1. धर्म
  2. मुस्लिम
  3. मुस्लिम धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

ईद-उल्-जहा' परमेश्वरासाठी असिम बलिदान

बकरी ईद. यालाच 'ईद-उल्-जुहा' म्हटले जाते. परमश्रेष्ठ परमेश्वराच्या भक्तीमार्गात केल्या गेलेल्या अस्सीम त्यागाचे 'ईद-उल्-जुहा' हे प्रतीक आहे. अरबी महिन्याच्या 'जिल्काद' या महिन्यामध्ये हा सण मुस्लिम धर्मियांमध्ये अखिल विश्वात साजरा केला जातो. 

मुस्लिम धर्मात मुख्‍य पाच अनिवार्य कर्तव्ये आहेत यात परमेश्वर व त्याचे प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी श्रद्धा, नमाज, रोजा, जकात व हज यांचा समावेश आहे. पैकी हज हे कर्तव्य ज्याची कुवत आहे अशांसाठी आहे. या कर्तव्यात मक्का येथे जाऊन 'खान-ए-काबा'चे दर्शन घेणे, तसेच अराफात व मुजदलिफा या ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन घेणे यांचा समावेश यात आहे. याबरोबरच परमश्रेष्ठ अल्लाहच्या मार्गात बकरी किंवा उंटाचे बलिदान देणे यांचा अंतर्भाव आहे. इस्लामचे आद्य प्रेषित हजरत इब्राहिम हे परमश्रेष्ठ अल्लाहचे निस्सीम भक्त होते. अल्लाहच्या मार्गात त्यांनी आपली सर्व संपत्ती व परिवाराचा त्याग केला. त्या गोष्टीचे स्मरण सर्व मुस्लिम बांधवांच्या अंगी बाणवण्याकरिता 'ईद-उल-जुहा'साजरी केली जाते. परमश्रेष्ठ ‍अल्लाहने हजरत इब्राहिम (प्रेषित) यांच्या स्वप्नात येऊन पुत्र ईस्माईल (प्रेषित) याचे बलिदान दे, अशी आज्ञा केली होती. सलग तीन दिवस त्यांना स्वप्नात आपला मुलगा ईस्माईल यांना बळी देण्याविषयी ईशआज्ञा होत होती.

परमेश्वरावरील असिम भक्ती व प्रेमासाठी त्यांनी आपल्या एकुलत्या एक व उतरत्या वयात झालेल्या पुत्रास परमेश्वरासाठी बळी देण्याचे ठरवले. यासाठी पत्नी हाजरा व पुत्र ईस्माईल यांनीही त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे ठरवले. बलिदानावेळी पुत्रप्रेम आडवे येऊन परमेश्वर कर्तव्यात अडसर येऊ नये यासाठी पुत्र ईस्माईल यांनी वडिलांना डोळ्यावर पट्टी बांधण्यास सुचवले. मक्काच्या पर्वतराजीमध्ये एका मोठ्या शिळेवर पुत्राचा बळी देण्यासाठी त्यांनी पुत्राच्या गळ्यावर सुरी चालवली.

परमश्रेष्ठ अल्लाह या भक्कीने स्तिमित व प्रसन्न झाले व पुत्राच्या ठिकाणी त्यांनी देवदूताकरवी एका बोकडास अवतरीत केले. याच प्रसंगास अनुसरून परमेश्वरभक्ती, परमेश्वर प्रेमापोटी बलिदानाचे एक प्रतीक म्हणून 'ईल-उल-जुहा' साजरी करण्याची प्रथा पडली. या अनुषंगाने 'हज यात्रा' केली जाते. सौदी अरेबिया येथील 'मक्का' या पवित्रस्थानी ही घटना घडली. जगभरातील मुस्लिम बांधव या ठिकाणी हजसाठी या स्मृतिप्रीत्यर्थ एकत्र येतात व या घटनेचे स्मरण करतात. याबरोबरच अंतिम न्यायाचे ठिकाण 'अराफात' तसेच 'मुजदलिफा' या ठिकाण्यास भेट देतात. मुजदलिफाच्या वाटेवर हजरत इब्राहिम पुत्राला बळी देण्यासाठी घेऊन जाताना सैतानाने त्यांच्या मनात पुत्रप्रेम जागवून परमेश्वर भक्तीपासून दूर करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला होता.  

हजच्या दरम्यान याच ठिकाणी सैतानास हाजी लक कंकर (दगडाचे लहान तुकडे) मारण्याचे कर्तव्य पार पाडतात, हाही हज यात्रेचा एक कार्यभाग (अरकान) आहे. 'ईद-उल-जुहा'च्या अनुषंगाने प्रत्येक पित्यास त्यांच्या पुत्रापोटी परमेश्वरास बळी देऊन बकरी किंवा उंटाचे मांस समान तीन हिश्श्यांमध्ये गोरगरीब व अनाथ, आप्त व नातेवाईक आणि स्वत: व शेजारी यांना वाटप करावे लागते व त्यांनाही या सणाच्या निमित्ताने मित्रांसह सामिष मांसाहारी जेवणाची संधी मिळते. 'ईद-उल-जुहा'चा सण तीन दिवस साजरा केला जातो. यात परमेश्वरासाठी 'कुरबानी' म्हणजे बलिदानास महत्त्व आहे. खरेतर आपल्या प्रिय गोष्टीचे बलिदान परमेश्वरास प्रिय आहे. हाच संदेश आपणास 'ईद-उल-जुहा'मधून मिळतो. दैनंदिन जीवनात आपण माझे कुटुंब, माझी संपत्ती, मालमत्ता यांच्याशी घनिष्ठ होतो. यामुळे आपली वृत्ती संकुचित होते. परमश्रेष्ठ अल्लाह(परमेश्वर) आपल्याला प्रिय असणार्‍या गोष्टी प्रसंगी हिरावून आपली परीक्षा घसत असतो. जो या कसोटीत पूर्णपणे उतरतो तोच खरा मुस्लिम (भक्त) म्हणून परमेश्वराच्या प्रेमास पात्र होतो.

-रियाज मुजावर