शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (17:56 IST)

तरुण शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले

देशांतर्गत मागणीच्या तुलनेत आवक अधिक येत असल्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोला मातीमोल दर मिळाला आहे. कमी दर मिळाल्यानं संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकल्याने येवला-नगर राज्य मार्गावर टोमॅटोचा लाल चिखल पाहायला मिळाला.
 
तरुण शेतकऱ्यानं टोमॅटो रस्त्यावर फेकले
येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील तरुण शेतकरी आदित्य जाधव याने टोमॅटोला भाव मिळत नसल्याने संतप्त होत रस्त्यावर टोमॅटो फेकून दिल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्याने 80 हजारहून अधिक खर्च करून एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली, सुरुवातीला चांगला भाव मिळाला होता. आदित्य जाधव यांना त्यातून 15 हजार रुपयांच्या जवळपास रक्कम हातात आली.
 
किलोला एक ते दीड रुपया दर
दिवसेंदिवस टोमॅटोचे भाव कोसळत गेल्याने आदित्य जाधव या शेतकऱ्याला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत 20 किलोच्या कॅरेट टोमॅटोला भाव वीस ते तीस रुपये मिळाले. म्हणजेच एका किलोला जवळपास एक ते दीड रुपये इतका मातीमोल बाजार भाव मिळाला. या परिस्थितीमुळे उत्पादन खर्च तर दूरच तोडणी आणि वाहतूक खर्चही अर्धा मिळणार नसल्याने संतप्त होत या शेतकऱ्यांने येवला-नगर राज्य मार्गावर येवल्यातील विंचूर चौफुली येथे टोमॅटो फेकून देत आपला संताप व्यक्त केला. वाहनांच्या खाली टोमॅटो दबल्याने रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत होती.