शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (15:36 IST)

खदिजा: इस्लामची स्थापना करण्यात या महिलेची काय भूमिका होती?

मार्गारिटा रॉड्रिगेज
"त्यांनी खरोखरच सर्व परंपरा मोडीत काढल्या होत्या. आजपासून 1400 वर्षांपूर्वी त्यांनी जे केलं, ते आजच्या काळातील बायकांसाठीही खरंच खूप प्रेरणादायी आहे."
 
युकेमधल्या मँचेस्टर शहरात इमाम असलेले असद झमान खदिजाबद्दल सांगतात. 6 व्या शतकात सध्याच्या सौदी अरेबियामध्ये खदिजा यांचा जन्म झाला होता.
त्या स्वतः अतिशय श्रीमंत, प्रभावशाली होत्या. समाजात त्यांना आदर होता. अनेक मान्यवर उमरावांनी त्यांनी लग्नासाठी मागणी घातली होती, पण त्यांनी हे प्रस्ताव फेटाळून लावले होते.
 
नंतर त्यांनी विवाह केला...तोही दोनदा. पहिला पती वारला आणि दुसऱ्या नवऱ्यापासून त्यांनी स्वतःच विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
 
त्यानंतर खदिजा यांनी पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निश्चय केला. पण त्यांच्या आयुष्यात अजून एक पुरूष आला. त्यांनी त्याच्याशी विवाह केला. खदिजा यांचं हे तिसरं लग्न अखेरपर्यंत टिकलं.
 
खदिजानं त्याच्यामध्ये काही असे गुण पाहिले होते, ज्यामुळे त्यांचा लग्नाबद्दलचा विचार बदलला, झमान हे बीबीसीशी बोलताना सांगितलं.
त्याकाळचा विचार करता एखाद्या स्त्रीने आपला नवरा निवडणं आणि त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवणं हे खूपच विलक्षण होतं. तिसऱ्या लग्नाच्या वेळेस खदिजाचं वय 40 वर्षं होतं आणि त्यांचा होणारा नवरा 25 वर्षांचा होता. त्याची परिस्थितीही सामान्य होती.
 
पण ही केवळ एका सामान्य मुलाची आणि श्रीमंत स्त्रीची प्रेमकहाणी नव्हती....ती जगातल्या दुसऱ्या सर्वांत मोठ्या धर्माच्या स्थापनेची सुरुवात होती. कारण खदिजा यांचा तिसरा नवरा मोहम्मद होते, ज्यांना आपण मोहम्मद पैगंबर म्हणून ओळखतो.
 
स्वतःचा व्यापार चालवणारी महिला
रॉबर्ट हॉयलंड हे न्यू यॉर्क विद्यापीठात प्राध्यापक आहेत. मध्य पूर्वेचा प्राचीन इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. खदिजा नेमकी कोण होती, याबद्दल सविस्तर चित्र उभं करणं सध्याच्या काळात अवघड आहे. कारण त्यांच्याबद्दल उपलब्ध असलेल्या गोष्टी त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनंतर लिहिण्यात आल्या आहेत.
 
पण त्यांच्याबद्दल जे काही लिहिलं गेलं त्यावरून हे लक्षात येतं की, ती जबरदस्त इच्छाशक्ती असलेली, स्वतःचं आयुष्य मोकळेपणानं जगण्याची इच्छा असलेली स्त्री होती, हॉयलंड यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.
याची काही उदाहरणंही त्यांनी सांगितली. परंपरेप्रमाणे त्यांनी आपल्या चुलत भावाशी लग्न करावं, अशी खदिजाच्या कुटुंबियांची इच्छा होती. पण त्यांनी या गोष्टीला नकार दिला. कारण त्यांना आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडायचा होता.
 
खदिजा ही एका व्यापाऱ्याची मुलगी होती. त्यांच्या वडिलांनी पिढीजात व्यवसायाचं रुपांतर एका आर्थिक साम्राज्यामध्ये केलं.
 
एका युद्धात ते मारले गेल्यानंतर खदिजा यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळायला सुरूवात केली.
 
"या जगात कसं वावरायचं हे त्यांना निश्चितच माहीत होतं. किंबहुना त्यांच्या व्यवसायामुळेच खदिजाला तो मार्ग सापडला, ज्यामुळे नंतर जगाचा इतिहासच बदलला," असं इतिहासकार बेटनी ह्यू यांनी बीबीसीच्या माहितीपटात म्हटलं आहे.
 
