सिंधूची सईद मोदी स्पर्धेतून माघार
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने सईद मोदी इंटरनॅशनल वर्ल्ड टूर सुपर सिरीज 300 स्पर्धेतून माघार घेतली आहे. चीनमध्ये होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्या (बीडब्ल्यूएफ) वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेच्या तयारीसाठी तिने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती तिच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली.
बीडब्ल्यूएफची वर्ल्ड टूर फायनल ही स्पर्धा 12 ते 16 डिसेंबर या कालावधीत चीनमध्ये होणार आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असल्याने पी.व्ही. सिंधू या स्पर्धेसाठी सरळ पात्र ठरली आहे. याबाबत माहिती देताना तिच्या वडिलांनी सांगितले की, सिंधूने सईद मोदी स्पर्धेतून माघार घेण्याची परवानगी मिळण्यासाठी बॅडमिंटन फेडरेशन इंडियाकडे पत्र पाठवले आहे. तिने यात वर्ल्ड टूर फायनल्सच्या तयारीचे कारण दिले आहे. तिने याची माहिती देत सईद मोदी स्पर्धेच्या आयोजकांना आणि आपले प्रशिक्षक पी. गोपीचंद यांना देखील आपला निर्णय कळविलेले असल्याचे तिच्या वडिलांनी यावेळी नमूद केले आहे.
रिओ ऑलम्पिक मध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने त्या स्पर्धेपासून आपला खेळ नेहमीच उंचावला आहे. या मोसमात तिने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक, ऑल इंग्लंड ओपन अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक आणि अशियाई स्पर्धेत रौप्यपदक कमविले आहे. यावेळी पुढे बोलताना पी .व्ही. रामण्णा यांनी सांगितले की, वर्षाअखेरच्या या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये पदक मिळविण्यासाठी किमान 20 दिवसांचा सराव हवा आहे. त्यामुळे तिला चांगल्या लयीत येण्यास मदत होईल आणि ती पदक जिंकण्यास सक्षम बनेल.