गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (16:08 IST)

गांधी @ 150: काश्मीर, गोरक्षण आणि मॉब लिंचिंगवर काय होते गांधीजींचे विचार?

महात्मा गांधींनी स्वतंत्र आणि स्वावलंबी भारताचं स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न कुठल्या सैद्धांतिक किंवा तात्त्विक आधारावर पाहिलं नव्हतं. ते एखाद्या व्यावहारिक योजनेसारखं होतं.
 
गांधीजींना भारत म्हणजे इथले सर्व धर्मपंथांचे, सर्व प्रदेशातले, सर्व भाषिक आणि सर्व जातीचे लोक अभिप्रेत होते. समानता, बंधुत्व आणि मानवीय प्रतिष्ठेच्या कल्पनेने भारलेल्या स्त्री-पुरुष आणि अगदी लहान मुलांनीही या राष्ट्र उभारणीत हातभार लावायचा होता. यातूनच धर्मनिरपेक्ष भारत घडवायचा होता. संपूर्ण जगासाठी हा एक आदर्श ठरला असता.
 
मात्र आज या आघाड्यांवर भारत कुठे आहे? आज गांधीजी असते आणि त्यांनी देशाची परीक्षा घेतली असती तर आपल्याला किती गुण मिळाले असते? भारताने स्वतःच स्वतःला किती गुण दिले असते? हे काही प्रश्न आहेत.
 
खरं तर सगळ्या जगासमोरच आज अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. मात्र त्या सर्व व्यापक समस्यांचा एकजुटीने सामना करण्याऐवजी भारतीय समाजातले काही घटक आज स्वतःच भारतासाठी समस्या निर्माण करत आहेत.
 
वरवर पाहता या समस्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाच्या वाटत असतील. मात्र वास्तवात त्या वैचारिक आणि अस्तित्ववादी संकटाचं रूप घेत आहेत.
 
काश्मिरमध्ये सर्व शांत आहे. भारतीय समाजाला ही जबरदस्तीनं लादलेली शांतताच खरी वाटू लागली आहे. पूर्वी इथले पत्रकार म्हणायचे, की परिस्थिती नियंत्रणात, मात्र तणाव आहे. पण 'तणावपूर्ण' म्हटल्यानं ब्रँडिंग नीट होत नाही, असं सत्ताधाऱ्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी सरळ सांगितलं की परिस्थिती पूर्णपणे 'नियंत्रणा'त आहे असंच म्हणा. काश्मिरी लोकांना बळाचा वापर करून तात्पुरतं का होईना नियंत्रणात ठेवलं आहे. उर्वरित देशातील जनतेवर प्रसारमाध्यमांचं नियंत्रण आहे.
 
अशा परिस्थिती गांधी असते तर त्यांनी काय केलं असतं, कुणास ठाऊक. मात्र गांधीजी काश्मीरला गेले होते. इंग्रज किंवा काश्मीरच्या राजाशी कागदी करार करून विलीनीकरण होऊ शकतं, अशी भावना जेव्हा काश्मिरी जनतेच्या मनात होती, तेव्हा गांधीजी काश्मीरला गेले होते. .
 
राज्य-व्यवस्थेला अशाच पद्धतीने विचार करण्याची सवय असते. ही एक दूरगामी चूक ठरेल, हे गांधींच्या लक्षात आलं होतं. त्यामुळेच त्यांनी म्हटलं होतं, की काश्मीर म्हणजे केवळ तिथला भूभाग किंवा तिथला राजा नाही. काश्मीर म्हणजे तिथली जनता.
 
ज्या गांधींनी देशातल्या जनतेला सोबत घेऊन शक्तिशाली ब्रिटिश राजवटीला हादरा दिला, त्यांना लोकांच्या भावनांचा आदर ठेवणं आणि त्यांची मनं जिंकणं हे अधिक आवश्यक वाटलं.
 
आपल्या ऐतिहासिक काश्मीर यात्रेच्या दोन दिवसांपूर्वी 29 जुलै 1947ला आपल्या प्रार्थना सभेत गांधींनी म्हटलं होतं, "काश्मिरात राजाही आहे आणि प्रजादेखील. त्यांनी पाकिस्तानात विलीन होऊ नये आणि भारतात विलीन व्हावं, असं काही मी राजाला सांगणार नाहीये. मी या कामासाठी तिथे जात नाहीये. तिथे राजा आहेच. मात्र हीच खऱ्या अर्थानं राजा आहे."
 
"काश्मीरला पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं की भारतात, हे तिथल्या लोकांना विचारायला हवं. त्यांना हवा तो निर्णय त्यांनी घ्यावा. राजा काहीच नसतो. प्रजाच सर्वकाही असते. राजा अस्तित्वात नसेल, पण प्रजा मात्र कायम असेल. मी हे काम पत्र पाठवून का करत नाही, असं काही लोकांनी मला विचारलं. मग अशाप्रकारे मी नौखालीचं कामही पत्राद्वारे करू शकलो नसतो का, असा प्रश्न मी त्यांना विचारतो."
 
जेव्हा पाकिस्तानातून काश्मिरवर हल्ला झाल्याचं वृत्त आलं तेव्हा त्यांनी 26 ऑक्टोबर 1947 ला पाकिस्तान आणि भारत दोघांनाही स्पष्टपणे सांगितलं. "संस्थानाचा (काश्मीर) खरी राजा ही तिथली प्रजा आहे. काश्मिरची जनता म्हणत असेल, की तिला पाकिस्तानात जायची इच्छा आहे तर जगातली कुठलीच शक्ती तिला पाकिस्तानात जाण्यापासून रोखू शकत नाही."
 
"मात्र, त्यांना संपूर्ण मोकळेपणाने आणि वेळ देऊन विचारायला हवं. त्यांच्यावर आक्रमण करता येणार नाही. तिथल्या गावांना आगी लावून त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाही. तिथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे. पण तरीही तिथल्या जनतेला भारतात राहायचं असेल तर त्यांना कुणीही रोखू शकत नाही."
 
"पाकिस्तानातले लोक त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी तिथे जात असतील तर पाकिस्तान सरकारने त्यांना रोखलं पाहिजे. तसं करता नाही आलं तर सर्व आरोप त्यांना मान्य करावे लागतील. जर भारतातील लोक काश्मिरींवर दबाव टाकत असतील तर त्यांनाही अडवलं पाहिजे. त्यांनीही थांबायला हवं, हेच माझं स्पष्ट मत आहे."
 
गांधींसाठी गोरक्षणाचा अर्थ
गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणायचे. भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था आणि भारताच्या आध्यात्मिक परंपरेच्या दृष्टीनेदेखील ते गाईचं महत्त्व ओळखून होते. मात्र, भारतासारख्या वैविध्यपूर्ण समाज असलेल्या आणि निर्माणाधीन देशात गाईंचं रक्षण बळजबरीने आणि जमावाच्या हिंसाचारानं होऊ शकत नाही, हेदेखील त्यांना ठाऊक होतं.
 
गोपूजकांचं धार्मिक ढोंग गांधींना कळून चुकलं होतं. त्यामुळेच स्वतःला गोरक्षक म्हणवणारेच खरे गो-भक्षक आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी गोरक्षण हा शब्द वापरणंही बंद केलं होतं. ते म्हणायचे, की 'गोरक्षणाची' नाही तर 'गोसेवेची' गरज आहे.
 
6 ऑक्टोबर 1921 रोजी गांधीजींनी 'यंग इंडिया' वृत्तपत्रात हिंदू धर्म आणि गोरक्षणावर लिहिलं होतं: "हिंदू धर्माच्या नावाखाली असं बरंच काही केलं जातं जे मला मान्य नाही. मी खरंच तसा नसेल तर मला सनातनी हिंदू किंवा इतर कुठल्या प्रकारचा हिंदू म्हणवून घेण्याची इच्छा नाही."
 
"गोरक्षेसंदर्भात मी लोक-प्रचलित स्वरूपापेक्षा अधिक व्यापक स्वरूपावर विश्वास ठेवतो. गोरक्षा म्हणजे तिच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणं. गायीच्या रक्षणासाठी मानवाची हत्या करणं हिंदू धर्म आणि अहिंसा धर्मापासून दूर जाणं आहे. तपस्या, आत्मशुद्धी आणि आत्माहुतीच्या माध्यातून हिंदूंनी गोरक्षा करणं अपेक्षित आहे."
 
"मात्र आजकालच्या गोरक्षेचं स्वरुप बदललं आहे. गोरक्षणाच्या नावाखाली आपण सतत मुस्लिमांशी भांडण-तंटा करत असतो. ज्या धर्माने गाईची पूजा करायला सांगितलं तो मानवाच्या निर्दयी आणि निर्घृण बहिष्काराचं समर्थन कसं करू शकतो?"
 
26 जानेवारी 1921 रोजी गांधींनी लिहिलं, "मुस्लिमांविरोधात म्हटलं जातं की ते गोहत्या करतात. मला वाटतं, की वांद्र्यातल्या कत्तलखान्यात पाच वर्षात जेवढ्या गायींची कत्तल होते तेवढ्या गाई सात कोटी मुस्लीम 25 वर्षांतही मारू शकत नाहीत. तुम्ही गाईची पूजा करता. मात्र बैलांना मारता. गायी दूध देतात. म्हशीसुद्धा दूध देतात. त्यांना इतकं दोहतात, की त्यांच्या आचळांमधून रक्त येतं."
 
अशाच प्रकारे 19 जुलै 1947च्या प्रार्थना सभेत त्यांनी म्हटलं होतं, "मी गोहत्या बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं सांगणारी अनेक पत्र-टेलिग्राम माझ्याकडे येतात. मात्र, वास्तव हे आहे की जे स्वतःला गोरक्षक म्हणवून घेतात तेच खरे गोभक्षक आहेत. मी जवाहरलाल किंवा सरदार यांना असा कायदा बनवायला सांगावं, असं त्यांना वाटतं. पण मी त्यांना काही सांगणार नाही."
 
"मी या गोरक्षकांना सांगेन, की मला टेलिग्राम करण्यासाठी तुम्ही जो पैसा खर्च करता तो पैसा गायींवरच का खर्च करत नाहीत? तुम्ही खर्च करू शकत नसाल तर मला पाठवा. मी तर म्हणेन, की गायींची पूजा करणारेही आम्ही आहोत आणि त्यांचा वध करणारेही आम्हीच आहोत."
 
आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह
इंग्रज सून किंवा इंग्रज जावयाचं भारतीय समाजात आजही कौतुक होतं. मात्र हाच भारतीय समाज आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय लग्न करणाऱ्यांना उघडपणे झाडाला टांगून फाशी देतो.
 
आपल्याच मुलाबाळांबद्दल असा रानटी क्रूरपणा आणि निर्घृणता कोठून येते?
 
खरं म्हणजे जात आणि धर्माच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये बंदिस्त होऊन जगणाऱ्या समाजाला मानवतेच्या एकजुटीच्या आदर्शाला आणि निरपेक्ष प्रेमालाही संकुचित, सांप्रदायिक आणि जातीय दृष्टिकोनातून बघण्याची सवय लागली आहे.
 
जाती आणि धर्माची ही मानसिकता भारताला एकसंध आणि सभ्य बनविण्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. गांधींना हे कळून चुकलं होतं.
 
आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात आंतरजातीय विवाहाला विरोध करणाऱ्या गांधींचे विचार पुढे बदलले. ते इतके, की वर किंवा वधूपैकी कोणी एक दलित नसेल तर अशा लग्नसोहळ्याला जाणार नाही, असा निश्चयच त्यांनी केला होता.
 
7 जुलै 1946 रोजी 'हरिजन'मध्ये त्यांनी लिहिलं, "काळानुरूप अशा लग्नांची संख्या वाढेल आणि यातून समाजाचं हितच होईल. आमच्यात परस्पर सहिष्णुतेची समजही आलेली नाही. मात्र, जेव्हा सहिष्णुता वाढून सर्वधर्म समभावात रुपांतरित होईल त्यावेळी अशा विवाह सोहळ्यांचं आयोजन केलं जाईल."
 