कशी झाली मोहम्मद-खदिजा यांची भेट?
खदिजा त्यांचा सर्व व्यवसाय मक्केमधून चालवायच्या. व्यवसायाची गरज म्हणून मालवाहतूक करण्यासाठी खदिजा यांना वाहनांच्या ताफ्याची आवश्यकता असायची. मध्य पूर्वेतील मोठ्या शहरांमध्ये ही वाहतूक चालायची.
 
दक्षिण येमेनपासून उत्तर सीरियापर्यंत हा व्यापार चालायचा.
 
खदिजा यांना वारसाहक्कानं संपत्ती मिळाली असली तरी त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आपला व्यवसाय वाढवला होता, असं फौझिया बोरा सांगतात. त्या युकेमधील लीड्स विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर आहेत. इस्लामिक हिस्ट्री हा त्यांचा विषय आहे.
"त्या सध्याच्या भाषेत बोलायचं तर 'बिझनेसवूमन होत्या आणि स्वतःवर त्यांचा प्रचंड विश्वास होता," बोरा सांगतात.
 
खदिजा या आपल्या कर्मचाऱ्यांची निवड स्वतः करायच्या. आपल्या व्यवसायाला फायदा होईल अशी कौशल्यं असलेल्या व्यक्तींची त्या काळजीपूर्वक निवड करायच्या.
 
त्यांनी एका अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू माणसाबद्दल ऐकलं होतं. त्याच्यासोबत भेट झाल्यानंतर खदिजा यांनी आपल्या एका ताफ्याचं नेतृत्व करण्यासाठी त्या व्यक्तीची निवड केली.
 
खदिजा यांना त्या तरुणाचा दृढनिश्चय आवडला. जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसं खदिजा यांना या तरुणानं प्रभावित केलं आणि त्यांनी पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला.
 
या तरुणाचं नाव होतं मोहम्मद. आई-वडील नसलेल्या मोहम्मदला त्याच्या काकांनी सांभाळलं होतं. "लग्नाचा हा प्रस्ताव मोहम्मदसाठी स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी घेऊन येणारा ठरला," फौझिया बोरा सांगतात.
 
या जोडप्याला चार मुलं झाली असं सांगतात. पण त्यापैकी केवळ मुलीच जगल्या.
 
मोहम्मद आणि खदिजा यांच्या लग्नाचं अजून एक वैशिष्ट्य लंडनमधल्या मुस्लिम इन्स्टिट्यूटमधील प्राध्यापक रानिया हफाझ सांगतात. या विवाहात एक पत्नीत्वाचं पालन केलं गेलं.
 
"तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार करता ही गोष्ट अतिशय उल्लेखनीय होता. त्याकाळी बहुतांश पुरूषांना एकापेक्षा अधिक पत्नी असायच्या. बहुपत्नीत्वाची पद्धत समाजमान्य होती."
 
मोहम्मद यांचा प्रेषित बनण्याचा प्रवास
खदिजा यांच्याप्रमाणेच मोहम्मद हे देखील कुरैश या जमातीमध्ये जन्मले आणि वाढले होते. त्याभागातील अनेक जमाती अनेक देवतांची उपासना करायच्या.
लग्नानंतरच्या काही वर्षांनी मोहम्मद यांचा कल आध्यात्मिक गोष्टींकडे वाढला आणि ते मक्केच्या आसपासच्या पर्वतरांगांमध्ये उपासनेसाठी गेले.
 
इस्लामिक मान्यतांप्रमाणे मोहम्मद यांना गॅब्रिएलच्या माध्यमातून थेट परमेश्वरानेच आज्ञा केल्या. ग्रॅबिएल हा तोच देवदूत होता, ज्याने मेरीला ती येशूची माता होईल, असं सांगितलं होतं.
 
मोहम्मद यांनी मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण हा दैवी साक्षात्काराच्या माध्यमातून लिहिला असं सांगितलं जातं.
 
ज्यावेळी मोहम्मद यांना पहिला दैवी संदेश मिळाला, तेव्हा ते खूप घाबरले असंही म्हटलं जातं. कारण नेमकं काय होत आहे, हे त्यांच्या लक्षातच आलं नाही.
 
