शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 मे 2022 (20:14 IST)

अविनाश भोसले आता CBI च्या नजरकैदेत

avinash bhosale
CBIने अटक केल्यानंतर आता अविनाश भोसलेंची रवानगी नजरकैदेत करण्यात आली आहे. भोसलेंना सध्या सीबीआयच्या मुंबईतील बीकेसीतील विश्रामगृहात ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
 
तसंच दोन दिवस सायंकाळी 5 ते 6 दरम्यान भोसलेंना वकिलांना भेटू देण्याची परवानगी कोर्टानं दिली आहे. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता रिमांड मागितली होती.
 
त्यावर सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा भोसलेंच्या वकिलांनी केला तसंच त्यांच्या रिमांडला विरोध केला. आता कोर्टानं सीबीआयला त्यांची बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे.
 
30 मे रोजी सकाळी 11 वाजता अविनाश भोसलेंना पुन्हा कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
सीबीआयने पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना गरुवारी अटक केली आहे.
 
या आधी अंमलबजावणी संचालनालयाने अविनाश भोसले यांची 40 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती जप्त केली होती
 
बांधकाम उद्योजक अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची 40.34 कोटींची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली होती.
 
त्यापूर्वी 10 फेब्रुवारी रोजी ईडीने अविनाश भोसले यांच्या पुण्यातल्या कार्यालयावर छापा टाकला होता.
 
पण, अविनाश भोसले काही पहिल्यांदाच वादात सापडलेत, असं अजिबात नाही.
 
विमान प्रवास करताना केलेलं कायद्याचं उल्लंघन असो किंवा राजकारण्यांशी असलेले संबंध, अविनाश भोसले नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
 
अगदी 2006 साली हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट हे दोघे अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांच्याशी संबंधित चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळेस या दोघांच्या राहण्याची सोय पुण्यातल्या गणेशखिंड परिसरातल्या 'प्रसादतुल्य' बंगल्यात करण्यात आली होती. या बंगल्याचे मालक आहेत अविनाश भोसले.
 
त्यामुळे अविनाश भोसले नेमके कोण आहेत आणि ते वादात का आहेत, हे आपण जाणून घेऊ.
 
रिक्षाचालक ते उद्योगपती
अविनाश भोसले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील तांबवे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला गेले. त्यांचे वडील जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कामाला होते.
 
पुढे अविनाश भोसले पुण्यात आले आणि रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात उतरले. यासोबत ते छोटछोटी बांधकाम कंत्राटं घेत होते.
 
अविनाश भोसले यांनी 1979मध्ये ABILग्रुपची (अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्टचर लिमिटेड) स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.
 
"आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनेक मुख्य पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामातही सामील होतो. यात महामार्ग, पूल, बोगदे, तलाव आणि धरणांच्या बांधकामांचा समावेश आहे," असं अविनाश भोसले यांच्या ABILग्रूपच्या वेबसाईटवर नमूद केलं आहे.
 
अविनाश भोसले यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं वळण तेव्हा मिळालं जेव्हा त्यांना शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये (1995) कृष्णा खोरे विकास महामंडळाची कामं मिळाली. याच माध्यमातून त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी कालवे, धरणं बांधली.
 
त्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं. या सरकारचं मुख्यालय पुणे असल्यानं ते अविनाश भोसले यांच्यासाठी अनेक अर्थांनी सोयीचं ठरलं. यानंतर त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात काम सुरू केलं, असं एका राजकीय पत्रकारानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
 
पुढे जलसंपदा विभागातील प्रकल्पांबाबत वाद निर्माण झाला, तेव्हा अविनाश भोसले यांनी जलसंपदा विभागातील कामं कमी करून इतर क्षेत्रांमध्ये उडी घेतली.
 
गेल्या 15 ते 18 वर्षांत अविनाश भोसले यांची जी वाढ झालीय, ती प्रचंड वेगानं झालीय. जिला 'रॉकेट राईज' असं म्हटलं जाऊ शकतं, असं अविनाश भोसले यांचा प्रवास जवळून पाहिलेले जाणकार सांगतात.
 
पॉलिटिकली करेक्ट
अविनाश भोसले यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क भागात उभारलेल्या हॉटेलच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम आणि त्यावेळेचे देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
 
बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वरला गेल्यानंतर ते अविनाश भोसले यांच्या बंगल्यामध्ये मुक्कामी राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे पुण्यात आल्यानंतर अनेकदा त्यांच्या गाडीचं स्वारथ्य अविनाश भोसले यांनीच केलं आहे. त्यावेळी त्याच्या बातम्यासुद्धा छापून आल्या होत्या.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 2013मध्ये सांगली दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्यांना अविनाश भोसले यांच्या हेलिकॉप्टरनं पुण्यात आणलं गेलं. हे हेलिकॉप्टर अविनाश भोसले यांच्या बाणेर इथल्या घरावर लँड झालं होतं. याचीसुद्धा मीडियात बरीच चर्चा झाली होती.
 
अविनाश भोसले यांच्या मुलीचं लग्न काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री विश्वजीत कदम यांच्याशी झालं आहे.
 
अविनाश भोसले यांच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबतच्या संबंधांविषयी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर सांगतात, "अविनाश भोसले यांच्या साम्राज्याचा विस्तार हा निव्वळ सर्वपक्षीय राजकीय आशीर्वादावर आहे. त्यात त्यांची काम करण्याची आणि करून घ्यायची पद्धत याचाही वाटा आहेच. शिवसेना भाजपच्या सत्तेच्या काळात छोटेमोठे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या अविनाश भोसले यांना 'अनलिमिटेड काम' देण्याचं लायसन्स मिळालं आणि त्यानंतर कृष्णा खोरे आणि इतर धरणांची मोठी कामं त्यांना मिळाली.
 
