बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : शनिवार, 23 एप्रिल 2022 (16:07 IST)

साईसच्चरित - अध्याय १२

sai satcharitra chapter 12
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्गुरुसाईनाथाय नम; ॥
जय जय सद्गुरु साईनाथा । नमितों चरणीं ठेवूनि माथा । निर्विकार अखंडैकस्वरूपता । शरणागता कृपा करीं ॥१॥
सच्चिदानंदा आनंदकंदा । भवदवार्ता - सौख्यनिष्पंदा । अद्वैतबोधें द्वैतछंदा । मंदाच्याही वारिसी ॥२॥
अवघ्या ठायीं पूर्ण भरलें । गगन जैसें हें विस्तारलें । तेंचि कीं तव स्वरूप रेखाटलें । अनुभवी भले दैवशाली ॥३॥
साधूंचें व्हावें संरक्षण । असाधूंचें समूळ निर्दळण । एतदर्थचि ईश्वरावतरण । संत हे विलक्षण यापरते ॥४॥
साधु असाधु संतां समान । एक मोठा एक ऊन । हें जाणेना जयांचें मन । समसमान उभयां जे ॥५॥
ईश्वराहूनि संत मोठे । असाधूंसी आधीं लाविती वाटे । मन जयांचें तिळतिळ तुटे । प्रेम दाटे दीनार्थ ॥६॥
भवसागराचे हे अगस्ति । अज्ञानतमाचे हे गभस्ति । परमात्म्याची एथेंच वस्ती । वस्तुत: हे तदभिन्न ॥७॥
ऐशांतील हा साई माझा । अवतरला भक्तकाजा । मूर्तिमंत ज्ञानराजा । कैवल्यतेजाधिष्ठित ॥८॥
जीवमात्रीं अत्यंत ममता । इतरत्र अत्यंत अनासक्तता । ठायीं सत्ता ठायीं विरक्तता । निर्वैर समता सर्वत्र ॥९॥
जया न शत्रु - मित्रभाव । सरिसे जया रंकराव । ऐसा जो साई महानुभाव । ऐका प्रभाव तयाचा ॥१०॥
संत आपुल्या पुण्यकोडी । वेंचिती भक्तप्रेमाच्या ओढीं । न पाहती आड पर्वत दरडी । घाडिती उडी भक्तार्थ ॥११॥
एक अज्ञानी म्हणूनि नेणती । परमार्थ काय काशाशीं खाती । स्त्री - पुत्र - धनकामीं लोलंगती । बिचारीं नेणती तीं सोडा ॥१२॥
ऐसीं नेणतीं बाळींभोळीं । देव तयांतें कृपा कुरवाळी । देवासी विमुख देवानिराळीं । अभिमान पोळी तयांतें ॥१३॥
अज्ञानियांची येईल कींव । संत एकादा लावील जीव । विश्वास प्रकटेल लाठीव । ज्ञानाची ताठीव निष्फळ ॥१४॥
पंडिमंमन्य मूढमती । शुष्काभिमानें उगीच फुगती । भक्तिपंथ अवहेलिती । नको संगती तयांची ॥१५॥
नको वर्णसंकर बंड । नको वर्णाभिमान थोतांड । न व्हा वर्णाश्रमधर्मलंड । पाखंडपंडित न व्हावें ॥१६॥
वेदवेदांगपारंगत । ज्ञानगर्वें मदोन्मत्त । भक्तिमार्गाचे आड येत । तयांची धडगत दिसेना ॥१७॥
अज्ञानी विश्वास - पडिपाडें । तरेल तो भवभय - सांकडें । परी या शास्त्रपंडितांचें कोडें । कदा नुलगडे कवणातें ॥१८॥
संतांपाय़ीं ठेवतां विश्वास । अज्ञानियां अज्ञाननिरास । ज्ञानाभिमानियां न विकल्प सायास । उपजेल तयांस सद्भाव ॥१९॥
असो एकदां सुदैव - परिपाटी । कैसी घडली विचित्र गोष्ट । होती एका कर्मठाचे ललाटीं । अलभ्य भेटी साईंची ॥२०॥
तयाचा संकल्प होता वेगळा । योगायोग होता निराळा । तेणेंचि शिरडीचा लाभ घडला । द्दष्टीस पडला निजगुरु ॥२१॥
तें अति सुरस कथानक । जें गुरुमाहात्म्यप्रकाशक । श्रवण करा जी आवश्यक । प्रेमनिदर्शक गुरुभक्तां ॥२२॥
नाशिक - क्षेत्रस्थ कर्मठ सोंवळे । अग्निहोत्री उपनास ‘मुळे’ । पूर्वपुण्याईच्या बळें । शिरडीस आले एकदां ॥२३॥
