शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (08:55 IST)

बाप्परे, 3 महिन्याच्या बाळाला गटाराच्या कडेला फेकून दिले

नाशिकमध्ये 3 महिन्याच्या बाळाला गटाराच्या कडेला फेकून दिल्याचे समोर आले आहे. नाशिक त्रंबकेश्वर महामार्गालगत असलेल्या आधारतीर्थ आश्रमच्या समोर (तुपादेवी फाटा) रात्री 2 च्या सुमारास एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. यावेळी आश्रमात झोपलेल्या अनाथ मुलांना या लहान बाळाचा आवाज आला. त्यानंतर त्या मुलांनी आपल्या मित्रांना झोपेतून उठवलं. या अनाथ आश्रमात सांभाळ करणाऱ्या मावशींसोबत त्या मुलांनी गेटच्या बाहेर जाऊन पाहिलं. त्यावेळी रस्त्याच्या कडेला गटाराच्या बाजूला एक निरागस बाळ रडत असल्याचे त्यांना दिसले.
 
त्यांनी तात्काळ आश्रमातील अध्यक्षांना कळवत नाशिक पोलीस नियंत्रण कक्षाला सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास त्रंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या पी. एस. आय. अश्विनी टिळे पेट्रोलिंग करत होते. त्यानंतर त्यांनी तातडीने तुपादेवी फाट्याकडे धाव घेत आश्रम गाठलं.
 
यानंतर त्या आश्रमातील महिलेने त्या चिमुरड्याला आश्रमात आणून दूध पाजलं. यानंतर पी.एस.आय अश्विनी टिळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना करत तात्काळ बाळाला त्रंबकेश्वर रुग्णालयात हलवण्यास सांगितले. यानंतर डॉक्टरांनी या बाळाची तपासणी करुन त्याची प्रकृती नीट असल्याची माहिती दिली. बाळाला घारपुरे घाट येथील आधार आश्रमात ठेवण्यात सांगितलं आहे. मात्र त्र्यंबकेश्वर पोलीस या बाळाच्या आईचा शोध घेत आहेत.