1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (10:19 IST)

सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचं यापूर्वी 2 वेळा उद्घाटन झालं होतं हे तुम्हाला माहिती आहे?

शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातल्या श्रेयवादात गाजलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचं अखेर आज (9 ऑक्टोबर) लोकार्पण होत आहे. आतापर्यंत दोन वेळा या विमानतळाची उद्घाटने झाली. मात्र अनेक आवश्यक सुविधा पूर्ण नसल्यामुळे या विमानतळावर विमानसेवा सुरू झालेली नव्हती. आज या विमानतळाचं हे तिसरं उद्घाटन आहे. विरोधी पक्षानं मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
 
अलायन्स एअरलाईन्स ही कंपनी या विमानतळावर आजपासून विमानसेवा सुरू करत आहे. अलायन्स एअर लाईन्सकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया दुपारी दोन वाजता राजीव गांधी भवनातून झेंडा दाखवून या विमानतळाचं व्हर्च्युअल उद्घाटन करतील.
 
त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चिपी येथे या विमानतळाचं प्रत्यक्ष हजर राहून लोकार्पण करतील.
या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख मंत्री आणि भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेही उपस्थित राहणार असल्यामुळे ठाकरे-राणे वादाचे पडसाद नेत्यांच्या भाषणबाजीत दिसून येण्याची शक्यता आहे.
 
काय आहे विमानतळाचा श्रेयवाद?
सिंधुदुर्गात विमानतळ मंजूर करुन आणणे आणि तो व्हावा म्हणून प्रयत्न करणे याच्या श्रेयवादात हे विमानतळ उद्घाटनाआधीच गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
 
1. सात सप्टेंबर 2021 ला नारायण राणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सिंधुदुर्ग विमानतळाचं उद्घाटन 9 ऑक्टोबरला ज्योतिरादित्य सिंधिया करतील आणि या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी हजर राहण्याची काही आवश्यकता नाही.

2. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच 8 सप्टेंबर 2021 ला खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली . राऊत म्हणाले, 2 सप्टेंबरलाच आपण या संदर्भात नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घेतली होती. 7 सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य सिंदियांशी संपर्क साधून 9 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. राऊत यांनी पुढे असाही आरोप केला की नारायण राणेंच्या संपूर्ण कारकिर्दीत या विमानतळाचं काम फक्त 14 टक्केच झालं होतं. आपण स्वत: केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन या विमानतळाचं काम मार्गी लावलं.
 
3. राऊत यांच्या आरोपानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर 2021 ला आमदार नितेश राणे यानी स्वत:चा एक व्हिडिओ प्रसिध्द केला. विनायक राऊत आणि शिवसेना हे फुकटचं श्रेय घेत असून विमानतळाचा पायाच मुळात नारायण राणे यांनी घातला आहे, असा दावा नितेश राणे यांनी या व्हिडिओत केला.

4. त्यानंतर 22 सटेंबर 2021 ला माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. सुधीर सावंत म्हणाले की, मुळात सिंधुदुर्गात विमानतळ व्हावा आणि तोसुद्धा आंतरराष्ट्रीय असावा यासाठी सर्वप्रथम 1994 साली आपण स्वत: प्रयत्न सुरु केले.
 
तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री माधवराव सिंदिया यांना आपण ही जागा दाखवली आणि तसा प्रस्ताव केंद्रात मंजूर करुन घेतला. सध्या नौदलाचा ताबा असलेलं गोव्याचं विमानतळ गोवा सरकारला पुढे वापरू देण्यास नौदलाने नकार दर्शवला होता. पण गोव्याच्या जवळ एका आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता होती म्हणून तो सिंधुदुर्गात बांधण्यासाठी आपण प्रयत्न सुरु केले होते, असं सुधीर सावंत म्हणाले.
 
आतापर्यंतची उद्घाटने आणि नेत्यांच्या भेटी
1. सिंधुदुर्ग विमानतळावर पहिल्यांदा विमान उतरलं 12 सप्टेंबर 2018 ला. पालकमंत्री होते दीपक केसरकर. गणेश चतुर्थीचा काळ असल्यामुळे केसरकर यांनी या विमानातून चक्क गणपतीची मुर्ती आणली आणि IRB च्या सहकार्याने टर्मिनल इमारतीत या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
 
2. त्यानंतर 5 मार्च 2019 ला या विमानतळाच्या मुख्य इमारतीचं म्हणजे टर्मिनल इमारतीचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी सुध्दा या विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं विमान उतरलं होतं.