गांठीं नसतां हें बळ । शिरडीस कोणीही ठरेना पळ । कोणाचा कितीही निश्चय प्रबळ । न चले चळवळ बाबांपुढें ॥२४॥
कोणी म्हणेल मी जाईन । मन माने तों तेथें राहीन । नाहीं तयाच्या हें आधीन । पराधीन तो सर्वखी ॥२५॥
ऐसें मी मी म्हणतां । थकले कित्येक निश्चय करितां । साई एक स्वतंत्र देवात । गळे अहंता इतरांची ॥२६॥
आपुली पाळी आलियावीण । बाबांसी होईना आपुलें स्मरण । कानीं न येई तद्गुणवर्णन । दर्शन - स्फुरण कोठून ॥२७॥
जावें साईसमर्थ - दर्शना । असतां कित्येकांची कामना । योगचि आला नाहीं त्यांना । साई - निर्वाणापर्यंत ॥२८॥
पुढें जाऊं जाऊं म्हणतां । आड येऊनि दीर्घसूत्रता । राहिले कित्येक येतां येतां । बाबाही निधनता पावले ॥२९॥
आज उद्यां करीत राहिले । अखेर प्रत्यक्ष भेटीस अंतरले । ऐसे पश्चात्ताप पावले । अंतीं नागवले दर्शना ॥३०॥
ऐसियांची जी राहिली भूक । परिसतां कथा या आदरपूर्वक । पुरवील दुधाची तहान ताक । विश्वास एक ठेवितां ॥३१॥
बरें जें भाग्यें कोणी गेले । दर्शन - स्पर्शनें चित्तीं धाले । ते काय तेथें यथेच्छ राहिले । बाबांनीं ठेविलें पाहिजे ॥३२॥
आपुल्यापायीं कोणा न जाववे । राहूं म्हणतां कोणा न राहवे । आज्ञा होई तोंच वसावें । माघारा जावें जा म्हणतां ॥३३॥
एकदां काका महाजनी । शिरडीस गेले मुंबईहुनी । एक आठवडा शिरडीस राहुनी । परतावें मनीं तयांचे ॥३४॥
चावडी सुंदर शृंगारीत । बाबांसमोर पाळणा टांगीर । कृष्णजन्माचा उत्सव करीत । आनंदें नाचत भक्तजन ॥३५॥
गोकुळाष्टमीचाही सोहळा । आनंदानें पहावा डोळाम । साधूनि ऐसी मौजेची वेळा । काका शिर्डीला पातले ॥३६॥
आरंभींच बाबांच्या दर्शना । जातां बाबा पुसती तयांना । “परतणार केव्हां निजसदना” । विस्मित मना तैं काका ॥३७॥
भेटतांक्षणींच हा कां प्रश्न । काका जाहले विस्मयापन्न । राहूं शिरडींत आठ दिन । होतें कीं मन तयांचें ॥३८॥
बाबाचि जेव्हां स्वयें पुसती । उत्तर देणें काकांप्रती । तेंही वाटे बाबाचि सुचाविती । म्हणूनि देती योग्य तें ॥३९॥
“बाबा जेव्हां देतील आज्ञा । परतेन तेव्हां आपुले सदना’ । प्रत्युतर येतांचि काकांच्या वदना । ‘उदयीक जा ना’ म्हणाले ॥४०॥
आज्ञा केली शिरसा । प्रमाण । करूनि बाबांसी अभिवंदन । असतां अष्टमीसारखा सण । केलें प्रयाण तेच दिनीं ॥४१॥
पुढें जंव ते गांवीं येती । पेढीवरती जाऊनि पाहती । मालक मार्गप्रतीक्षाच करिती । काका परतती केव्हां ही ॥४२॥
मुनीस एकाएकीं आजारी । मालकास काकांची जरूरी । काकांनीं त्वरित यावें माघारीं । पत्र शिरडीवरी मोकलिलें ॥४३॥
काका तेथूनि निघाल्यावरी । टपालवाला तपास करी । मग तें पत्र पाठवी माघारी । मिळालें घरीं काकांस ॥४४॥
तेंचि पहा कीं याचे उलट । श्रवण करा ही अल्प गोष्त । भक्तांसी न कळे निजाभीष्ट । साई तें स्पष्ट जाणतसे ॥४५॥
एकदां नाशिदकचे प्रख्यात वकील । नामें भाऊसाहेब धुमाळ । बाबांचे एक भक्त प्रेमळ । आले केवळ दर्शना ॥४६॥
