1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (20:55 IST)

एक्झिट पोल : उत्तर प्रदेशात BJP, पंजाबमध्ये आप तर उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमताचा अंदाज

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.
त्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजप, पंजाबमध्ये आम आदमी पक्ष तर उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
उत्तर प्रदेश
इंडिया टुडे-अॅक्सिसच्या सर्व्हेनुसार भाजपला 288 ते 326 जागा मिळतील असा अंदाज आहे. समाजवादी पार्टीला 71 ते 101 जागा मिळतील, बसपाला 3 ते 9 आणि इतर पक्षांना 2 ते 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
टाईम्स नाऊच्या एक्झिट सर्व्हेनुसार, भाजपला 225, सपाला 151, बसपाला 14, काँग्रेसला 9 आणि इतर पक्षांना 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
इंडिया न्यूजच्या सर्व्हेनुसार, भाजपला 222 ते 260, सपाला 135 ते 165, बसपाला 4 ते 9 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
 
टाव्ही-9 च्या एक्झिट पोलनुसार 403 जागांच्या उत्तर प्रदेशात भाजपला यंदा 211 ते 225 जागा मिळण्याचा अंदा आहे. तर सपाला 146 ते 160 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसप 14 ते 24 तर तर काँग्रेसच्या खात्यात 4 ते 6 जागा येण्याची शक्यता आहे.
 
रिपब्लिक टीव्हीच्या सर्व्हेनुसार यूपीत भाजपला 262 ते 277 तर सपाला 119 ते 134 बसपला 7 ते 15 आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. रिपब्लिक टीव्हीच्या सर्व्हेत इतर पक्षांच्या खात्यात 2 ते 6 जागा देण्यात आल्या आहेत.
 
जन की बातच्या सर्व्हेत उत्तर प्रदेशात भाजपला 222 ते 250 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सपाला 135 ते 165 जागांचा अंदाज आहे. बसप 4 ते 9 जागांवरच अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 
गोवा
गोव्यात यंदा भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसून येतेय. सर्व मोठ्या एक्झिट पोल्समध्ये कुठल्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाहीये.
 
इंडिया टुडेनं भाजपला 14 ते 18, सीएनएक्सने 16 ते 22, टीव्ही -9 ने 17 ते 19 तर ग्राउंड-0 ने 10 ते 14 जागा त्यांच्या सर्व्हेमध्ये दिल्या आहेत.
तर काँग्रेसला 2-ते 25 जागा मिळण्याचा अंदाज ग्राउंड-0 ने व्यक्त केलाय. काँग्रेसला इंडिया टुडे 15 ते 20, सीएनएक्स 11 ते 17, टीव्ही-9 11 ते 13 जागा दर्शवत आहे.
 
आपला साधरण 1 ते 4 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज वेगवेगळ्या सर्व्हेंमधून पुढे आला आहे. तर तृणमुल आणि मगो पक्षाला मिळून 1 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
 
पंजाब
इंडिया टुडेच्या एक्झिट पोल नुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला यंदा बहुमताचा आकडा मिळेल असा अंदाज आहे. इथं 117 पैकी आपला 76 ते 90 जागा, काँग्रेसला 19 ते 31 तर आकाली दलाला 7ते 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवाय भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला 1 ते 4 तर इतर पक्षांच्या खात्यात एक जागा जाण्याची शक्यता आहे.
 
उत्तराखंड
एबीपी सी-व्होटरच्या एक्झिट पोल नुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. 70 पैकी काँग्रेस 32 ते 38 तर भाजपला 26 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इथं आपला 2 तर इतर पक्षांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
 
एक्झिट पोलमधून काय समजतं?
बीबीसीनं 2014 ते 2018 या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलचा अभ्यास केला.
 
त्यातून असं लक्षात आलं की, एक्झिट पोलमुळे आपल्याला कोण जिंकणार याचा अंदाज येतो, पण कोणत्या पक्षाच्या किती जागा येतील, हे नेमकेपणे समजू शकत नाही.
 
याचं उदाहरण म्हणजे 2017च्या गुजरात निवडणुकीत भाजप जिंकेल असं भाकीत एक्झिट पोलनं केलं होतं.
 
C-Voterनं असं भाकीत केलं होतं की भाजप 111 जागा जिंकेल आणि काँग्रेसच्या 71 जागा येतील. टुडे'ज चाणक्यनं म्हटलं होतं की भाजपला 135 जागा मिळतील आणि काँग्रेसला 47 जागा मिळतील.
 
65 टक्के जागा या भाजपला मिळतील असा अंदाज बहुतांश एजन्सीजनं बांधला होता. पण जर प्रत्यक्ष निकालावर नजर टाकली तर भाजपच्या अंदाजापेक्षा 10 टक्के जागा कमी झाल्या आहेत. भाजपला या निवडणुकीत 99 जागा मिळाल्या होत्या.
 
'नेमक्या किती जागा मिळतील हे सांगता येत नाही'
एक्झिट पोलमधून विजेता पक्ष कोण याचा अंदाज बांधता येतो, पण कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील हे सांगता येत नाही.
 
