बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (22:21 IST)

दारू पिण्याच्या जागेवर बसण्याच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्त्या

दारू पिण्याच्या जागेवर बसण्याच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्त्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मनमाडच्या सावित्रीबाई डेली सब्जी मार्केटच्या इमारतीत घडली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला रेल्वे स्थानकावर अटक करून त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. खून केल्यानंतर पळून जाणाच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासात गजाआड केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
 
याबाबत अधिक वृत्त असे कि सुनील शंकर महाजन (वय 26, रा. गायकवाड चौक) हा तरुण मातोश्री सावित्रीबाई फुले डेली सब्जी मार्केटच्या इमारतीत दारू पीत असताना तेथे दुर्गा प्रसाद उर्फ जग्गू दादा (वय 45, रा. इटारसी) तेथे आला आणि मी रोज या जागेवर बसतो तू का बसला, ही जागा माझी आहे येथून उठ असे त्याने सुनीलला सांगितल्यानंतर मी अगोदर आलो आणि जागा काही तू खरेदी केलेली नाही असे म्हणत सुनीलने जागेवरून उठण्यास नकार दिल्यानंतर त्याचा राग येवून दुर्गा प्रसादने खिशातून चाकू काढत सुनीलवर वार केला. त्यात तो रक्तबंबाळ होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला.सुनीलचा निर्घृणपणे खून केल्यानंतर दुर्गा प्रसाद पसार झाला.
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे, सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर सुनीलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. खून कोणी केला याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर अधीक्षक खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे, सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते, पैठणकर, गांगुर्डे, चव्हाण, पवार, खैरनार, वणवे या पथकाने सापळा रचून रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी दुर्गा प्रसादला रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.