उभ्या उभ्या घ्यावें दर्शन । करूनियां पायीं नमन । घेऊनि उदी आशीर्वचन । जावें परतोन हें पोटीं ॥४७॥
परततां वाटेवर निफाडास । उतरणें होतें धुमाळांस । तेथें एका मुकदम्यास । जाणें तयांस आवश्यक ॥४८॥
हा जरी तयांचा बेत । बाबा जाणत उचितनुचित । परत जावया आज्ञा मागत । बाबा न देत ती त्यांना ॥४९॥
आठवडा एक ठेवूनि घेतलें । आज्ञा देण्याचें स्पष्ट नाकारिलें । सुनावणीचें कार्य लांबलें । तैसेचि गेले तीन वार ॥५०॥
आठवडयावरही कांहीं दिवस । ठेवूनि घेतलें धुमाळांस । इकडे मुकदम्याचे तारखेस । न्यायाधीशास अस्वस्थता ॥५१॥
जन्मांत कधींही नाहीं ठावा । ऐसा पोटशूळ दुर्धर उठावा । मुकदमा अपाप पुढें ढकलावा । काळ लागावा । काळ लागावा सार्थकीं ॥५२॥
असो धुमाळांस साईसहवास । पक्षकाराचा चिंतानिरास । घडून आलें अप्रयास । ठेवितां विश्वास साईंवर ॥५३॥
पुढें मग योग्य कालीं । धुमाळांतें आज्ञा दिधली । कार्यें सर्व यथास्थित झालीं । अघटित केलि साईंची ॥५४॥
मुकदमा चालला चार मास । जाहले चार न्यायाधीश । परी अखेरीस आलें यश । आरोपी निर्दोष सूटला ॥५५॥
एकदां एक भक्तप्रवर । नानासाहेब निमोणकर । कैसा तयांच्या पत्नीचा कैवार । घेतला तो प्रकार परिसावा ॥५६॥
निमोण गांवींचें वतनदार । न्यायाधीशाचा कारभार । सोंपवी जया सरकार । वजनदार हे मोठे ॥५७॥
माधवरावांचे पितृव्य ज्येष्ठ । वयोवृद्ध पूज्य श्रेष्ठा । जायाही मोठी एकनिष्ठ । साईच इष्ट दैवत ज्यां ॥५८॥
सोडूनियां वतनी गांव । शिरडींत दोघांहीं दिधला ठाव । साईचरणीं ठेवूनि भाव । सुखस्वभाव वर्तती ॥५९॥
उठूनियां ब्राम्हामुहूर्तीं । प्रात:स्नान पूजन सारिती । कराया नित्य कांकडआरती । चावडीप्रती तीं येत ॥६०॥
पुढें आपुलीं स्तोत्रें म्हणत । नाना बाबांपाशींच राहात । होई सूर्यास्त तोंपर्यंत । सेवेंत निरत बाबांच्या ॥६१॥
लेंडीवरी बाबांस नेत । मशिदींत आणूनि घालीत । पडेल ती ती सेवा करीत । प्रेमभरित मानसें ॥६२॥
बाईनेंही आपुल्यापरी । करवेल ती बाबांची चाकरी । करावी अतिप्रेमभरीं । दिवसभरी तेथेंच ॥६३॥
मात्र कराया स्नान पान । स्वयंपाक जेवणखाण । अथवा रात्रीं कराया शयन । निजस्थान सेवावें ॥६४॥
बाकी अवशेष सर्वकाळ । द्पार तिपार सांज सकाळ । घालवी हें दंपत्य प्रेमळ  राहूनि जवळ बाबांच्या ॥६५॥
असो या दोघांची सेवा वर्णितां । होईल बहू ग्रंथविस्तरता । म्हणूनि प्रस्तुत विषयापुरता । भाग मी आतां ऐकवितों ॥६६॥
बाईसी जाणें बेलापुरीं । मुलगा तेथें थोडा आजारी । केली पतीच्या विचारीं । तेथें तयारी जाण्याची ॥६७॥
पुढें नित्य क्रमानुसार । बाबांचाही घेतला विचार । पडतांचि बाबांचा होकार । घातला कानावर पतीच्या ॥६८॥
असो ऐसें निश्चितपणें । ठरलें बेलापुरचें जाणें । पुढें पडलें नानांचें म्हणणें । उद्याच परतणें माघारां ॥६९॥
नानांसी होतें कांहीं कारण । म्हणूनि म्हणती तिजलागून । जा परी ये परतोन । दुश्चितमन कुटुंब ॥७०॥
दुसरे दिवशीम पोळ्याची अंवस । तोही तेथेंचि काढावा दिवस । होती बाईच्या मनाची हौस ॥ येईना मनास नानांच्या ॥७१॥
