सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

दहावी-बारावी निकाल: मुलाच्या 60 टकक्यांचं कौतुक करणाऱ्या या आईची पोस्ट झाली व्हायरल

दरवर्षी प्रमाणे पुन्हा दहावी-बारावीचे निकाल आले, पुन्हा शेकडो विद्यार्थ्यांना 90, 92, 95 टक्के मार्क मिळाले. काहींना तर अगदी 99 आणि 100 टक्केही मिळाले. या वर्षीच्या CBSEच्या परीक्षेत तर तब्बल 13 विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 मार्क मिळाले.
 
एवढे मार्क्स मिळाल्यावर या मुलांच्या घरी किती आनंद झाला असेल, नाही?
 
अभिनंदन करणाऱ्याच्या रांगा लागतात. पेढे वाटले जातात. यशस्वी झालेल्या मुलांची आणि आईवडिलांची मुलाखत घेण्यासाठी पत्रकार घरी येतात. मुलांनी पहिला क्रमांक पटकावल्यावर कसं वाटतं, असं सगळं विचारलं जातं आणि दुसऱ्या दिवशी माध्यमांमध्ये मोठे फोटो येतात.
 
पण 60 टक्के मार्क्स मिळवणाऱ्या मुलांच्या घरी काय वातावरण असेल? काहींचे वडील त्यांच्याकडं डोळे वटारून पाहत असतील? तर काहींची आई चिडलेली असेल?
 
पण दिल्लीच्या एका आईने मात्र एक नवा आदर्श घालून दिला आहे.
दिल्लीच्या वंदना सुफिया कटोच यांची फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. आपल्या मुलाला दहावीच्या परीक्षेत 60 टक्के गुण मिळवल्याबद्दल त्यांनी तोंडभरून कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली आहे, जी सध्या सर्वत्र चर्चेत आलं .
 
आजकाल दहावी-बारावीत मुलं 80-90 टक्के मार्क्स मिळवत आहेत. 60 टक्के मिळवणाऱ्या मुलांचं कौतुक होणं, हे आपण सहसा ऐकत नाही. पण वंदना यांनी मुलाला मिळालेल्या टक्केवारीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
 
 
फेसबुक पोस्टमध्ये त्या लिहितात, "मला तुझा अभिमान आहे, माझ्या मुला. तू दहावीच्या परीक्षेत 60 टक्के मार्क्स मिळवलेत. मला माहितीये की हे 90 टक्के नाहीत. पण त्याने काहीही फरक पडत नाही, कारण मी तुझा संघर्ष पाहिलाय. प्रत्येक विषयात तुला खूप अडचणी आल्या. तू (परीक्षेतून) माघार घ्यायचंही ठरवलं होतं, पण शेवटच्या दीड-दोन महिन्यात तू पुन्हा प्रयत्न केलास.
 
तुला सलाम आहे, आमेर... तुला आणि तुझ्यासारख्या अनेकांना जे खरंतर मासे आहेत पण त्यांचं मूल्यांकन त्यांच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवरून केलं जातं," असं त्या या पोस्टमध्ये लिहितात.
वंदना यांनी ही पोस्ट टाकल्यावर काही तासांत ती व्हायरल झाली. अनेकांनी त्यांचं कौतुक केलं पण काहींनी आमेरवर प्रश्नही उपस्थित केले. मुलानं वर्षभर काहीही केलं नाही, शेवटच्या दीड महिन्यात फक्त अभ्यास केला. सुरुवातीपासूनच असं केलं असतं तर असं झालं नसतं, असं त्यांचं म्हणणं होतं.
 
पण वंदना यांच्यामते मुलांना कमी मार्क्स मिळाले तर त्यांनी वर्षभर उनाडक्या मारल्या, अशी पालकांची आणि इतरांची मानसिकता असते. पण प्रत्येकवेळी असं असू शकत नाही.
 
"सगळी मुलं एकसारखी नसतात. त्यांच्यामागे एकच कारण असू शकत नाही," असं त्या सांगतात.
 
आमेरसाठी किती अवघड होती परीक्षा?
मागचं वर्षं केवळ आमेरसाठीच नाही तर स्वत:साठीही आव्हानात्मक होतं, असं वंदना सांगतात.
 
"मी खूप वेळा दु:खी झाले. रडायलाही यायचं कधीकधी. पण शेवटी आम्ही ठरवलं, विषयांचे छोट-छोटे भाग केले. प्रयत्न सोडले नाहीत," असं वंदना सांगतात.
 
आमेरला मानसिक तणावाचा सामना करावा लागल्यानं त्याच्यासमोरची आव्हानं आणखीनच वाढली. "मी रोज त्याचा संघर्ष बघायची. तो खूप अभ्यास करायचा, पण काहीही फायदा होत नव्हता."
इतर मुलांना भरपूर मार्क्स पडल्यावर कसं वाटलं?
"मी कधीही माझ्या मुलाची कुणाशी तुलना केली नाही. इतर मुलांना 90 टक्के मार्क्स मिळाल्यावर वेगळं वाटतं. पण माझ्या मुलाची गोष्ट वेगळी आहे. त्याला चांगले गुण मिळवण्यापेक्षा वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत."
 
पण चांगले मार्क्स मिळालेली मुलं आणि त्यांचे आईवडील जेव्हा रडताना दिसतात, तेव्हा वंदना यांना आश्चर्य वाटतं.
 
"प्रेशरमुळे मुलांचं रडणं सहाजिक आहे, पण त्यांचे आईवडील का रडतात? त्यांनीतरी मोठ्या माणसांसरखं वागावं," असं वंदना यांना वाटतं.
 
आईवडिलांनी मुलांवर दबाव नाही टाकायला पाहिजे. त्यांनी त्यांचा आनंद मुलांच्या मेहनतीत नाही शोधायला पाहिजे, असं त्या सांगतात.
 
"तुम्हाला खूश ठेवणं ही मुलांची जबाबदारी नाहीये. तुमच्या आनंदाचं ओझं मुलांवर टाकू नका. त्यामुळं मुलं ज्या गोष्टीत तरबेज आहेत, त्या गोष्टी करणं विसरून जातील," असं मत वंदना बीबीसीशी बोलताना सांगतात.
 
कमी मार्क्स मिळाल्यानं संधी कमी होतात का?
वंदना यांना वाटतं की यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत आणि प्रत्येकासाठी ते वेगवेगळे आहेत. "महिन्याला लाखांवर पगार घेणारेच यशस्वी आहेत, असं म्हणता येणार नाही.
 
"माझा मुलगा काही तरी करून दाखवेल याचा मला विश्वास आहे. त्यानं मार्क्स मिळवावेत हीच फक्त अपेक्षा नाहीये."
 
वंदना स्वतः एक व्यावसायिक करतात. त्या क्लेग्राउंड कम्युनिकेशन या कंपनीच्या संस्थापक आहेत. त्यांचा आमेरपेक्षा मोठा एक मुलगा आहे, जो एका कॉलेजमध्ये शिकतो.