"आपण नेमका काय अनुभव घेतोय, हे त्यांना कळलं नाही. त्यांना नेमका संदर्भ कळला नाही. कारण ते एकाच ईश्वराची उपासना या संकल्पनेत वाढले नव्हते," फौजिया बोरा सांगतात.
 
"ते या अनुभवानंतर गोंधळले होते. हे दैवी संदेश स्वीकारणं कठीण होतं, अशी मान्यता आहे. तो अनुभव खूप तरल असला तरी शारीरिकदृष्ट्या धक्कादायकही होता."
 
प्राध्यापक हॉयलंड सांगतात की, ज्या एकमेव व्यक्तीवर सर्वाधिक विश्वास होता, त्याच व्यक्तिचा सल्ला घेण्याचं मोहम्मद यांनी ठरवलं."
 
खदिजा यांनी त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यांना शांत केलं. ही एक खूप चांगली घटना असल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यांनी मोहम्मद यांना दिलासा दिला.
 
ख्रिश्चन धर्माचा अभ्यास असलेल्या एका नातेवाईकाकडून त्यांनी यासंदर्भात सल्लाही घेतला.
 
वराक इब्न नवफल यांनी मोहम्मद यांना मिळालेल्या दैवी संदेशांची सांगड ही मोझेसला मिळालेल्या संदेशाशी घातली, अशीही मान्यता आहे.
 
"त्यांना आधीची शास्त्रवचनं माहीत होती," बोरा सांगतात. "एकप्रकारे हे अधिकारी व्यक्तीकडून या संदेशांची पुष्टी करून घेण्याचा प्रयत्न होता."
"आपल्याला माहीत आहे की पहिल्यांदा जेव्हा हा दैवी संदेश मिळाला, तेव्हा मोहम्मद यांना स्वतःवरच संशय निर्माण झाला. पण खदिजायांनी त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला की, ते प्रेषित आहेत," हॉर्वर्ड विद्यापीठात इस्लामच्या अभ्यासक असलेल्या लैला अहमद सांगतात.
 
पहिली मुस्लिम व्यक्ती एक महिला होती
मोहम्मद यांना जे दैवी संदेश मिळाले होते, ते ऐकणारी पहिली व्यक्ती खदिजा होत्या, असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळेच अभ्यासकांच्या मते खदिजाया इतिहासातील पहिली 'मुस्लिम' व्यक्ती होत्या, नव्यानंच स्थापन झालेल्या धर्माचा स्वीकार करणाऱ्या खदिजा या पहिल्याच व्यक्ती होत्या.
 
त्यांनी या संदेशांवर विश्वास ठेवला आणि त्यांचा स्वीकारही केला," फौजिया बोरा यांनी म्हटलं.
 
"त्यामुळे या संदेशाचा प्रसार करण्याचा विश्वास मोहम्मद यांच्यामध्ये निर्माण झाला, असं मला वाटतं."
 
इतिहासतज्ज्ञ बेटनी ह्यू यांच्या मते मोहम्मद यांनी याच टप्प्यावर जमातीच्या ज्येष्ठांच्या समजुतीला आव्हान दिलं आणि 'अल्लाह हा एकच देव आहे आणि इतरांची उपासना करणं ही ईशनिंदा आहे,' या संदेशाचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला.
फौजिया बोरा यांच्यामते, जेव्हा मोहम्मद यांनी इस्लामची शिकवण द्यायला सुरूवात केली, तेव्हा मक्केमधील एकेश्वरवादावर विश्वास नसलेल्या अनेकांकडून मोहम्मद यांना विरोध झाला.
 
"त्यावेळी मोहम्मद यांना ज्या सहकार्याची, आधाराची गरज होती, तो त्यांना खतिजाकडून मिळाला," असं फौजिया बोरा सांगतात.
 
"पुढची दहा वर्षे खदिजा यांनी आपले कौटुंबिक संबंध आणि संपत्ती यांचा वापर आपल्या पतीला मदत करण्यासाठी केला. ज्या समाजात अनेकेश्वरवाद रुजला होता, त्या समाजात एकाच ईश्वराच्या उपासनेचा संदेश देणारा धर्म रुजविण्यासाठी खदिजा यांनी मदत केली," असं ह्यू यांनी म्हटलं.
 