शिवाय अमावास्येचा दिन । अनुक्त करया गमनागमन । बाईस पडलें कोडें गहन । कैसी सोडवण होईल ॥७२॥
बेलापुरास गेल्यावीण । वाटे न तिजला समाधान । दुखवितां न ये पतीचें मन । आज्ञोल्लंघन मग कैंचें ॥७३॥
असो मग केली तयारी । निघाली जावया बेलापुरीं । लेंडीस निघाली बाबांची स्वारी । नमस्कारी तयांतें ॥७४॥
कोणीही बाहेरगांवीं जातां । पावावया निर्विन्घता । देवापुढें खालवी माथा । तीच कीं प्रथा शिरडींत ॥७५॥
परी तेथींचा देव साई । जावयाची कितीही घाई । निघावयाचे समयीं डोई । तयांचे पायीं ठेवीत ॥७६॥
या तेथील क्रमानुसार । साठयांचिया वाडयासमोर । बाबा उभे असतां क्षणभर । बाईनें चरण वंदिले ॥७७॥
नानासाहेब निमोणकर । आदिकरूनि सान थोर । येऊनि तेथें दर्शनतप्तर । करिती नमस्कार बाबांना ॥७८॥
ऐसिया समस्त मंडळीदेखता । विशेषत: नानांचिया समक्षता । बाबा जें वदले बाईस तत्त्वतां । पहावी समयोचितता तयांची ॥७९॥
पायीं ठेवूनियां माथा । निघावयाची आज्ञा मागतां । “जा बरें लवकर जा आतां । स्वस्थ चित्ता असावें ॥८०॥
गेल्यासारखे चार दिवस । सुखी राहीं बेलापुरास । विचारूनियां सर्वत्रांस । माघारी शिर्डीस येईं तूं” ॥८१॥
असो बाबांचें वचन । बाईस अकल्पित शांतवन । निमोणकरांसी पटली खूण । सामाधान उभयतां ॥८२॥
सारांश आपण करावे बेत । आम्हां न जाणवे आदिअंत । हिताहित जाणती संत । कांहींन अविदित तयांतें ॥८३॥
भूत - भविष्य - वर्तमान । करतलामलकवत्‌ तयां ज्ञान । करितां तयांच्या आज्ञेंत वर्तन । सुखसंपन्न भक्त होती ॥८४॥
असो आतां पूर्वानुसंधान । चालवूं मुख्य कथानिरूपण । कैसी मुळ्यांवरी कृपा करून । दिधलें दर्शन गुरूचें ॥८५॥
श्रीमंत बापूसाहेब बुट्टी । हेतु घ्यावी तयांची भेटी । परतोनि जावें उठाउठी । मुळ्यांच्या पोटीं हें होतें ॥८६॥
असो हा जरी त्यांचा हेत । बाबांचा त्यांत अन्य संकेत । तो चमत्कार तें इंगित । सावचित्त परिसावें ॥८७॥
श्रीमंतांची भेट झाली । मंडळी मशिदीलागीं निघाली । मुळ्य़ांनाही इच्छा उदेली । निघाले मंडळीसमवेत ॥८८॥
मुळे षट्शास्त्रीं अध्ययन । ज्योतिर्विद्येंत अतिप्रवीण । सामुद्रिकांतही तैसेचि पूर्ण । रमले दर्शन होतांच ॥८९॥
पेढे बतासे बर्फी नारळ । नारिंगादि फळफळावळ । अमूप अर्पिती जन प्रांजळ । भक्त प्रेमळ बाबांस ॥९०॥
शिवाय तेथें येती माळिणी । जांब केळीं ऊंस घेऊनी । बाबा खरीदिती आलिया मनीं । पैसे देऊनी पदरचे ॥९१॥
पल्लवचा पैका खर्च करीत । आंब्याच्या पाटया खरेदीत । केळींही उमाप आणवीत । वांटीत मनसोक्त भक्तांना ॥९२॥
एकेक आंबा घेऊनि करीं । धरूनि दोन्ही तळहस्ताभ्यंतरीं । चोळूनि मऊ झालियावरी  भक्तांकरीं मग देत ॥९३॥
आंबा लावितां ओठीं । रस एकदांच उतरावा पोटीं । जैसी भरली रसाची वाटी । साल बाठी फेंकावी ॥९४॥
केळ्यांची तो अपूर्व शैली । भक्तांनीं घ्यावी गर्भनव्हाळी । बाबांनीं सेवाव्यात तयांच्या साली । काय त्या केली अद्भुत ॥९५॥
हीं सर्व फळें आपुले हातीं । बाबा तेथें अवघ्यांसी वांटिती । कोकालीं आलिया चित्तीं । स्वयें चाखिती एकादें ॥९६॥
