बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 8 मार्च 2023 (10:19 IST)

कोमल काळे : 'लग्न झालेली, एक मुलगा असणारी महिला बाऊन्सर? लोक नावं ठेवतातच'

- अनघा पाठक
"बाऊन्सर म्हणून काम करत असताना अनेकदा कानावर येतं, लग्न झालेली बाई, सासरी राहाते, त्यात तिला एक मुलगा आणि तरी असं काम करते? हिच्या घरचे तरी कशी परवानगी देतात हिला?"
 
अहमदनगरच्या कोमल काळे मला सांगत होत्या.
 
पुण्यातल्या एका शाळेतल्या महिला बाऊन्सरने पालकाला मारहाण केल्याचा व्हीडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर मला प्रश्न पडला होता की कोण असतात या महिला बाऊन्सर, कोणत्या पार्श्वभूमीमधून येतात, कसं असतं त्यांचं आयुष्य?
 
हेच जाणून घ्यायला मी कोमलला भेटायला आले होते. गल्लीच्या कोपऱ्यावरच हसऱ्या चेहऱ्याच्या कोमल आम्हाला घ्यायला आल्या होत्या. दिसायला कोणत्याही सर्वसाधारण गृहिणीसारख्या. अंगात एक कुर्ता आणि लेगीन.
 
त्यांच्या दोन खणी घरात गेल्यावर अगत्याने आमची विचारपूस केली, चहा केला. आम्हाला व्हीडिओ करायचा होता म्हणून कपडे बदलून आल्या.
 
बाऊन्सरचा युनिफॉर्म. काळा हाफ बाह्यांचा शर्ट, काळी पॅन्ट आणि घट्ट बांधलेले केस.
 
एका गृहिणीची बघता बघता कणखर बाऊन्सर झाली. खरं म्हणजे दोघी एकाच महिलेचं रूप होत्या.
 
गप्पा सुरू झाल्या आणि मी विचारलं की, महिला बाऊन्सर व्हावं असं का वाटलं तुम्हाला?
 
"पोलीस होऊ शकले नाही म्हणून," त्या पटकन उत्तरल्या.
 
कोमल काळेंना पोलीस बनायचं होतं, पण त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. बाऊन्सर बनल्यानंतर त्यांचं एक स्वप्न काही अंशी पूर्ण झालं.
 
"मी लहानपणापासूनच अशी बिनधास्त होते. मला खेळ पण मुलांचे आवडायचे. कपडेही तसेच घालायचे, जीन्स टीशर्ट असे. मला खूप हौस होती पोलीस बनायची. पण ते शक्य झालं नाही. लग्नानंतर मी अनेक ठिकाणी नोकरी केली. एकदा जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होते. तेव्हा मला सरांनी विचारलं की बाऊन्सर म्हणून काम कराल का?" त्या पुढे सांगतात.
 
त्यांनी पाच वर्षांपूर्वी हे काम सुरु केलं तेव्हा या शहरात बाऊन्सर म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
 
कोमल म्हणतात, "त्यावेळी काही इव्हेंट असेल तर मुली पुण्याहून बोलवाव्या लागायच्या. कारण अहमदनगरमध्ये कोणी महिला बाऊन्सर कधी पाहिल्याच नव्हत्या. मग मी म्हटलं ठीक आहे सर मी करेन. तेव्हा खूप विरोध झाले की असलं काम कशाला करायचं वगैरे. पण मला आधीपासूनच इतरांपेक्षा वेगळं करायला आवडायचं आणि मी तेच केलं."
 
लहानपणीपासूनच बिनधास्त आणि डॅशिंग असलेल्या कोमल या कामात लगेचच रुळल्या. अनेक टवाळखोरांना त्यांच्या हातचा प्रसादही मिळाला आहे.
 
एकदा त्यांची गाडी एका मुलाने रस्त्यात अडवली. त्यांच्या बरोबर त्यांची मैत्रिणही होती. तो मुलगा या दोघींना त्रास द्यायला लागला तशा त्या दोघींना त्या मुलाचीच उलट तपासणी केली.
 
"त्याच्या बोलण्यावरून कळतं होतं की तो आम्हाला छेडायला आलाय. मग आम्हीच त्याच्या गाडीची चावी काढून घेतली आणि त्याच्या दोन-तीन बुक्क्या हाणल्या. एकदोन मी ठेवून दिल्या, एक माझ्या मैत्रिणीनी मारली. मग तोच पळून गेला."
 
"एकदा असाच एक मुलगा त्रास द्यायचा तर मी त्याच्या घरी जाऊन त्याला मारलं होतं."
कोमलकडे सांगण्यासारखे असे अनेक किस्से आहेत.
 
बाऊन्सरचं काम करताना काय ट्रेनिंग घ्यावं लागतं असं मी विचारलं की म्हणतात, "ट्रेनिंग असं विशेष नाही. पण तुम्हाला तुमचं स्वतःच रक्षण करता आलं पाहिजे. तरच तुम्ही दुसऱ्याचा बचाव कराल ना. तुम्ही स्वतः फिट पाहिजे."
 
आजही कोमल घर, संसार, मुलगा, जॉब या सगळ्यातून जीमसाठी थोडा वेळ काढतातच.
 
"महिला बाऊन्सर म्हणून जेव्हा आपण जातो काम करायला एखाद्या ठिकाणी तेव्हा सगळेच पुरुष वाईट भेटत नाही. पण काही काही असतात आगाऊ, उगाचच आपला टाईमपास करतात मुद्दाम. त्यांना अडवलं, जाऊ दिलं नाही तर वाद घालतात, कधी कधी अंगावर धावून येतात. त्यावेळी आम्हाला सांगितलेलं असतं काय करायचं. त्यावेळी बरोबर आम्ही आमची पावर युझ करतो," त्या स्पष्ट सांगतात.
 
