बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (15:59 IST)

युक्रेनमधल्या मराठी विद्यार्थ्यांच्या मेडिकल शिक्षणाचं आता काय होणार?

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा नकारात्मक परिणाम जगातील बऱ्याच घटकांवर झाला आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर ही याचा परिणाम झाला आहे. खास करून युक्रेनच्या वैद्यकीय विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा? या प्रश्नाची टांगती तलवार आहे.
 
हरियाणाच्या हिस्सारमध्ये राहणारे मास्टर सुलतान पेशाने शेतकरी आहेत. मुलाला डॉक्टर होताना पाहायचं म्हणून त्यांनी आपलं राहतं घर गहाण ठेवलं आणि आपला मुलगा कुलदीप याचं अॅडमिशन युक्रेनच्या वैद्यकीय विद्यापीठात करून दिलं.
 
पण रशिया आणि युक्रेन मध्ये संघर्ष पेटला आणि कुलदीपला अभ्यासक्रम सोडून मायदेशी परतावं लागलं. आता मास्टर सुलतान यांना समजेना आपल्या मुलाला कोर्स कसा पूर्ण करता येईल? फक्त मास्टर सुलतानच नाही तर युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना हा प्रश्न सतावतोय की अर्धवट राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल?
कुलदीप डेनीप्रो स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तिसऱ्या वर्षात शिकतो. त्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "तीन वर्षात नाही म्हटलं तर वीस लाख खर्च झाले आहेत. सहावी सेमिस्टर नुकतीच फेब्रुवारीत सुरू झाली होती. या सेमिस्टरची फी सुद्धा भरून झाली मात्र तिथली परिस्थितीचं इतकी चिघळली की, भारतात परत यावं लागलं. युक्रेनची परिस्थिती बघता मला वाटत नाही की आम्हाला तिथे परत जाता येईल. मला माझं करिअर पूर्णचं अंधारात दिसतं आहे. मला आता डॉक्टर बनता येईल का? काय विचार करावा हे ही सुचत नाही."
 
कुलदीपला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी युक्रेनला पाठवणं त्याच्या कुटुंबासाठी अवघड होतं. कुलदीपचे वडील सुलतान सांगतात, "दागिन्यांवर कर्ज काढलं, किसान क्रेडिट कार्डवरून पैशांची उचल घेतली. एवढा सगळं व्याप करून मुलाची फी भरली. आता शेतातला कापूस पण कमी झाला आहे. एक एक रुपया जोडून मुलाला डॉक्टर बनवायचं म्हणून पाठवलं होतं."
 
फक्त कुलदीप एकटाच नाही तर त्याच्या सारखे 18 हजार विद्यार्थी युद्धामुळे युक्रेन सोडून भारतात परतलेत. कोणाचं दुसरं वर्ष सुरू होत तर कोणी चौथ्या वर्षांत शिकत होतं. आता फक्त प्रश्न उरतो तो राहिलेलं शिक्षण पूर्ण कसं करायचं? त्यांना भारतात शिक्षण पूर्ण करायची संधी मिळेल का? की या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती निवळेपर्यंत वाट बघावी?
या विषयावर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात नॅशनल मेडिकल कमिशन यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार युक्रेनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना एक वर्षाची अनिवार्य असलेली इंटर्नशिप भारतात करण्यासाठीची परवानगी आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एग्जामिनेशन ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल.
त्याचप्रमाणे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्स रेग्युलेशन 2021 लागू झाल्यापासून काही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी अडचणी येत आहेत. मात्र स्टेट कौन्सिल या विद्यार्थ्यांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकते.
 
जर विद्यार्थ्यांने 18 नोव्हेंबर 2021 या तारखेआधी फॉरेन मेडिकल डिग्री किंवा प्रायमरी क्वालिफिकेशन पूर्ण केले असेल अथवा विद्यार्थ्याने 18 नोव्हेंबर 2021 या तारखेआधी परदेशात मेडिकल अंडर ग्रॅज्युएटसाठी ऍडमिशन घेतले असेल अथवा केंद्र सरकारने विशेष नोटिफिकेशन काढून ज्यांना सूट दिली होती अशा विद्यार्थ्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्स रेगुलेशन्स 2021 लागू होणार नाही.
 