या क्रमाचिया परिपाटीं । केवळ भक्तजनांचियासाठीं । खरीदूनि केळियांची पाटी । बाबा वांटीत होते तैं ॥९७॥
शास्त्रीबुवांस आश्चर्य गहन । जाहलें देखूनि बाबांचे चरण । ध्वज - वज्रांकुश - रेखा - निरीक्षण । करावें मन जाहलें ॥९८॥
भक्त काकासाहेब दीक्षित । होते तेव्हां निकटस्थित । उचलूनि चार रंभाफळें देत । बाबांचे हातांत तेधवां ॥९९॥
कोणीं बाबांस बहु विनविलें । बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्री मुळे । पातले चरणीं पुण्यबळें । प्रसाद - फळें द्या कीं यां ॥१००॥
विनवा कोणी वा न विनवा । बाबांचे आलियावीण जीवा । कोणातें कांहीं न देती ते केव्हां । करिती तेव्हां काय ते ॥१०१॥
केळीं न, मुळे हात मागती । तदर्थ पुढें हात पसरिती । बाबा न तिकडे चित्त देती । प्रसाद वांटिती सकळिकां ॥१०२॥
मुळे बाबांस करिती विनंती । फळें नको हात द्या मागती । पाहूं येतेंसामुद्रिक वदती । बाबा न देती त्यां हात ॥१०३॥
तरीही मुळे पुढें सरकत । सामुद्रिकार्थ हात लांबवीत । बाबा न तिकडे ढुंकून पहात । जणूं नाहींत गांवींचे त्या ॥१०४॥
पसरिल्या मुळ्यांचे हातीं । बाबा तीं चार केळीं ठेविती । बसा म्हणती परी न देती । मुळ्यांचे हातीं निजहस्त ॥१०५॥
आजन्म ईश्वरार्थ झिजविला काय । तयसी सामुद्रिकीं कर्तव्य काय । अवाप्तसकळकाम साईराय । सद्भक्तां मायबाप जो ॥१०६॥
पाहूनि बाबांची नि:स्पृह स्थिति । सामुद्रिकार्थ उदासीनवृत्ति । शास्त्रीबुवा हस्त आवरिती । नाद टाकिती बाबांचा ॥१०७॥
कांहीं वेळ स्वस्थ बैसले । मंडळीसमवेत वाडयांत गेले । स्नान केलें सोवळें ल्याले । आरंभूं सरले अग्निहोत्र ॥१०८॥
इकडे नित्यक्रमानुसार । बाबा निघाले लेंडीवर । म्हणती गेरू घ्या रे बरोबर । भगवें अंबर परिधानूं ॥१०९॥
सर्वांस वाटला चमत्कार । गेरूचें बाबा काय करणार । जो तो करूं लागे विचार । गेरू स्मरला आज कां ॥११०॥
बाबांची ऐसीच संदिग्ध वाणी । काय अर्थ जाणावा कोणीं । परी आदरें सांठविल्या श्रवणीं । अर्थश्रेणी वोगरिती ॥१११॥
कीं ते संतांचे बोल । कधींही जे नसणार फोल । अर्थभरित सदा सखोल । करवेल मोल कवणातें ॥११२॥
आधीं विचार मग उच्चार । हा तों नित्याचा व्यवहार । उच्चारामागें आचार । संत साचार आदरिती ॥११३॥
या सर्वमान्य सिद्धांतानुसार । संतवचन कधीं न नि:सार । घ्यानीं धरूनि पडताळितां फार । पडे वेळेवर उकल त्या ॥११४॥
असो इकडे बाबा परतले । निशाणी शिंग वाजूं लागलें । बापूसाहेबवांचे सोवळेपणाला । प्रसंग वाटला अवघड तो ॥११६॥
वदती मग प्रत्युत्तरीं । घेऊं दर्शन तिसरे प्रहरीं । लागले जोग मग ते अवसरीं । करुं तयारी आरतीची ॥११७॥
इकडे बाबा परत येवोनी । बैसले बोलत जों निजासनीं । तों सर्वांच्या पूजा होऊनी । आरती स्थानीं थाटली ॥११८॥
इतुक्यांत बाबा म्हणती आणा । त्या नव्या बामणाकडून दक्षिणा । बापूसाहेब बुट्टीच तत्क्षणां । गेले दक्षिणा मागावया ॥११९॥
नुकतेच मुळे करूनि स्नान । सोवळें वस्त्र करूनि परिधान । बैसले होते घालूनि आसन । स्वस्थ मन करूनियां ॥१२०॥
