मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातल्या हेल्मेटसक्तीला स्थगिती
पुण्यात १ जानेवारीपासून पोलिसांकडून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली. या विरोधात शहरातील विविध संघटना एकत्र येत पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तसेच अनेक भागांमध्ये तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. या सर्व घडामोडी घडत असताना, शहरातील सर्व आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हेल्मेट सक्तीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ज्यानंतर शहरी भागातल्या हेल्मेट नसल्यास होणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.
याविषयी आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या की, या सक्तीचा फटका दुचाकी चालकांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. या कारवाईबाबत आणि दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याने आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील सर्व परिस्थिती मांडली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शहरी आणि नागरी भागात हेल्मेटसक्ती स्थगित करण्याची मागणी मान्य केली.