गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (21:26 IST)

सचिन वाझेची हाऊस कस्टडीची याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळली

अँटिलियासमोरील स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची हाऊस कस्टडीची याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळली आहे. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर मला तुरुंगात हवी तशी काळजी मिळणार नसल्याचे वाझेच्या वतीने न्यायालयात सांगितलं. मात्र, न्यायालयाने वाझेची मागणे फेटाळली.
 
सचिन वाझेच्या हाऊस कस्टडीची याचिका फेटाळत न्यायालयाने रूटीन चेकअप आणि ज्या वेळी गरज असल्यास वाझेला जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी आणण्याची तसेच घरच्या जेवण देण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने सांगितलं की तो तुरुंगातील विशेष रुग्णालयाच्या कक्षात असू शकतो आणि त्याला घरच्या जेवणाची परवानगी आहे. गरज पडल्यास जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी नेलं जाईल.
 
सचिन वाझे याच्यावर दक्षिण मुंबईतील एका खासगी रुग्णालयात नुकतीच हृदयावरील शस्त्रक्रिया पार पडली आहे. जखम भरेपर्यंत आपल्याला हाऊस कस्टडीत ठेवण्यात यावे, असा अर्ज वाझेच्या वकिलाने एनआयए न्यायालयात केला होता.  सचिन वाझे याच्यावरील शस्त्रक्रिया सुरळीत पार पडली असली तरी यातून बाहेर पडण्यास सचिन वाझे याला वेळ लागणार आहे. दरम्यान, आपल्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर तुरुंगात न पाठवता हाऊस कस्टडीत ठेवण्यात यावे, असा अर्ज वाझे यांच्या वकिलाने एनआयए न्यायालयात २५ सप्टेंबर रोजी केला होता. या अर्जावर निर्णय देण्यापूर्वी न्यायालायने एनआयए कडून उत्तर मागितले होते.