निरोप परिसतां ते अवसरीं । विक्षेप दाटला मुळ्यांचे अंतरीं । दक्षिणा किमर्थ म्यां द्यावी तरी । मी अग्निहोत्री निर्मळ ॥१२१॥
असतील बाबा मोठे संत । परी मी काय तयांचा अंकित । मजपाशीं कां दक्षिणा मागत । जाहलें दुश्चित्त मन तेणें ॥१२२॥
साईंसारिखे दक्षिणा याचिती । कोटयधीश निरोप आणिती । मूळे जरी मनीं शंकती । दक्षिणा घेती समवेत ॥१२३॥
आणीक संशय तयांचे मनीं । आरब्धकर्म अपूर्ण टाकुनी । जावें केवीं मशिदीलागुनी । नाहीं म्हनूनही म्हणवेना ॥१२४॥
संशयात्म्यास नाहीं निश्चिती । सदा दोलायमान चित्तीं । तयां न ही ना ती गती । त्रिशंकु स्थिति तयांची ॥१२५॥
तथापि मग केला विचार । जावयाचा केला निर्धार । गेले सभामंडपाभीतर । राहिले दूर ते उभे ॥१२६॥
आपण सोवळे मशीद ओवळी । जावें कैसें बाबांजवळी । लांब राहूनि बद्धांजळी । पुष्पांजळी फेंकिती ॥१२७॥
इतुक्यांत ऐसा चमत्कार । झाला तयांचे द्दष्टीसमोर् । बाबा अद्दश्य गादीवर । घोलप गुरुवर दिसले तैं ॥१२८॥
इतरांस नित्याचे साईसमर्थ । मुळ्यांचे डोळां घोलपनाथ । ते जरी पूर्वींच ब्रम्हीभूत । आश्चर्यचकित बहु मुळे ॥१२९॥
गुरु जरी वस्तुत: समाधिस्थ  । तेही जैं द्दष्टिगोचर भासत । तेणें मुळे अति विस्मित । तैसेचि साशंकित मानसीं ॥१३०॥
स्वप्न म्हणावें नाहीं निजेला । जागृति तंब गुरु कैसा ठेला । संभ्रम केउता जीवीं उठला । बोल खुंटला क्षणभरी ॥१३१॥
आपुला आपण घेई चिमटा । म्हणे नव्हे हा प्रकार खोटा । किमर्थ मना हा संशय फुकटा । सर्वांसकटा मी येथें ॥१३२॥
मुळे मूळचे घोलपभक्त । बाबांविषयीं जरी शंकित । परी झाले पुढें अंकित । अकलंकित मानसें ॥१३३॥
स्वयें वर्णाग्रज ब्राम्हाण । वेदवेदांगशास्त्रसंपन्न । मशिदींत घोलपदर्शन । विस्मयापन्न जाहले ॥१३४॥
मग वरती गेले चढोन । निजगुरूचे चरण वंदून । उभे राहिले कर जोडून । वाचेसी मौन पडियेलें ॥१३५॥
भगवीं वस्त्रें भगवी छाटी । घोलपस्वामी देखोनि द्दष्टी । धांवोनि पायीं घातली मिठी । उठाउठीं मुळ्य़ांनीं ॥१३६॥
तुटला उच्चवर्णाभिमान । पडलें डोळियांमाजीं अंजन । भेटतां निजगुरु निरंजन । निधानसंपन्न ते झाले ॥१३७॥
हरपली विकल्पवृत्ति । जडली बाबांबरी प्रीति । अर्धोन्मीलित नेत्रपातीं । टक लाविती साईपदीं ॥१३८॥
अनंत जन्मींचें सुकृत फळलें । द्दष्टी पडलीं साईंचीं पाउलें । चरणतीर्थीं स्नान घडलें । दैव उघडलें वाटलें ॥१३९॥
आश्चर्य केलें सकळिकीं । हें काय घडलें एकाएकीं । जाऊनि फुलांची फेंकाफेंकी । पायीं डोकी ठेविती कां ॥१४०॥
इतर म्हणती बाबांची आरती । मुळे घोलप नामें गर्जती । उंचस्वरें त्यांचीच आरती गाती । रंगीं रंगती सप्रेम ॥१४१॥
सोवळ्याची सांडिली स्फीती । स्पर्शास्पर्शाची विराली स्फूर्ती । साष्टांग दंडायमान होती । डोळे मिटती आनंदें ॥१४२॥
उठल्यावरी डोळे उघडितां । घोलप - स्वामींसी अद्दश्यता । त्यांचे स्थानीं साई समर्था । दक्षिणा मागतां देखिलें ॥१४३॥