हा फरक कसा राहतो, याचं उत्तर Centre for the Study of Developing Societiesचे संचालक संजय कुमार देतात.
 
ते सांगतात, "एक्झिट पोलसाठी जो सर्व्हे केला जातो, त्यात कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील याचा अंदाज घेतला जातो आणि मग त्या मतांच्या टक्केवारीवरून त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, याचा आडाखे बांधला जातो."
उदाहरणार्थ, एखाद्या पक्षाला 25 टक्के मत मिळणार असेल तर त्या आधारावर त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, हे ठरवलं जातं.
 
"पण कधीकधी एखाद्या पक्षाच्या मतांची टक्केवारी आणि निवडून आलेल्या जागांमध्ये फरक दिसून येतो. खरं तर मतांची टक्केवारी तेवढीच असते, मात्र संबंधित पक्षानं फार कमी फरकानं जागा जिंकलेली किंवा हरलेली असते. यालाच first-past-the-post असं म्हणतात," ते पुढे सांगतात.
 
राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या मते, "एखाद्या पक्षाच्या नेमक्या जागा किती येतील, हे एक्झिट पोल करणाऱ्यांच्या सँपलिंगवर अवलंबून असतं. आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे कोण जिंकणार हे सांगता येत असलं, तरी नेमक्या जागा सांगता येतीलंच, असं नाहीये.
 
"यात काही चूक नाहीये. म्हणजे एखादा एक्झिट पोल व्यवस्थित करूनसुद्धा त्याच्यामध्ये जागा किती मिळतील, याबाबत अनिश्चितता असू शकते. ते नॅचरल आहे. अध्यक्षीय पद्धतीत, अध्यक्ष कोण निवडून येईल, असं फक्त सांगायचं असतं. तसं आपल्याकडे नाहिये. 543 मतदारसंघ असतात. त्याच्यामुळे संसदीय पद्धतीत सीट सांगणं कठीण असतं."
 
Psephologist आणि C-voterचे संस्थापक यशवंत देशमुख मात्र वेगळा मुद्दा मांडतात.
 
ते सांगतात, "कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हा एक्झिट पोलच्या सर्व्हेचा भाग नसतो. कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील, एवढं सांगायचं काम फक्त एक्झिट पोल करत असतो."
 
एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात?
एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात, याचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या 'The Verdict…Decoding India's Election' या पुस्तकात मिळतं.
 
या पुस्तकात 1980 ते 2018दरम्यान झालेल्या 833 एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत.
 
त्यात ते लिहितात, "एक्झिट पोल खरे ठरण्याचा अंदाज 84 टक्के इतका आहे."
 
कसा करतात एक्झिट पोल?
संजय कुमार सांगतात, "कोणत्याही पोलसाठी अगोदर एक सॅंपल बनवलं जातं. ज्यामध्ये काही हजार माणसांचा समावेश असतो. ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यातलेच हे मतदार असतात आणि त्यांची संख्याही त्याच प्रमाणात असते, जेवढी राज्यात असते.
 
"यात ग्रामीण, शहरी, वेगवेगळे धर्म, जाती, लिंग आणि समुदायाच्या लोकांना त्याच प्रमाणत घोतलं जातं जेवढं त्यांचं त्या राज्यात प्रमाण असतं. या सर्वांशी चर्चा करून त्यांनी कुणाला मत दिलं किंवा देणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो."
"या सर्व बाबींची काळजी घेतल्यास अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतात. पण सॅंपलमधील प्रमाण चुकीचं असेल तर अंदाज उलटण्याची शक्यता असते."
 
पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. पण भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात.
 
यावर ते सांगतात, "भारतात याबाबत अजून सुधारणा होण्याची गरज आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, जेवढी विविधता भारतीय मतदारांमध्ये आढळून येते तेवढी पाश्चिमात्य देशातल्या मतदारांमध्ये आढळून येत नाही."
 
"तिथल्या लोकांच्या धर्म आणि जाती बरेचदा सारख्याच असतात. तसंच भारताच्या तुलनेत तिथं निवडणुका लढवणारे पक्षही कमी असतात. हीच कारणं आहेत ज्यामुळे तिथले एक्झिट पोल बरोबर ठरण्याची शक्यता जास्त असते."
 
एक्झिट पोल महत्त्वाचे का?
निकडणुकीचे निकाल सांगणं आणि प्रेक्षकांची उत्सुकता भागवणं इतकंच एक्झिट पोलचं काम नसतं.
 
यशवंत देशमुख यांच्या मते, "कोणता पक्ष पुढे आणि कोणता मागे, हे सांगणं एक्झिट पोलचं पहिलं काम असतं. दुसरं म्हणजे प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर तो निकाल एक्झिट पोलशी कम्पेअर केला जातो, यातून मग डेमोग्राफिक्स कळतं. म्हणजे महिलांनी कुणाला मत दिलं, शेतकरी किंवा तरुणांनी कुणाला मत दिलं.
 
"कारण निवडणूक आयोग कोण जिंकेल किंवा हारेल, एवढचं सांगतं, पण कुणी कुणाला मत दिलं, हे एक्झिट पोलच सांगू शकतात."