अन् थायलंड-बँकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे, राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप
सेव्ह विक्रांत मोहिमेसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी जनतेकडून पैसा गोळा केला. हा आकडा जवळपास 58 कोटींच्या घरात आहे. सोमय्या पिता-पुत्रांनी हा पैसा राजभवनात जमाच केला नाही. एका निवृत्त कर्नलने यासंदर्भात तक्रार केली आहे. त्यावरून सोमय्या पिता-पुत्रांवर कारवाई सुरू आहे. ही कारवाई कोणत्याही राजकीय सुडापोटी करण्यात आलेली नाही. इथे धमकी द्यायची आणि थायलंड-बँकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे. असा प्रकार या टोळीचा सुरू होता, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत केला आहे.
राऊत म्हणाले, आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी म्हणून सोमय्यांनी पैसा गोळा केला. चोरी ती चोरीच असते. ती एक रुपयाची असो किंवा चार आण्याची. चोरीसाठी कायदा तोच आहे. तोच सोमय्यांनी लागू आहे. सोमय्यांनी आता पळू नये. समोर यावे. पोलिसांना तपासात सहकार्य करावे. कायद्याचे पालन करावे. आम्ही कधीही कमरेखाली वार करत नाही. कोणाच्या कुटुंबापर्यंत जात नाही. तसेच ही कारवाईही सुडापोटी नाही, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणात सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सोमय्या उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे.