सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (15:22 IST)

काश्मीर : शाळा सुरू तर झाल्या, पण आता पुढे काय?

रियाज मसरूर
काश्मीरमध्ये मंगळवारी कर्फ्युचा 17वा दिवस होता. इथं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जी गेल्या अनेक दिवसांपासून तशीच आहे.
 
रोज संध्याकाळी जम्मू काश्मीरचं प्रशासन पत्रकार परिषद घेतं. सोमवारच्या पत्रकार परिषदेलाही आम्ही उपस्थित होतो. सोमवारची पत्रकार परिषद अगदी थोड्या वेळासाठी झाली. त्यात पत्रकारांचे प्रश्न घेण्यात आले नाहीत.
 
सगळं काही आलबेल आहे असा पत्रकार परिषदेचा सूर असतो. काही ठिकाणी आंदोलनकर्ते सुरक्षा यंत्रणांवर दगडफेक करतात. स्थानिक पातळीवरच परिस्थिती नियंत्रणात आणली गेली असं सांगण्यात येतं.
 
काश्मीरमध्ये पाचवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यात. शाळेतली उपस्थिती 30 ते 50 टक्के असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. मात्र बहुतांश शाळांमध्ये प्रत्यक्षात मुलं आलीच नाहीत.
 
मंगळवारी आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होतील असं प्रशासनाने जाहीर केलं. मात्र आता हे वर्ग बुधवारी सुरू होतील.
 
शिक्षक आणि विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू न शकल्याचं कारण म्हणजे असंख्य ठिकाणी नाकेबंदी आहे. श्रीनगरव्यतिरिक्त शोपिया, कुलगाम, बिजबेहडासह बांदीपुरा, बारामुला, कुलगाम, सोपोर याठिकाणी कठोर नाकाबंदी आहे.
 
शाळा नीट सुरू व्हाव्यात असा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र मुलांचे पालक मुलं सुखरूप असायला हवीत या काळजीत आहेत. सगळ्यांत आधी विद्यार्थ्यांची सुरक्षेबाबत हमी मिळायला हवी असं पालकांचं म्हणणं आहे.
 
कर्फ्यू शिथिल झालाय का?
सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत कार्यालयात पोहोचावं असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे ते स्वत:च्या आणि नातेवाईकांच्या गाडीत बसून ऑफिस गाठतात. जी माणसं आजारी आहेत ते आपल्या गाडीतून हॉस्पिटलपर्यंत जात आहेत कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णत: बंद आहे.
 
अशा पद्धतीने गाड्या रस्त्यावर असतात. अनेक ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्याचा एक भाग बंद केलेला असतो. त्यामुळे दोन्ही दिशेचा ताण रस्त्याच्या एकाच बाजूला येतो.
 
जाण्यायेण्यात काही अडचण येत नाही मात्र ठिकठिकाणी गाडी थांबवून ओळखपत्र मागितलं जातं, त्याची शहानिशा केली जाते. ओळखपत्र नसेल तर कर्फ्यू पास विचारला जातो.
 
अटीशर्ती अजूनही कायम आहेत. मात्र प्रशासनाने कर्फ्यूत ढील दिली आहे, असं सांगितलं जात आहे. सोमवारी प्रशासनाने पत्रकारांसाठी कर्फ्यू पास जारी केले. मात्र त्यावर कर्फ्यू कधी संपणार याविषयी लिहिलेलं नाही. याचाच अर्थ कर्फ्यूची मुदत वाढू शकते.
 
लोकांना जीवनावश्यक वस्तू कशा मिळतात?
रोज लागणाऱ्या वस्तू मिळण्यात नागरिकांना फारशा अडचणी नाहीत. कारण दूध, ब्रेड, भाज्यांची छोटी दुकानं सुरू आहेत.
 
श्रीनगर शहरात दोन भाजीमंडई आहेत. याठिकाणी पहाटे 4 ते 8 या वेळेत दुकानदार भाज्यांची खेरदी करतात. मात्र उन वाढल्यानंतर बाजार आणि मंडईत शुकशुकाट असतो.
 
अनेक ठिकाणी अॅम्ब्युलन्सवरही दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर काश्मीर खोऱ्यातील सगळ्यांत मोठं हॉस्पिटल शेरे काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने लोकांना आवाहन केलं आहे. अॅम्ब्युलन्स अडवू नका, त्याचं नुकसान करू नका असं आवाहन या हॉस्पिटलने केलं आहे.
 
आपात्कालीन सेवा देणारी माणसं अॅम्ब्युलन्समधून येजा करत असतात. त्यामुळे त्यांना त्रास देऊ नका असं हॉस्पिटलने म्हटलं आहे.
 
कुठे होतेय दगडफेक?
शोपिया, कुलगाम, अनंतनाग याठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. दर दिवशी संध्याकाळी कथित दगडफेक करणाऱ्यांना अटक केली जाते असं स्थानिकांचं म्हणणं आहे. दिवसभरात याविरुद्ध आंदोलन केलं जातं.
 
श्रीनगरमधील सौरा भाग आंदोलनानंतर हळूहळू सावरतो आहे. सौरा भाग हॉस्पिटलच्या वाटेवर आहे. तिथे रोज आंदोलनं होतात.
 
सरकारने सुरुवातीला नेत्यांच्या बरोबरीने फुटीरतावाद्यांनाही अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेतेही अटकेत आहेत.
 
आंदोलन आयोजित करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर कट्टरतावाद्यांविरुद्ध कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं.
 
प्रक्षोभक भाषणं करणाऱ्या इमाम आणि मौलवींवर करडी नजर असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. विरोध कायम असल्याने ही प्रशासनाची जुनी नीती आहे.
 
अनेक ठिकाणांहून कर्फ्यू हटवण्यात आला आहे. मात्र तरीही दुकानं उघडलेली नाहीत आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.