कोमलनी आता अनेक मुलींनाही या कामासाठी तयार केलं आहे.
 
"मी अनेक मुलींच्या घरी जायचे, त्यांच्या पालकांना पटवून द्यायचे की हे काम वाईट नाही. म्हणायचे मी एका मुलाची आई असून हे काम करतेय. तुम्हीही तुमच्या मुलीला पाठवा. कामही चांगलं आहे आणि घराला आर्थिक हातभारही लागेल."
 
आपल्या सोबत आलेल्या मुलींची सगळी जबाबदारी कोमल स्वतः घेतात. त्यांना घरून पिक-अप करण्यापासून घरी सोडेपर्यंत सगळं त्या करतात. त्यांना कार्यक्रमात त्रास होणार नाही याकडेही जातीने लक्ष देतात.
 
"एकदा आमचा श्रीरामपूरला इव्हेंट होता. तो संपला रात्री साडेअकराला. माझ्यासोबत ज्या मुली होत्या त्या प्रत्येकीला घरी सोडून मला घरी येईपर्यंत पहाटेचे साडेचार वाजले."
 
कोमल पार्टीज, सेलिब्रिटी इव्हेंट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठी लग्नं अशा ठिकाणी बाऊन्सर म्हणून काम करतात. पण कोमल यांच्यासाठी सर्वाधिक आव्हानात्मक होती ती कोव्हीड सेंटरच्या महिला वॉर्डबाहेर केलेली ड्युटी.
 
"कोव्हिडची ड्युटी सगळ्यात चँलेजिंग होती. त्यासाठी मला बरेच कष्ट पडले. बारा-बारा तासांची ड्युटी असायाची. नाईटला पण जागावं लागायाचं. दिवसा तर मी असायचेच पण रात्री कुठलीच पण कुठलीच लेडी बाऊन्सर तयार नसायची तर डबल ड्युटी मलाच करावी लागली. ड्युटी करत असताना मला घरचं पण बघावं लागायचं."
 
त्या पुढे म्हणतात, "रात्रीची ड्युटी केली की तिथून फ्रेश वगैरे होऊन तिथून घरी येऊन सॅनिटाईज करून घरातल्यांचा स्वयंपाक, मुलाचा नाश्ता वगैरे करून मी सकाळी परत ड्युटीवर तिथे जायची. पुन्हा दुपारी चारपाच वाजता दोनएक तासाचा ब्रेक घेऊन परत संध्याकाळचा स्वयंपाक करून परत 8 वाजता तिथे जायचे. तोवर दुसऱ्याला थांबवायचे. ते सहकार्य करायचे. असंच करत मी डे-नाईट ड्युटी करत एक सहा महिने कोव्हिड सेंटरला ड्युटी केली."
 
बाऊन्सर म्हणून काम करणं आव्हानात्मक आहेच पण त्याबरोबरीने घरच्या सगळ्या जबादाऱ्याही त्या सांभाळतात. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी एक लेडीज शॉपीही त्या चालवतात, मुलाच्या शिक्षणात जातीने लक्ष घालतात पण तरीही त्यांना नावं ठेवणारी तोंडं बंद होत नाहीत.
 
"बरेचसे लोक नावं ठेवतात कपड्यांवरून. म्हणतात, आता एक मुलाची आई आहे, एका मुलाच्या आईने कसं राहिलं पाहिजे. पंजाबी ड्रेस घालायला हवा किंवा साडी नेसायला हवी आणि ही जीन्स घालून फिरतेय."
 
पण कोमल नाव ठेवणाऱ्यांकडे लक्ष देत नाहीत. ते लोक माझं घर चालवायला येणार नाही, असं स्पष्ट शब्दात सांगतात.
आता मुलाचं म्हणाल तर फक्त साडी नेसूनच आई प्रेम करते का तिच्या मुलावर. जीन्स घातलेली आई आपल्या मुलांवर प्रेम करत नाही. जीन्स घातली तर तिची आई ही पदवी निघून जाते का? "आणि हे जे चाललंय, जे काम करतेय ते मुलाच्या भविष्यासाठीच ना. त्याच्याच साठी तडजोड चाललीये ना. हे कपड्यांविषयी मला काही वाटत नाही, प्रेम तर सगळ्यांचंच असतं आपल्या मुलांवर," त्या उत्तरतात.
 
कोमल यांनी अहमदनगरसारख्या लहान शहरात नवी वाट चोखाळली. त्यात त्यांना त्यांच्या पतीची भक्कम साथ लाभली आणि आता त्या इतर मुलींनाही यासाठी तयार करत आहेत.
 
आम्ही निघालो तेव्हा कोपऱ्यावर असलेलं त्यांनी आपलं दुकान दाखवलं. इथे त्या बायकांच्या गरजेच्या लहान मोठ्या गोष्टी विकतात. महिलांचे ब्लाऊज शिवतात.
 
त्यांच्याकडे बघून मला वैयक्तिक तरी खूप कौतुक वाटलं. या बाईला ना कुठल्या कामाची लाज होती ना ती कोणत्या 'नाजूक' किंवा 'कणखर' साच्यात अडकत होती.
 
घरातला स्वयंपाक, मुलाचा अभ्यास घेत होती. बाहेर टवाळखोरांना फटकवत होती. ज्या हाताने जीममध्ये जड जड वजनं उचलत होती त्याच हाताने महिलांनी शिवायला टाकलेल्या कपड्यांचं कटिंग आणि शिलाईही करत होती.
 
तिच्या लेखी हे काम बाईचं आणि हे पुरुषाचं असं काही नव्हतंच. असंच जग असावं हे स्वप्न आपण कित्येक दशकं पाहातोय की नाही?