"सध्याच्या सर्वच नेत्यांसोबत अविनाश भोसले यांचे चांगले संबंध आहेत. बड्या IAS अधिकाऱ्यांसोबतही त्यांची मैत्री आहे. अनेक अधिकाऱ्यांसाठी ते स्वत: कॉफी घेऊन जातात याचे किस्सेही मंत्रालयाच्या कँपसमध्ये चर्चेचा विषय आहे."
 
ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव सांगतात, "अविनाश भोसले यांचा मातोश्रीपासून बारामतीपर्यंत चौफेर मधुर असा वावर आहे. 1997 पासून महाराष्ट्रात जे जे सत्तेत आले, त्या प्रत्येकाच्या ते संपर्कात आहेत. राजकारण्यांना जे जे पाहिजे, ते पुरवण्याचं काम करणारा पहिला मराठी कंत्राटदार म्हणजे अविनाश भोसले होय."
 
हेलिकॉप्टर डिप्लोमसी
अविनाश भोसले यांच्याकडे तीन हेलिकॉप्टर आहेत. अनेक राजकीय पक्षांचे पुढारी आपल्या प्रचारासाठी हे हेलिकॉप्टर वापरतात. राजकारण्यांना वापरासाठी हेलिकॉप्टर पुरवणं, ही अविनाश भोसले यांची अभिनव कल्पना असल्याचं जाणकार सांगतात.
 
उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीची फोटोग्राफी करताना ज्या हेलिकॉप्टरचा उपयोग केला ते हेलिकॉप्टर अविनाश भोसले यांच्या मालकीचं होतं आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'पाहावा विठ्ठल' या त्यांच्या पुस्तकामध्ये अविनाश भोसले यांचे आभारही मानले आहेत.
 
अविनाश भोसले यांचे पुत्र अमित भोसले ABIL ग्रूपचे संचालक आहेत.
 
निवडणुकीतील हेलिकॉप्टर्सच्या वापराविषयी 2009मधील निवडणुकीदरम्यान त्यांनी एकदा सांगितलं होतं, "आमच्याकडे फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातल्या अनेक राजकारणी आणि राजकीय पक्षांकडून विनंती करण्यात आली आहे."
 
असं असलं तरी त्यांनी यावेळी हेलिकॉप्टरसाठी विनंती करणारे राजकारणी किंवा पक्ष यांची नावं सांगितली नव्हती.
 
"अविनाश भोसलेंचं हेलिकॉप्टर वापरलं नाही असा बडा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात नाही. अनेक केंद्रीय नेतेही लाभार्थ्याच्या यादीत आहेत," असं रवींद्र आंबेकर सांगतात.
 
वादग्रस्त व्यक्तिमत्व
अविनाश भोसले अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
 
महाराष्ट्रात कथित सिंचन घोटाळ्याच्या चर्चेनं जोर धरल्यानंतर 2012मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
 
2008-09मध्ये जलसंपदा विभागाच्या नियमांना तिलांजली देऊन 4 कंत्राटदारांना धरणांच्या कामासाठी अॅडव्हान्स पैसे देण्यात आले. यासंबंधीच्या आदेशावर तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांची स्वाक्षरी होती.
 
या चारपैकी एक होता धापेवाडा बॅरेज प्रोजेक्ट. या कामासाठीचं कंत्राट अविनाश भोसले यांच्या सोमा एंटरप्राईज या कंपनीला देण्यात आलं होतं. या कामासाठीचे 20 टक्के पैसे अॅडव्हान्समध्ये त्यांना देण्यात आले होते. यासाठीच्या आदेशावर अजित पवारांची स्वाक्षरी होती.
 
"1995 नंतर महाराष्ट्रात जेवढ्या धरणांचं बांधकाम झालं, त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक कामं अविनाश भोसले यांची कंपनी किंवा त्यांची भागीदारी असलेल्या कंपन्यांनी केली. यात महाराष्ट्राचा किती पैसा गुंतला असेल, याचा आपण अंदाज बाधू शकतो," असं मत आशिष जाधव मांडतात.
 
याशिवाय, अजित पवार पुण्यात रेंज हिल भागातील ज्या जिजाई बंगल्यामध्ये राहतात तो बंगला अविनाश भोसले यांच्या मालकीचा होता. या बंगल्याची मालकी नक्की कुणाची, हे ठरवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली होती.
 
नंतर आपण हा बंगला अजित पवारांना विकल्याचं अविनाश भोसले यांनी स्पष्ट केलं होतं.
 
काही वर्षांपूर्वी विदेशातून येताना महागडं घड्याळ, दागिने आणताना कस्टम्स ड्यूटी भरली नाही म्हणून अविनाश भोसले यांना दंड करण्यात आला होता. त्यावेळीही त्यांचं नाव चर्चेत होतं.
 
आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी न घेता विदेशात बँक खातं उघडल्याचा अविनाश भोसले यांच्यावर आरोप आहे. यासाठी त्यांना 1 कोटी 83 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 
काही दिवसांपूर्वी या खात्यात 500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आता हे पैसे कुणी आणि कशासाठी जमा केले, हे तपासण्यासाठी ईडीनं मुंबईत दोनदा त्यांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता पुण्यातील त्यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत.
 
बाणेरचं व्हाईट हाऊस
अविनाश भोसले यांचं बाणेरमध्ये घर आहे. त्याला व्हाईट हाऊस असं नाव देण्यात आलं आहे.
 
पांढऱ्या रंगाच्या या बंगल्याचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखा आहे. इथंच भोसले यांची तिन्ही हेलिकॉप्टर्स असतात, असं सांगितलं जातं
 
याप्रकरणी अविनाश भोसले यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही.