बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (09:52 IST)

फडणवीसांनी दया, प्रेम, 'करूणा' दाखवली असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यावर अजितदादांनी हात जोडले...

ajit panwar
अधिवेशनाच्या कामकाजाचा तिसरा दिवस उजाडला होता. सोमवारी सकाळी 9.30 वाजता विधानसभेचं विशेष सत्र सुरू झालं. शिंदे आणि ठाकरे यांच्या पक्ष वादाची आज होणारी सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
 
'न्यायमूर्ती रमण्णा निवृत्त झाल्यावरच पुढे काहीतरी होईल असं वाटत असल्याचं काही आमदार सांगत होते. काय होणार मोठ्या घटनापीठाकडे जाणार... मग खटला चालत राहील.' काहीजण असा अंदाज बांधत होते.
 
लक्षवेधी सूचनांमधून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरचे अपघात, खरीप हंगामात आलेला गोगलगायीचा प्रादुर्भाव अश्या अनेक प्रश्नांवर चर्चा होत होती. सभागृहाच्या बाहेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रित कसं काम करतात? काम करताना त्यांचं पटतं का? यावर वेगवेगळ्या ऐकीव चर्चा काहीजण सांगत होते.
 
...आणि सर्व विधानसभा हसू लागली
11 वाजत आले होते. प्रश्नोत्तरांचा तास सुरू होणार होता. पालघरच्या हत्तीरोगाच्या प्रश्नावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना गुरुवारी (18 ऑगस्टला) विरोधी पक्षाने घेरलं होतं. मंत्र्यांना उत्तर देता आलं नाही म्हणून प्रश्न राखून ठेवला होता.
 
पहिलाच राखून ठेवलेला प्रश्न येणार होता. तानाजी सावंत प्रश्नोत्तरे सुरू होण्यापूर्वी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंशी चर्चा करत होते. अधिकार्‍यांनी दिलेली माहिती चाळत तानाजी सावंत उत्तर देत होते. त्यानंतर छगन भुजबळ उभे राहिले.
 
त्यांनी कुठलासा राज्य शासनाचा निर्णय वाचून दाखवला, "उपलब्ध कीटक संहारकाच्या मार्फत डास पकडून, त्याचे वर्गीकरण करणे वगैरे..." त्यानुसार भुजबळ म्हणाले, आतापर्यंत आरोग्य विभागाने किती डास पकडले? त्यात किती नर आणि मादी होते आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले का? छगन भुजबळांच्या या प्रश्नावर विधानसभेच्या अध्यक्षांसह सर्व आमदार हसू लागले. त्यावर अध्यक्ष म्हणाले, इतक्या संशोधनासाठी वेळ द्या. आरोग्य मंत्र्यांना त्यावर काय बोलावं कळेना. मग तानाजी सावंत म्हणाले, 'ही डासांची माहिती घेऊन पटलावर ठेवतो.'
 
अजितदादा कधी तिकडे निघून गेले कळलंच नाही!
प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आणण्यासंदर्भातील विधेयकावर चर्चा सुरू झाली. या विधेयकाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोध करत हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड उठले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णय निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला.
 
ते म्हणाले, "हा निर्णय एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना घेतला होता. सरकार तसंच असतं माणसं बदलत असतात. पण शिंदे तिथेच आहेत. मग त्यांनी निर्णय बदलण्याचं काही विशेष कारण आहे का?"
 
त्यानंतर जयंत पाटील उठले त्यांनी हसत हसत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोले लगावले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी," पाच वर्षात एका मंत्र्याला असं भाषणात contradiction करता येतं का हे सांगावं अशी विचारणा केली. कारण एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयावर उत्तम भाषण केलं होतं. हे contradiction एकाच टर्ममध्ये कसं करता येईल?
 
यावेळी सभागृहात मुख्यमंत्री समोर बसले होते. उपमुख्यमंत्री सभागृहात नव्हते. मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांची टोलेबाजी चेहर्‍यावर हसू ठेवून ऐकत होते. खाली बसून काहीतरी पुटपुटत होते. राष्ट्रवादीचे इतर नेते मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न करताना बघून विरोधी पक्षनेते अजित पवार कसे मागे राहतील.
 
