्रमाची किंवा नवीन राजकीय भूमिकेची घोषणा करण्यासाठीही दसऱ्याचा दिवस निवडला जातो.
 
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात, “आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला राजकीय कार्यक्रम एकत्र आलेले दिसतात. योगायोगानेही काही कार्यक्रम होत आहेत.
 
रोहित पवार यांची संघर्ष यात्रा तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि लोकसभेची तयारी करण्यासाठी आहे. रोहित पवार पक्षात सेट होण्याच्यादृष्टीने हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. यापूर्वी त्यांनी त्यांच्या मतदारसंघात एमआयडीसीचा मुद्दा उचलला आहे. रोजगार, नोकरभरती यामुळे तरुण पिढीला पक्षाकडे वळवण्यासाठी हा कार्यक्रम आहे.”
 
“दुसरीकडे निवडणुकीच्याचदृष्टीनेच आरक्षणाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल की मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला होता. गेल्या निवडणुकीत बारामतीत गोपीचंद पडळकर यांच्या बारामतीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाला आरक्षण देऊ.
 
तसंच धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याला आदिवासी समाजाचा विरोध आहे. तर दुसरीकडे ओबीसी जनगणना हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसकडून उचलून धरला जात आहे. यामुळे ओबीसी जातगणनेचा मुद्दा महाराष्ट्रातही तापणार आहे.”
 
ते पुढे सांगतात, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बिहारच्या निवडणुकीवेळी आरक्षणाला विरोध करणारं स्टेटमेंट केलं होतं त्याचा फायदा लालू प्रसाद यादवांनी घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी आपली चूक सुधारली आणि आरक्षणाच्या बाजूने वक्तव्य केलं.
 
त्यानंतर आरक्षण कायम ठेवावं लागेल अशी भूमिका भागवतांनी सातत्याने घेतली आहे. यामुळे यावेळी आरक्षणाबाबत आणखी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.”
 





























Published By- Priya Dixit