3. 9 जानेवारी 2021 ला सुरेश प्रभू यांनी या विमानतळाला भेट दिली. त्यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुरेश प्रभू यांनी दावा केला की, आपण केंद्रात हवाई वाहतूक मंत्री असताना म्हणजे 2018-19 या काळात या विमानतळाच्या सर्व परवानग्या आधीच मिळवलेल्या आहेत.
 
इतकंच नव्हे तर या विमानतळावरुन विमानसेवा सुरू झालेली नसतानाही या विमानतळाचा समावेश आपण केंद्रीय उडान योजनेत केला आहे. ज्या परवानग्या मिळण्याची शक्यताच नव्हती अशा परवानग्याही आपण मिळवल्या आहेत, असंही प्रभू यावेळी म्हणाले होते.
 
4. 20 जानेवारी 2021 ला मनसेने विमानतळावर आंदोलन केलं. तारीख पे तारीख असं या आंदोलनाचं नाव होतं. तारखा जाहीर होतात पण विमान सुरू होत नाही. म्हणून मनसेने या विमानतळावर कागदी विमानं उडवली होती.
 
विमानतळाचा सिंधुदुर्गला किती फायदा?
अलायन्स एअरलाईन्स ही विमान कंपनी या विमानतळावर विमानसेवा पुरवणार आहे. केंद्रीय उडान योजनेत या विमानतळाचा समावेश असल्यामुळे एका प्रवाशासाठी सुमारे 2550 ते 2800 रुपये चिपी ते मुंबईचे प्राथमिक भाडे असेल.चिपीवरुन रोज सकाळी 11.35 वाजता विमान निघेल. ते मुंबईला दुपारी 1.00 वाजता पोहोचेल. तर मुंबईहून दुपारी 1.25 वाजता निघून ते विमान सिंधुदुर्गला दुपारी 2.50 मिनिटांनी पोहोचेल.सध्या दोन महिन्याचं आरक्षण पूर्ण झालं असल्याची माहिती पुढे येत आहे.
 
पण चिपी विमानतळापासून जवळच म्हणजे सुमारे 40 किलोमीटरवर मोपा गावात गोवा सरकारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सुरू आहे. GMR कंपनी हे विमानतळ उभारत आहे.पर्यावरणाच्या काही मुद्द्यांवर गेले आठ महिने या विमानतळाच्या कामाला स्थगिती होती. ती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. तब्बल 2200 हेक्टरवर हा विमानतळ असून बहुतेक सर्व देशी विदेशी विमान कंपन्यांची विमानसेवा गोव्याच्या या विमानतळावर सुरु होणार आहे.
 
त्यामुळे जवळच असलेल्या चिपी विमानतळावर पर्यटक उतरतील का? हा प्रश्नच आहे.
 
शिवाय, सिंधुदुर्गात अद्याप मोठे पर्यट्न प्रकल्प नाहीत. तसंच चिपीवर येणाऱ्या विमानातून किती प्रवासी ये-जा करतील हासुद्धा प्रश्न उपस्थित होतो. कारण देवगडच्या एखाद्या प्रवाशाला किंवा वैभवववाडीच्या एखाद्या प्रवाशाला विमानातून मुंबईला जायचे असेल तर विमानतळावर जाण्याचे भाडेच त्याला हजार-बाराशे पडेल.
 
जर सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय पर्यट्नाला पूरक पायाभूत सुविधा आणि प्रकल्प उभे राहिले, तर वर्षाचे 365 दिवस इथे विमानसेवा सुरू राहू शकते.
 
सिंधुदुर्गवासियांकडून स्वागत
राजकीय वादविवाद काहीही असले तरी जवळपास 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे विमानतळ आकाराला येत आहे.
 
कोकण रेल्वे सुरू झाल्यावर सिंधुदुर्गवासियांना जसा आनंद झाला, तसाच आनंद यावेळी होत आहे. त्यामुळे विमानतळाच्या लोकार्पणाचं स्वागत होताना दिसत आहे. सुमारे 800 कोटी खर्च करुन IRB कंपनीकडून बांधण्यात आलेलं हे विमानतळ अनेक सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. जवळपास 2700 मीटर लांब आणि 60 मीटर रुंदीची धावपट्टी या विमानतळावर बांधण्यात आल्यामुळे भविष्यात या विमानतळावर मोठी विमानेही लॅंडिंग आणि टेकऑफ घेऊ शकतील, अशी माहिती IRB व्यवस्थापनाने दिली आहे.