यजमान पळवण्यावरून नाशिकच्या पुराेहितांमध्ये तुंबळ भांडण
यजमान पळवण्याच्या वादातून नाशिकच्या पंचवटीतील गंगाघाटावर पुरोहितांमध्ये तुंबळ भांडण झाले. यामुळे दशक्रिया व इतर विधींसाठी राज्यभरातून आलेल्या नागरिकांची चांगलीच करमणूक झाली.
नाशिक येथे दक्षिण गंगा गोदावरी दक्षिण वाहिनी होते. त्यामुळे पितरांच्या पिंडदानासाठी नाशिकच्या रामघाटाचे मोठे महत्व आहे. यामुळे येथे राज्यभरातून भाविक पूर्वजांच्या पिंडदान विधीसाठी येत असतात. तसेच अस्थिविसर्जनासाठीही हिंदूंच्या दृष्टीने रामघाटाचे मोठे महत्व आहे. येथे रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी विधी करण्यासाठी पुरोहितांची वतने ठरलेली आहेत. मात्र, बऱ्याचदा नियम मोडून एकमेकांचे यजमान पळवण्याचे प्रकार घडत असतात. अशाच प्रकरणात दोन पुरोहितांमध्ये मोठमोठ्या आवाजात झालेल्या भांडणामुळे गंगाघाटावर विधीसाठी आलेले भाविक तेथे जमा झाले होते. जवळपास अर्धातास हे भांडण सुरू होते.