"येणाऱ्या समाजाच्या नवरचनेत जो धर्म संकुचित राहील आणि बुद्धिप्रामाण्याला महत्त्व देणार नाही, त्याचा निभाव लागणार नाही. कारण नवीन समाजात मूल्य बदललेली असतील. माणसाची किंमत त्याच्या चारित्र्यावर ठरेल. पैसा, पदवी किंवा कुळावरून नाही."
 
"माझ्या कल्पनेतला हिंदू धर्म संकुचित नाहीये. तो तर काळाप्रमाणेच पुरातन महान आणि सतत विकसनशील आहे. त्यात पारसी, मूसा, ईसा, मोहम्मद, नानक आणि अशाच इतर धर्म संस्थापकांचाही समावेश होतो."
 
त्याची व्याख्या अशी आहे...
 
'विद्वद्भिः सेवितः सद्भिनित्यमद्वेषरागिभिः.
 
हृदयेनाम्यनुज्ञातो यो धर्मस्तं निबोधत..'
 
म्हणजे ज्या धर्माला राग-द्वेषहीन ज्ञानी संतांनी स्वीकारलं आहे आणि ज्याला आमचं मन आणि बुद्धी स्वीकारते तोच सद्धर्म आहे.
 
मात्र, गांधीजी अशा विवाहांच्या आधारे केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या विरोधात होते. त्यांच्या याच लेखात ते म्हणतात, " केवळ लग्नासाठी धर्मांतर करावं या गोष्टीच्या मी नेहमीच विरोधात होतो आणि आताही आहे. धर्म म्हणजे चादर किंवा ओढणी नाही की वाटेल तेव्हा पांघरलं आणि हवं तेव्हा काढून ठेवलं. या प्रकरणात धर्म बदलण्याचा विषयच नाही."
 
पत्रकार/संपादकांवर खोटे खटले दाखल करून पोलिसी छळ
पत्रकाराचं काय काम आहे? राज्यसत्तेवर लोकशाहीचा अंकुश असावा यासाठी सत्ता करत असलेल्या चुकांना निर्भयपणे जनतेसमोर मांडणं, हे पत्रकाराचं काम आहे.
 
स्वातंत्र्य चळवळीपासून भारतीय लोकशाहीला बळकट करण्यात, परिपक्व करण्यात भारताच्या निर्भिड पत्रकारांचं मोठं योगदान आहे.
 
मात्र आज काय घडत आहे? सत्तेविरोधात बातमी छापल्यास पत्रकारांना खुलेआम मारहाण केली जाते. त्यांच्याविरुद्ध खोटे खटले भरून त्यांना ताब्यात घेतलं जातं. मीडिया संस्थांच्या मालकांची, संपादकांची परिस्थितीही फार चांगली नाही. साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून त्यांच्यावर दबाव टाकला जातो.
 
दबावाचा सामना करून आपल्या लेखणीची धार कायम ठेवणारे पत्रकार विरळाच. निर्भिड पत्रकारांना पदावरून काढून टाकणं आता नेहमीच घडतं. मीडिया स्वातंत्र्याबाबत जगभरातल्या देशांच्या तुलनेत भारतातली परिस्थिती सर्वात वाईट असल्याचं सांगितलं जातं. लोकशाहीच्या हितासाठी पत्रकारांना संरक्षण देण्याऐवजी सत्ताधीश जेव्हा स्वतःच त्यांच्याविरोधात होतात तेव्हा भावी समाजासाठी हा चांगला संकेत नाही.
 
'नवा काळ' वृत्तपत्राचे संपादक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्यावर वारंवार खटले दाखल करून तेव्हाचं सरकार त्यांचा छळ करायचं.
 
गांधींनी 4 एप्रिल 1929 रोजी त्यांच्यासंदर्भात लिहिलं होतं, "नवा काळचे श्री खाडीलकर यांच्याविरोधात जो खटला चालवण्यात आला तो खरंतर खटला नाही, छळ आहे."
 
