बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By संदीप पारोळेकर|

प्रेमाचा सिग्नल ओळखा!

'प्रेम' ही आपल्या मनातील अतिशय तरल भावना आहे. प्रेम एखादा कवी त्याच्या काव्यात व्यक्त करतो, लेखक कथेचे रूप देतो तर चित्रकार विविध रंगानी ते रेखाटत असतो. मात्र, आजचा आधुनिक प्रेमवीर स्वत:ला वाटेल तशा पध्दतीने ते व्यक्त करत असतो. प्रेमात दोघांकडून 'ग्रीन सिग्नल' असेल तरच ते फुलते. एकाच बाजूने सिग्नल म‍िळत असेल तर 'एक्सीडेन्ट हो गया, रब्बा रब्बा...' अशी म्हणायचीही वेळ येते. प्रेम व्यक्त करण्यापूर्वी समोरच्याकडून मिळणारा सिग्नल हा 'ग्रीन' आहे किंवा 'रेड' आहे तो ओळखले पाहिजे.

आपण ज्या मुलीवर प्रेम करतो त‍िनेही आपल्यावर प्रेम करायला हवे, हा हट्ट धरणे योग्य नाही. कधी तरी ती आपल्या प्रेमाला समजून घेईल, सब्र का फल मिठा होता है, असे म्हणत आयुष्य घालविणारे 'देवदास'ही मोठ्या संख्येने आहेत. 'तो' किंवा 'ती' आपलं प्रेम समजून घेईपर्यंत किती जणांना आपण विनाकारण मनस्ताप देत असतो. असे विषय वास्तव जीवनात नाही तर एखाद्या कथेचे किंवा 'एक विवाह ऐसा भी', 'क्या यही प्यार है' या सारख्या चित्रपटांचे विषय होऊ शकतात. कारण कल्पनेच्या आधारे ते रंगविलेले असतात. 'जीवन' हे स्वप्नात जगता येत नाही, जीवन जगताना वास्तव परिस्थितीचे भान ठेऊन तिच्याशी सामना करावा लागत असतो. परंतु प्रेमाने पछाडलेल्या 'त्याला' व 'तिला' हे सांगेल कोण?

प्रेमात पडणारं वय हे आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचं वय असतं. हे वय आपलं आयुष्य घडवत असतं तसं उद्‍धवस्तही करत असतं.

प्रेम हे केवळ एकच बाजून फुलत नसून दोन्ही बाजूंनी फुलत असतं. आपल्याला जर समोरच्या व्यक्तीकडून सकारात्मक संकेत मिळत नसेल तर त्याच्या विषयी प्रेम व्यक्त करून मनस्तापाशिवाय आपल्या पदरात काहीच पडणार नाही.

एकतर्फी प्रेमातून चांगलं घडण्याऐवजी वाईटच घडत असतं. प्रेमाच्या एका ऋतु मागून दुसरा ऋतू येत असतो. प‍िवळी झालेली पाने गळून पडतात तर त्या जागी हिरवी पालवी फुटते. प्रेम हे अचानक होत असतं, जबरदस्तीचा सौद्यात नेहमी घाटा सहन करावाच लागतो. आपला 'देवदास' होऊ नये म्हणून प्रेम व्यक्त करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीत आपल्याविषयी प्रेम आहे किंवा नाही हे ओळखणे आवश्यक आहे.