सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रोहा , बुधवार, 12 जुलै 2023 (07:44 IST)

सुबोध ची दिंडी ; २२५ दिवसांत ३१२ किल्ले केले सर!

Subodh Vijay
social media
रोह्याचा ध्येयवेडा सुबोध विजय गांगुर्डे सायकलवरून स्वराज्याची भगवी पताका जगातील सर्वोच्च शिखर असणार्‍या माऊंट एव्हरेस्ट शिखरावर फडकवण्यासाठी निघाला आहे. ३७० किल्ल्यांवरील माती गोळा करण्याचा संकल्प केलेल्या सुबोधने गेल्या २२५ दिवसांत ३१२ गडकिल्ले पादाक्रांत केले आहेत. रोह्याचे आराध्य दैवत श्री धावीर महाराज, आई कुंदाबाई, वडील विजय आणि वडील बंधू सुमेध यांचा आशीर्वाद घेऊन सुबोधने सायकलवर गडकिल्ल्यांची मोहीम सुरू केली.
 
आतापर्यंत राज्यात १३००० किलोमीटरचा सायकल प्रवास करून शनिवारी महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वत रांगेतील मैलगड या किल्ल्यास भेट देऊन ३७० पैकी ३१२ वा किल्ला सर केला. यापुढचे ५८ किल्ले आणि माऊंट एव्हरेस्ट अशा ३०००० किलोमीटरच्या प्रवासासाठी सुबोध त्याच जिद्दीने निघाला आहे. सुबोधने बंगलोर येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. गेली दोन वर्षे नोकरीनिमित्त हिमाचल प्रदेशात असताना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेऊन हिमाचल प्रदेशातील डोंगर रांगांमध्ये गिर्यारोहण करत होता.
 
बालपणापासून आईने छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य विचारांचे आणि कर्तव्याचे संस्कार मनावर कोरल्याने आपली ऐतिहासिक महती, छत्रपतींचा गौरवशाली इतिहास जगभरात जावा याकरिता रायगड ते माउंट एवरेस्ट सायकल दिंडी काढली आहे. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये व्हावी यासाठी सर्व किल्ल्यांवरील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या तसेच तेथील जिल्हाधिकारी यांच्या सह्या घेऊन नोंद केली आहे, असे सुबोधने सांगितले आहे.