"मात्र जे सरकार जनतेच्या विरोधानंतरही चालवण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे त्या परिस्थितीत, जे आमच्या प्रकरणात आहे, ज्यात जन-विरोधाचं दमन केलं जातं, त्या सरकारच्या राज्यात स्पष्टवक्त्य संपादकांचा छळ होणार, हे निश्चितच आहे. एक दिवस ते मला म्हणाले होते, की एक पत्रकार म्हणून त्यांना वेळोवेळी जोखमीच्या कामांसाठी जो दंड ठोठावण्यात आला तो त्यांनी नाटकं लिहून भरला आहे."
 
तत्कालीन न्याय-व्यवस्थेवर एक कठोर प्रतिक्रिया देताना गांधी पुढे लिहितात, "या देशात इतर सरकारी संस्थांप्रमाणे न्यायालयंदेखील गरजेच्या वेळी सरकारच्या बचावासाठी तयार करण्यात आली आहेत. अशा प्रकारचे अनुभव आम्ही वारंवार घेतले आहेत."
 
"जनतेचं स्वातंत्र्य आणि सरकारचं हित एकाच गोष्टीत असतं तेव्हा आपल्याला हे कळत नाही. जेव्हा सरकारच्या विरोधात असूनही जनतेच्या स्वातंत्र्याचं रक्षण करावं लागतं, तेव्हा न्यायालय जनतेचं रक्षण करण्यात असमर्थ असल्याचं दिसून येतं. त्यांच्याशी जेवढा कमी संबंध येईल तेवढं बरं."
 
राज्यसत्तेद्वारा पोलिसांच्या दुरुपयोगावर 26 जानेवारी 1922 रोजी 'यंग इंडिया'मध्ये गांधींनी लिहिलं होतं, "भारतात पोलीस बदनाम आहे, यात शंका नाही. दमन नीतीमुळे ही बदनामी कदाचित अजून वाढली आहे. मात्र एक गोष्ट विसरता कामा नये, की पोलीस सरकारच्या हातातलं केवळ एक हत्यार आहे."
 
भारताच्या स्वातंत्र्याच्या जवळपास दोन महिन्यांपूर्वी 5 जून 1947 रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी बोलताना गांधीजींनी म्हटलं होतं, "मला शक्य झालं असतं तर मी पोलीस आणि सैन्य यांच्यात मूलभूत सुधारणेपासून सुरुवात केली असती. इंग्लंडमध्ये लोक पोलिसांना आपला सर्वश्रेष्ठ मित्र, सहकारी आणि कर्तव्य-भावनेचं मूर्तिमंत उदाहरण मानतात. भारतात मात्र सामान्य माणूस पोलिसांना भयंकर आणि अत्याचारी मानतो."
 
सत्तेचा अहंकार आणि सत्ता कायम राखण्याचा मोह लोकशाही व्यवस्था आणि लोकशाहीतल्या संस्थांना उद्ध्वस्त करतातच शिवाय समाजातही द्वेष, आक्रोश, अशांती, अज्ञान, गुलामगिरी आणि भीतीला जन्म देतात.
 
गांधी आपल्या प्रदीर्घ व्यावहारिक अनुभवातून हे सर्व शिकले. त्यांनी आयुष्यभर या सर्वांविरोधात संघर्ष केला होता. गांधींच्या आठवणी जागवण्याचा अर्थ आहे त्यांच्या या विचारांच्या प्रकाशात समाज आणि राजकारणाला बघणं आणि त्यात बदल घडवणं. नुकतंच कुणीतरी म्हटलं होतं, की गांधींना समजून घेणं आणि आत्मसात करणं ज्यांना कठीण वाटलं त्यांच्यासाठी सर्वात सोपं होतं त्यांची हत्या करणं.
 
मात्र कुठल्याच अन्याय, दमन, शोषण, पृथ्वीला गिळून टाकणारा मोह, लोकशाहीविरोधी युद्धाविरोधात गांधी विचार अडीग आहे. अहिंसा, संयम, दया, करुणा, सत्य आणि प्रेमाच्या आत्मविश्वासावर तो उभा आहे.