काहीवेळाने अजित पवार उठून म्हणाले, "मग थेट जनतेतून मुख्यमंत्री निवडला असता तरी चाललं असतं. याआधी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. नंतर तुमच्या काय मनात आलं काय माहिती... तुम्ही 20 लोकांना घेऊन गेलात. मग आणखी 20 आमदार तुम्हाला मिळाले. मग तुम्ही ठाकरेंना वजा करून स्वत:चं बहुमत सिद्ध केलं. जर दुसर्‍या कोणाला एकनाथ शिंदे व्हायचं असेल तर ते शक्य नाही. त्यामुळे असं करू नका." तितक्यात छगन भुजबळ म्हणाले, अजितदादा हे आपल्या दोघांच्या मधे बसत होते. पण कधी तिकडे निघून गेले हे कळलंच नाही.
 
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या टोलेबाजीवेळी मुख्यमंत्र्यांनी एकटे पडले की काय हा प्रश्न पडत होता. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोंडसुख घेतले. धनंजय मुंडे यांनी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत बोलताना, "रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचा उल्लेख केला." अनेक आमदार या टोलेबाजीवर हसत होते. पण मुख्यमंत्री सगळी टीका ही ऐकत होते आणि सगळ्यांचे मुद्दे नोट करून घेत होते.
 
फडणवीसांनी दया, प्रेम, 'करूणा' दाखवली म्हटल्यावर, अजितदादांनी हात जोडले...
साधारण दीड तास चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री या विधेयकावर बोलायला उभे राहिले. यावेळी उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. ते विधेयक का आणलं याची कारणं सांगू लागले. "आम्ही निर्णय घेतो तो त्याचे फायदे तोटे बघून.. याआधीही आपण अनेक निर्णय बदलले आहेत."
 
मग आव्हाडांपासून टीकेला उत्तर द्यायला मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं. ते म्हणाले घोडेबाजार होतो. पैशांचा influence एखाद्या वॉर्डपुरता होत असतो. आव्हाड साहेब एखादा पैशांचा influence मुंब्र्यापुरता होईल. पूर्ण ठाणे जिल्ह्यात होऊ शकेल का? सांगा ना.. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसू लागले. जितेंद्र आव्हाडही हसत त्यांचं बोलणं ऐकत होते.
 
मग मुख्यमंत्र्यांनी त्यांचा मोर्चा छगन भुजबळांकडे वळवला. ते म्हणाले, "भुजबळ मगाशी म्हणाले, शिंदे माझ्या आणि अजितदादा आमच्या मधे बसत होते. कधी तिकडे गेले कळलच नाही. आपली चर्चा झाली होती. तुम्ही विचारलं होतं कसं चाललय? मी म्हणालो होतो ओके चाललय एकदम... अजितदादांनाही काही गोष्टी माहिती होत्या. आता अजितदादा काही बोलणार नाहीत. पण ते खासगी आमच्याशी बोलत होते. " यावर अजितदादा जोरदार हसू लागले. (इथे कुठे बोलताय अश्या आविर्भावात अजितदादा हसत होते)
 
मुख्यमंत्री पुढे बोलू लागले," भास्कर जाधव म्हणाले, एकनाथ शिंदेंजी तुम्ही स्वतःचे निर्णय घ्या. मला त्यांना सांगायचं आहे की, मी निर्णय घेण्यास सक्षम आहे. जर सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? कसा करेक्ट कार्यक्रम केला. एक माणूस रोज दोनच शब्द बोलतो. दुसरे शब्दच नाही. अप्रत्यक्ष आदित्य ठाकरेंवर टीका केली. पण आदित्य ठाकरे नेमके सभागृहात नव्हते.
 
पुढे धनंजय मुंडेंवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "धनंजय मुंडेंवर देवेंद्रजींनी विरोधी पक्षनेते असताना दया, प्रेम आणि "करूणा" दाखवली." हे वाक्य बोलल्यावर धनंजय मुंडे यांचा चेहरा पडला. मग अजितदादांनी खाली बसून हसत हात जोडले आणि म्हणाले करा आता विधेयक मंजूर...! सीएम शिंदेही हसत म्हणाले, अजितदादा म्हणतायेत करा विधेयक मंजूर...! त्यानंतर विधेयक मंजूर करण्यात आलं आणि पुढचं कामकाज सुरू झालं.