शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (09:37 IST)

प्रेमप्रकरणातून प्रेयसीचे तुकडे केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली

murder
औरंगाबाद, सौरभ लाखे प्रेयसीचा तुकडे केलेला मृतदेह गोणीत भरला आणि गाडीत टाकून तो निघाला, पण...
प्रेयसीचा तुकडे केलाला मृतदेह पळवून नेत असताना पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सौरभ लाखे (25) याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी सौरभ लाखे आणि सुनिल धनेश्र्वर यांना गुरुवारी (18 ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात आलं.
 
त्‍यांना 23 ऑगस्‍टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एम.एम. माळी यांनी दिले आहेत. तो औरंगाबाद जिह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर गावचा रहिवासी आहे. तो विवाहित असून त्याला तीन वर्षांची एक मुलगी आहे. तो स्थानिक भागात पत्रकार म्हणून काम करत होता. तर मृत तरुणीचं नाव अंकिता श्रीवास्तव (21) असून ती मूळची जालना येथील रहिवासी आहे.
 
तिचं लग्न महेश श्रीवास्तव यांच्याशी झालं होतं. त्यांना साडेतीन वर्षांची मुलगी आहे. आरोपी सौरभ हा अंकिताच्या शेजारीच राहत होता. त्यामुळे सौरभ आणि अंकिता दोघांची ओळख झाली.
 
दरम्यानच्या काळात ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर सौरभनं अंकिताला हडको परिसरात भाड्यानं खोली घेऊन दिली. तिथंच ती राहत होती.
 
नेमकं घडलं काय?
याप्रकरणी दाखल केलेल्या फिर्यादीत या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
 
फिर्यादीनुसार, प्रवीण सुतार यांच्या मालकीचं घर हडको परिसरात आहे.
 
तिथं वरच्या मजल्यावर अलका गायकवाड तर तळमजल्यावर अंकिता श्रीवास्तव भाड्यानं राहत होती. या घरासमोर सुभाष गायकवाड यांचं बेकरीचं दुकान आहे.
 
17 तारखेला अलका यांनी घरमालक प्रवीण सुतार यांना कळवलं की, "अलका राहत असलेल्या रुममधून खूप घाण वास येत आहे. दरवाजा आणि खिडक्यांजवळ माशा घोंगावत आहेत. आज अंकिताचा मित्र पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन आला आणि तिच्या रुममधून गोणीत भरून काहीतरी घेऊन चालला आहे. त्याचा सडल्यासारखा वास येत आहे."
 
सौरभ तिथून जात असताना सुभाष गायकवाड यांनी गाडीचा क्रमांक लिहून घेतला.
 
त्यांनी त्याला घरमालक येईपर्यंत थांब,असं सांगितलं. पण, मला वेळ नाही असं म्हणत तो जोरात तिथून गाडी घेऊन निघून गेला.
 
त्यानंतर घरमालक प्रवीण सुतार यांनी सौरभला फोन लावून विचारणा केली की, अंकिता कुठे आहे, तिच्या रुममधून घाण वास येत आहे. तू कुठे आहे? तर तो म्हणाला, मी खुलताबादला आहे. त्यावर सुतार त्याला म्हणाले, तू आताच गाडी घेऊन आला आणि इथून गेला तर लगेच खुलताबादला कसा पोहचला. त्यानंतर त्यानं घरमालकाचा फोन कट केला.
 
घरमालक प्रवीण सुतार यांनी ही सगळी माहिती पोलिसांनी सांगितली आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहचलं.
 
घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.
 
या नाकाबंदीदरम्यान देवगाव रंगारी भागातून एक संशयित गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. या गाडीत सौरभ लाखे आणि त्याचा मित्र सुनील धनेश्वर हे दोघे होते.
 
पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता अंकिताच्या मृतदेहाचे तुकडे गोणीत भरलेले आढळून आले.
 
या गाडीत डोळे नसलेलं स्त्रीचं प्रेत ठेवलं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
 
या दोघांनी अंकिताचा ती राहत असलेल्या घरी 15 ते 17 ऑगस्टदरम्यान तिचा खून केला. त्यानंतर तिचं प्रेत आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं प्रयत्न केले, असं फिर्यादीत नमूद केलं आहे.
 
अवयव कापून गोदामात ठेवले
सौरभने 15 ऑगस्टच्या रात्री अंकिताचा गळा चिरला आणि तिचं शिर धडावेगळं केलं. त्यानंतर तिचे हात-पाय तोडले.
 
हे सर्व अवयव गोणीत भरून त्यानं ते मोटारसायकलवरून गावी शिऊरला नेले आणि तिथं एका गोदामात लपवून ठेवले.
बुधवारी अंकिताचं धड आणि इतर अवयव गोणीत टाकून एका गाडीने तो जात असताना त्याला पोलिसांनी पकडलं आणि ताब्यात घेतलं.
 
व्हॉट्सॲपवर दिली खबर
आरोपी सौरभ लाखे हा जिल्हा पोलीस-पत्रकारांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सक्रीय असायचा. बुधवारी (17 ऑगस्ट) दुपारी सव्वाबारा वाजताही त्याने स्वत: 'मी खून केला आहे', अशी पोस्ट व्हॉट्सॲपवर टाकली.
 
सुरुवातीला इतर पत्रकारांना आणि पोलिसांना काही समजलं नाही. मात्र पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, आपण सिडको पोलीस ठाण्यात जात असल्याचं त्यानं ग्रुपवर सांगितलं.
 
त्यानंतर साडेबाराच्या सुमारास आपण देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात असल्याची पोस्ट त्यानं टाकली.या प्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलीस करत आहेत.दरम्यान, लग्नाचा तगादा लावल्यामुळे सौरभनं अंकिताचा खून केल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.
 
गुन्हेगारीच्या वाढत्या घटना थांबवायच्या कशा?
औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडत आहे.
 
यातली बरीचशी प्रकरणं प्रेमप्रकरणाशी निगडित असल्याचं दिसून येतं.
 
औरंगाबादमध्ये 21 मे रोजी भरदिवसा कशिश नावाच्या एका तरुणीची हत्या करण्यात आली. मारेकऱ्यानं या तरुणीला 200 फूट ओढत नेऊन नंतर तिचा गळा चिरल्याचं समोर आलं होतं. एकतर्फी प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं होतं.
 
गेल्या वर्षी शहरात 30 हून अधिक जणांचा खून झाला होता. तर यावर्षीच्या पहिल्या 6 महिन्यात 25 जणांचा खून झाल्याचं स्थानिक क्राईम रिपोर्टर्सच्या बोलण्यातून समोर येतं.