पाहोनि बाबांची आनंददमूर्ति । आणि तयांची ती अतर्क्यशक्ति । तटस्थ झाली चित्तवृत्ति । मुळे निजस्थिति विसरले ॥१४४॥
ऐसें हें महाराजांचें कौतुक । देखतां हरली तहान भूक । जाहलें निजगुरु - दर्शनसुख । परम हरिख मुळ्यांना ॥१४५॥
जाहलें मानसीं समाधान । घातलें बाबांसी लोटांगण । आनंदाश्रूंस भरतें येऊन । मस्तकीं चरण वंदिले ॥१४६॥
दक्षिणा काय होती ती दिधली । पुनश्च डोई चरणीं ठेविलीं । नयनीं प्रेमाचीं आसुवें आलीं । तनु झाली रोमांचित ॥१४७॥
सद्नादित कंठ झाला । अष्टभाव मनीं दाटला । म्हणती मनींचा संशय फिटला । वरी भेटला निजगुरु ॥१४८॥
पाहोनि बाबांची अलौकिक लीला । मुळ्यांसह सर्व जन गहिंवरला । गेरूचा अर्थ विशद झाला । अनुभव आला तेधवां ॥१४९॥
हेचि महाराज हेचि मुळे । आश्चर्य कैसें येचि वेळे । कोण जाणे महाराजांचे कळे । अगाध लीळे तयांचे ॥१५०॥
ऐसेचि एक मामलतदार । धरूनि साईदर्शनीं आदर । सवें घेऊनि मित्र डॉक्टर । निघाले शिरडीस यावया ॥१५१॥
डॉक्टर ज्ञातीनें ब्राम्हाण । रामोपासक आचारवान । स्नानसंध्या - विहिताचरण । नेमनिर्बंधनीं आवड ॥१५२॥
साईबाबा मुसलमान । आपुलें आराध्य जानकीजीवन । आधींच स्नेह्यासी ठेविलें सांगून । नाहीं मी नमन करणार ॥१५३॥
मुसलमानाच्या पायीं नमन । करावया हें घेईना मन । म्हणूनि शिरडीस करावया गमन । प्रथमपासून शंकित मी ॥१५४॥
“पायां पडा” हा कोणीही आग्रह । धरणार नाहीं ऐसा दुराग्रह । करूनि घेऊं नका हा ग्रह । करा हा निग्रह मनाचा ॥१५५॥
“करावा मातें नमस्कार” । बाबाही न कधीं वदणर । आश्वासितां हें मामलतदार । प्रकटला आदर गमनार्थीं ॥१५६॥
ऐसा द्दढनिश्चय करून । मानूनि आपुले मित्राचें वचन । विकल्प अवघा दूर सारून । निघाले दर्शन घ्यावया ॥१५७॥
परी आश्चर्य जैं शिरडीस आले । दर्शनार्थ मशिदींत गेले । आंरभीं त्यांनींच लोटांगण घातलें । विस्मित झाले बहु स्नेही ॥१५८॥
तंव ते पुसती तयांतें । कैसे विसरलां कृतनिश्चयातें । आम्हांआधींच लोटांगणातें । मुसलमानातें घातलें कैसें ॥१५९॥
मग ते डॉक्टर कथिती नवल । रामरूप म्यां देखिलें श्यामल । तें मीं तात्काळ वंदिलें निर्मल । सुंदर कोमल साजिरें ॥१६०॥
तेंचि पहा हें आसनस्थित । तेंचि हें सर्वांसवें बोलत । म्हणतां म्हणतां क्षणार्धांत । दिदूं लागत साईरूप ॥१६१॥
तेणें डॉक्टर विस्मयापन्न । म्हणावें तरी हें काय स्वप्न । म्हणे हे कैंचे मुसलमान । योगसंपन्न अवतारी ॥१६२॥
चोखामेळा जातीचा महार । रोहिदास हा तों चांभार । सजन कसाई हिंसा करणार । जातीचा विचार काय यांच्या ॥१६३॥
केवळ जगाचिया उपकारा । चुकवावया जन्ममरणांचा फेरा । त्यागूनि निर्गुणा  निराकारा । आले हे आकारा संत जगीं ॥१६४॥
हा तों प्रत्यक्ष कल्पद्रुम । क्षणांत साई क्षणांत राम । माझा दंडिला अहंभ्रम । दंडप्रणाम करवूनि ॥१६५॥
दुसरे दिवशीं घेतलें व्रत । कृपा न करितां साईनाथ । पाऊल न ठेवणें मशिदींत । बैसले उपोषित शिरडींत ॥१६६॥
ऐसे क्रमिले दिवस तीन । पुढें उगवतां चौथा दिन । काय घडलें वर्तमान । दत्तावधान परिसा तें ॥१६७॥
