शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (11:31 IST)

कोरोना लॉकडाऊनः बकरी ईदसाठी यंदा बकऱ्यांची ऑनलाइन खरेदी

अमृता शर्मा
यंदा 'ईद-उल-अजहा' अर्थात बकरी ईदवर कोरोना विषाणूच्या साथीचा परिणाम दिसून येतोय. लॉकडाऊन, आरोग्यविषयक नियम आणि कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या यांमुळे बकरी ईदचा उत्साह तुलनेनं कमी झालाय.
 
दक्षिण आशियातील पशू बाजारालाही कोरोनाचा मोठा फटका बसलाय. पशू व्यापारी लॉकडाऊनमुळे मोठं नुकसान सोसत आहेत.
 
ईद-उल-अजहाच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देण्याची परंपरा आहे. त्यामुळेच या सणाच्या दिवशी पशू बाजाराचं महत्त्वंही वाढतं. मात्र, यंदा कोरोनाचं संकट लक्षात घेऊन दक्षिण आशियातील बहुतांश देशांनी बकऱ्यांच्या ऑनलाईन विक्रीवर भर देण्याचे आदेश दिलेत.
केवळ आदेश आहेत म्हणूनच नव्हे, तर लोकही स्वत: थेट बाजारात जाऊन खरेदी करण्यास धजावत नाहीत. ऑनलाईन खरेदीचा मार्गच अनेकांना सोयीस्कर आणि सुरक्षित वाटतोय.
डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्राण्यांचे फोटो आणि व्हीडिओ अपलोड केली जातात. शिवाय, त्या त्या प्राण्याचं वय, लांबी-उंची, दात आणि आरोग्यसंबंधी माहिती दिली जाते. याच माहितीच्या आधारे लोक खरेदी करतात.
भारतातही लॉकडाऊनमुळे बकऱ्यांच्या ऑनलाईन विक्रीसह प्राधान्य दिले जात आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये ऑनलाईन खरेदीच्या दृष्टीने नियम-अटी जारी करण्यात आले आहेत.
स्क्रोलच्या वृत्तानुसार, ऑनलाईन व्यापार, वाहतूक आणि बकऱ्यांच्या डिलिव्हरीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यानं पशू व्यापारी आणि ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत.
मुळात ऑनलाईन खरेदी-विक्रीत खूप आव्हानं आहेत. अनेकांना तर ऑनलाईन खरेदी-विक्रीची प्रक्रियाच माहित नाही. बऱ्याच जणांना हे डिजिटल माध्यमं हाताळताही येत नाही.
दुसरीकडे, जे ऑनलाईन खरेदीसाठी पुढे येत आहेत, तेही साशंक दिसून येतात. कारण फोटो आणि व्हीडिओवरून खरेदी केलेले प्राणी प्रत्यक्षात तसेच असतील का, हे कळू शकत नाही.
 
अर्थव्यवस्थेवर परिणाम
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आर्थिक परिणाम आणि जनावरांचा बाजार यासंबंधीचे नियम सध्या दक्षिण आशियाई देशांमध्ये चिंतेचे विषय बनलेत.
डॉन वृत्तपत्राच्या 15 जुलैच्या अंकातील संपादकीयनुसार, "बकरी ईदची कुर्बानी पाकिस्तानातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी गोष्ट मानली जाते. कोट्यवधींमध्ये ही उलाढाल होत असते. पशूपालकांपासून कसाई आणि चामडा उद्योगपार्यंत, सर्वांचेच आर्थिक हितसंबंध या विक्रीशी जोडलेले असतात."
 
भारतातही काही वेगळी स्थिती नाहीय. ऑल इंडिया शिप अँड गोट ब्रिडर्स अँड डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अस्लम कुरेशी यांनी स्क्रोलच्या वृत्तात म्हटलंय की, भारतातील व्यापाऱ्यांच्या व्यावसायातही याआधीच्या बकरी ईदच्या तुलनेत 30 टक्के घट झालीय.
अशीच स्थिती बांगलादेशातील व्यापारी आणि शेतकऱ्यांची आहे.
ढाका ट्रिब्युनच्या 15 जुलैच्या अंकातील वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी जनावरांसाठी जो खर्च केलाय, तो तरी त्यांना मिळेल की नाही, ही सुद्धा शंका आहे. कारण कोरोनामुळे सर्व व्यावसायच ठप्प झालाय.
मुस्लीमबहुल देशांमध्ये काय स्थिती आहे?
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 27 जुलैला देशावासियांना संबोधित करताना सांगितलं की, अत्यंत साधेपणाने यंदाचा सण साजरा करा. मोठ्या संख्येत कुठेही गर्दी करू नका. अन्यथा, कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होईल.
 
बांगलादेश सरकारनंही तेथील नागरिकांना आवाहन केलंय की, नमाजासाठी मोकळ्या जागी गर्दी करण्यापेक्षा आपल्या घराच्या जवळील मशिदींमध्येच जा.
मालदीवच्या इस्लामिक मंत्रालयानं लोकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलंय. माले शहरातील मोकळ्या मैदानांमध्ये यंदा नमाजासाठी गोळा होऊ नये, आपापल्या घराशेजारील मशिदीतच नमाजासाठी जावं, असं आवाहन मालदीवच्या इस्लामिक मंत्रालयानं केलंय.