केंद्रीय परिवहन राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी भारतीय विद्यार्थी पोलंडमध्ये आपला उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात, असं वक्तव्य केलं आहे. पोलंडमधील भारतीय विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, "जर तुमचा अभ्यासक्रम अर्धवट राहिला असेल तर पोलंड ही जबाबदारी उचलण्यास तयार आहे. मी जितक्या पोलंडवासीयांना भेटलो आहे त्यांनी युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं आहे."
 
मग आता भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडमध्ये जाऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करता येईल का?
 
युअर चाणक्य, द करियर गुरु कन्सल्टन्सीचे सर्वेसर्वा रितेश यांच्या मते यात बर्‍याच अडचणी आहेत. रितेश सांगतात की, "युक्रेनच्या तुलनेत पोलंडमधील वैद्यकीय शिक्षण महाग आहे. युक्रेनमध्ये जवळपास पंचवीस लाखाच्या आसपास वैद्यकीय शिक्षण पूर्ण होते. तेच पोलंडमध्ये हा खर्च तब्बल 40 ते 60 लाखांच्या घरात जातो. आता राहता राहिला प्रश्न पोलंड मधील विद्यापीठांचा. तर त्यांनी परवानगी जरी दिली तरी भारतीय विद्यार्थ्यांना तिथे जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करणं अडचणीचं ठरू शकतं."
 
पोलंडमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमा संदर्भात विद्यार्थ्यांना कोण कोणत्या अडचणींना सामोर जावं लागू शकतं?
 
तर इथे प्रश्न फक्त पैशांचा नाही तर राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे नियमही यात आडवे येतात.
 
रितेश सांगतात की, "याआधी एका वैद्यकीय विद्यापीठातून दुसऱ्या वैद्यकीय विद्यापीठात मध्ये विद्यार्थ्यांना आपलंअॅडमिशन ट्रान्सफर करता येत होतं. यात युक्रेन मधून कझाकस्तान, किर्गिस्तान किंवा मग जॉर्जिया या देशात युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ट्रान्सफर करून घेत होते."
 
मात्र 2021 च्या नोव्हेंबर मध्ये भारत सरकारने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले. या नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना आपले वैद्यकीय शिक्षण कोणत्याही एकाच वैद्यकीय विद्यापीठामधून पूर्ण करता येईल. मात्र फिलिपाईन्स आणि अन्य काही कॅरेबियन देश या नियमांना डावलताना दिसल्यावर भारत सरकारने या देशांवर बॅन लावला आहे.
कझाकस्तानच्या साउथ कझाक मेडिकल अकॅडमी मधील अमित कुमार वस्त सांगतात, "विद्यार्थ्यांना दुसऱ्या देशातील वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश मिळवण तशी अवघड गोष्ट नाही."
 
ते पुढे सांगतात, "2014 मध्ये जेव्हा रशियाने क्रिमीयावर हल्ला केला होता तेव्हा क्रिमीयातील वैद्यकीय विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे ऍडमिशन दुसऱ्या वैद्यकीय विद्यापीठात ट्रान्सफर केले होते. वॉर झोन मधील विद्यार्थ्यांना आपलं ऍडमिशन ट्रान्सफर करण्याची परवानगी याआधी सुद्धा मिळाली आहे."
 
पोलंड व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना इतर कोणता पर्याय उपलब्ध आहे का?
यावर रितेश सांगतात, "जर भारत सरकारने नियमांमध्ये थोडी सूट दिली तर विद्यार्थी कझाकस्तान, किर्गिस्तान, नेपाळ आणि रोमेनिया अशा देशांमध्ये आपला उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. या देशांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी येणारा खर्च हा युक्रेन इतकाच आहे. आणि या देशांमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षण घेताना ही दिसतात."
 
उझबेकिस्तान ही नवा पर्याय ठरू शकतो. या देशात गेल्या तीन-चार वर्षात नवीन वैद्यकीय विद्यापीठे तयार झाली आहेत. भारत सरकारकडून काही मदत झाल्यास विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण पूर्ण करताना अडचणी येणार नाहीत.
 
भारतात राहून विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो का?
 
वैद्यकीय अभ्यासक्रम अर्धवट सोडून युक्रेनमधून आलेले विद्यार्थी भारतातच पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत आहेत. पण हे शक्य आहे का?
 
यावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉ. जयेश लेले यांनी बीबीसीला माहिती देताना सांगितलं की, "आपल्याला काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. त्या म्हणजे हे विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून भारतातच येणार होते. भारत सरकार आणि राष्ट्रीय चिकित्सा आयोग मिळून युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील वेगवेगळ्या वैद्यकीय विद्यापीठामध्ये अर्धवट अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठवू शकते."
 
यासाठी आम्ही पंतप्रधानांना विनंती केली आहे. त्याच प्रमाणे आम्ही स्वास्थ मंत्री आणि राष्ट्रीय चिकित्सा आयोगालाही विनंती केली आहे.
तेच दुसरीकडे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. जयपाल म्हणतात, "भारतातील जवळपास एका लाखाहून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. फक्त एकट्या युक्रेनमध्ये जवळपास 18 हजार विद्यार्थी आहेत. अशात शक्यता वाटत नाही की भारत सरकार या विद्यार्थ्यांना भारतातच ऍडमिशन देऊ शकेल. जर युक्रेनची परिस्थिती आणखीन गंभीर झाली तर दुसरी रणनिती आखली जाऊ शकते.
 
"यात इंडियन मेडिकल असोसिएशन फक्त सल्लागाराची भूमिका निभावू शकतो. पण सध्या परिस्थिती पाहता युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणणं ही आपली प्राथमिकता आहे."
 
भारतात मेडिकलच्या जवळपास एक लाख जागा आहेत. त्यात आणि आम्हाला एमबीबीएसची क्वालिटी ही मेंटेन करावी लागते. परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले 15 टक्के विद्यार्थीच फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन पास होतात.
 
भारतातील जवळपास 88 हजार एमबीबीएसच्या जागांसाठी आठ लाख विद्यार्थी बसतात. यातील पन्नास टक्के जागा या प्रायव्हेट असतात. भारतात कोणत्याही प्रायव्हेट एमबीबीएसच्या जागेवर ऍडमिशन मिळवण्यासाठी जवळपास सत्तर लाख ते एक करोड रुपये मोजावे लागतात. आणि याचमुळे दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी जातात.
 
परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर हे विद्यार्थी भारतात येऊन फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशनची परीक्षा देतात. ही परीक्षा पास झाल्यावरचं त्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी मिळते. 300 मार्कांच्या या परीक्षेसाठी किमान 150 मार्कांचा कट ऑफ लागतो
 
खाली दिलेली आकडेवारी 2015 ते 2018 दरम्यानची आहे.
 
या आकडेवारीतून काही गोष्टी निदर्शनास येतात. परदेशी जाऊन वैद्यकीय डिग्री घेऊनही हे विद्यार्थी भारतात डॉक्टर होऊ शकत नाहीत. तीन वर्षात युक्रेन मध्ये जाऊन वैद्यकीय अभ्यास करणारे 15 टक्के विद्यार्थीचं फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन ही परीक्षा पास होऊ शकले आहेत.
 
अभ्यासक्रम ऑनलाइन पूर्ण करता येऊ शकतो का?
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले तीन वर्ष त्यांना थेअरी शिकवली जाते आणि चौथ्या वर्षात प्रॅक्टिकल्स सुरू होतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन वैद्यकीय अभ्यास पूर्ण करावा लागतो. अशात प्रश्न निर्माण होतो की वैद्यकीय अभ्यास करणारे विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास कसा करणार.
युक्रेनमधील सूमी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेणारे कुलदीप सांगतात, "रशियाने हल्ला केल्यानंतर आमचे बरेचसे शिक्षक युक्रेन सोडून गेले. ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी जी काही व्यवस्था करण्यात आली होती ती रशियाच्या हल्ल्यात उध्वस्त झाली आहे. जर आम्हाला हा अभ्यासक्रम ऑनलाईन करावा लागला तर प्रॅक्टिकल कसं करणार?"
 
युरेशिया एज्युकेशन लिंक भारतीय विद्यार्थ्यांना बऱ्याच परदेशी विद्यापीठात ऍडमिशन देण्यासाठी मदत करणारी संस्था आहे. या संस्थेचे चेअरमन महबूब अहमद सांगतात, "इवानो फ्रँक विस्क नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये आमचे तीन हजार विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा करियर पणाला लागलं आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुढील शिक्षण भारतात पूर्ण व्हायला हवं."