वास्तव्य ज्याचें खानदेशांत । ऐसा एक अकस्मात । स्नेही तयांचा पातला तेथ । दर्शनार्थ साईंच्या ॥१६८॥
नऊ वर्षांनीं जाहली भेटी । परमानंद माईना पोटीं । डॉक्टरही गेले उठाउठी । तयाचे पाठीं मशिदीस ॥१६९॥
जातांचि घातला नमस्कार । बाबा पुसती कां डॉक्टर । कोणी आला का बोलाविणार । आलासी कां उत्तर देईं मज ॥१७०॥
ऐकूनि ऐसा वर्मी प्रश्न । डॉक्टर गेले विरघळून । जाहलें कृतनिश्चयाचें स्मरण । अनुतापखिन्न अंतरीं ॥१७१॥
परी ते दिवशीं मध्यरात्रीं । कृपा जाहली तयांवरी । परमानंदस्थितीची  माधुरी । निद्रेमाझारी चाखिली ॥१७२॥
पुढें डॉक्टर स्वग्रामा परतती । तरी ती संपूर्णस्वानंदस्थिति । संपूर्ण पंधरा दिन अनुभविती । वाढली भक्ति साईपदीं ॥१७३॥
ऐसेचि साइंचे अनेक अनुभव । सांगूं येतील एकेल अभिनव । वाढेल बहुत ग्रंथगौरव । विस्तरभयास्तव आवरितों ॥१७४॥
आरंभींची मुळ्यांची कथा । परिसतां विस्मय श्रोतियां चित्ता । परी येथील तात्पर्यार्थता । तैसीच बोधकता आकळिजे ॥१७५॥
जो जो जयाचा गुरु असावा । त्याचेचि ठायीं द्दढ विश्वास बसावा । अन्यत्र कोठेंही तो नसावा । मनीं ठसावा गुह्यार्थ हा ॥१७६॥
याहूनि अन्य कांहीं हेतु । दिसेना या बाबांचे लीलेआंतु । कोणी कसाही विचारवंतु । असो परंतु अर्थ हाचि ॥१७७॥
कोणाची कीर्ति कितीही असो । आपुले गुरूची मुळींही नसो । परी स्वगुरु-ठायींच विश्वास वसो । हाचि उपदेशो येथिला ॥१७८॥
पोथी पुराण धुंडूं जातां । हाचि उपदेश भरला तत्त्वतां । परी ऐसी खूणगांठ न पटतां । निष्ठा वठतां वठेना ॥१७९॥
नसोनि आत्मनिश्चय वरिष्ठ । मिरविती आपण आत्मनिष्ठा । त्यांच्या जन्माचे अवघे कष्ट । दिसती स्पष्ट ठायीं ठायीं ॥१८०॥
‘इदं च नास्ति परं च ना’ । आजन्म सदैव विवंचना । स्थैर्य लाभेना क्षणैक मना । मुक्ताच्या वल्गना करिताती ॥१८१॥
असो पुढील अध्यायाची गोडी । याहूनि आढळेल चोखडी । केवळ साईदर्शनपरवडी । आनंदनिरवडी भोगवी ॥१८२॥
भक्त भीमाजी पाटील ऐसा । क्षयरोग तयाचा घालविला कैसा । भक्त चांदोरकरांचा भरंवसा । द्दष्टांतासरिसा पटविला ॥१८३॥
ऐसा केवळ दर्शनप्रताप । ऐहिकांचें लावी माप । आमुष्मिकही देई उमाप । दर्शनें निष्पाप करी जो ॥१८४॥
करी जैं योगियाचा द्दष्टिपात । नास्तिकांसही पापनिर्मुक्त । आस्तिकांची तैं काय मात । पापपरिच्युत सहजेंचि ॥१८५॥
तत्त्वीं जयाची बुद्धि स्थिर । झाला जया अपरोक्ष साक्षात्कार । जो होय तयाचे द्दष्टिगोचर । पाण दुस्तर तरला तो ॥१८६॥
ऐसी बाबांची कळा अकळ । बाबा तुम्हांलागीं प्रेमळ । म्हणोनि जाणते नेणते सकळ । होऊनि निर्मळ श्रवण करा ॥१८७॥
जेथें भक्तिप्रेमाचा जिव्हाळा । जेथें जीवासी बाबांचा लळा । तेथेंचि प्रकटे खरा कळवळा । श्रवणाचा सोहळा तेथेंच ॥१८८॥
हेमाड नमितो साईचरणां । वज्रपंजर जे अनन्यशरणां । पार नाहीं तयांचा कवणा । भवभयहरणा शक्त जे ॥१८९॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । श्रीसंतघोप - रामदर्शनं नाम द्वादशोऽध्या: संपूर्ण: ॥
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