'दुःखाचं वर्षं'
खदिजा यांनी आपल्या पतीला आणि नव्यानं रुजत असलेल्या इस्लामला पाठिंबा देण्यासाठी यथाशक्ती सर्व प्रयत्न केले. पण 619 मध्ये त्या आजारी पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
25 वर्षांचा संसार मोडल्यानंतर मोहम्मद कोलमडून पडले.
 
"ते खदिजा यांच्या मृत्यूमधून कधीच सावरले नाहीत," प्राध्यापक हॉयलंड सांगतात. "खदिजा या मोहम्मद यांच्या खूप जवळच्या मैत्रीण होत्या आणि सहचारिणीही होत्या, हा त्यांच्या नात्यातला सर्वांत उल्लेखनीय भाग होता," प्राध्यापक हॉयलंड सांगतात.
 
मुस्लिमांमध्ये आजही खदिजा यांच्या निधनाचं वर्ष हे 'दुःखाचं वर्ष' म्हणून आठवलं जातं, याकडे इतिहासकार बेटनी ह्यू लक्ष वेधतात.
 
खदिजा यांच्या लग्नानंतर काही वर्षांनी मोहम्मद यांनी पुन्हा लग्नही केलं. यावेळी त्यांनी बहुपत्नीत्वाचा स्वीकार केला.
 
मुस्लिम अभ्यासक आणि खदिजा यांच्यावर लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाच्या लेखिका फातिमा बरकतुल्ला यांनी बीबीसीच्या एका कार्यक्रमात सांगितलं की, खदिजा यांच्याबद्दल जी माहिती मिळते ती हादीस- गोष्टी, परंपरा आणि मोहम्मद यांच्या आयुष्याबद्दल उपलब्ध साहित्यातून मिळते. मोहम्मद यांच्या अतिशय जवळच्या सहकाऱ्यांनी पहिल्यांदा सांगितलेल्या आठवणींमध्ये त्यांचा उल्लेख येतो. नंतर या गोष्टी लिहून ठेवल्या गेल्या.
 
हादीसच्या निवेदकांपैकी एका आएशा होत्या. त्या मोहम्मद यांच्या पत्नी होत्या आणि इस्लाममध्ये मान्यता पावलेल्या खदिजा यांच्यानंतरच्या महिला होत्या.
 
"सरळ गोष्ट आहे की, खदिजा यांच्याबद्दल त्यांना प्रेषितांनीच सांगितलं असणार. हे दैवी संदेश प्राप्त झाल्यानंतर काय झालं असेल आणि ते प्रेषित बनल्यानंतर नेमकं काय घडलं या गोष्टी आएशा यांनी मांडल्या," फातिमा बरकतुल्ला यांनी म्हटलं.
 
आएशा यांनी प्रेषित मोहम्मदांचे सुरुवातीचे दिवस अनुभवले नसले तरी इस्लामचा संदेश पोहोचवण्याचं काम त्यांनी श्रद्धेनं केल्याचंही बरकतुल्ला सांगतात.
 
आदर्श व्यक्तिमत्त्व
मुस्लिम समुदायात महिलांना चार भिंतीतच कोंडून ठेवलं जातं, हा जो समज रुजला आहे, तो दूर करण्यासाठी खदिजा यांचा इतिहास महत्त्वाचा ठरू शकतो, असं फौजिया बोरा यांनी म्हटलं.
मोहम्मद यांनी खदिजा यांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टी करण्यापासून परावृत्त केलं नाही. किंबहुना इस्लामनं महिलांना अधिकार आणि महत्त्वाचं स्थान दिलं होतं, असंही फौजिया सांगतात.
 
"इतिहासकार आणि एक मुस्लिम या नात्याने खदिजा या माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. फातिमा (मोहम्मदांच्या मुलींपैकी एक) आणि आएशा या महिलाही प्रेरणादायी होत्या," फौजिया बोरा सांगतात.
 
"त्या बुद्धिवादी होत्या, राजकीयदृष्ट्या सक्रीय होत्या आणि त्यांनी धर्मप्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली. एक शिक्षिका म्हणून त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी शिकवणं हे माझ्यासाठीही खूप महत्त्वाचं वाटतं."