रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (17:30 IST)

नरेंद्र मोदी ‘कोव्हॅक्सिन’ घेऊनही अमेरिकेत जाऊ शकले कारण...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले.
 
अमेरिका दौऱ्यात मोदी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार असून, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेलाही संबोधत करणार आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्णत: भारतीय बनावटीची कोरोनाविरोधी 'कोव्हॅक्सिन' लस घेतलीये.
 
कोव्हिड-19 विरोधी 'कोव्हॅक्सिन'ला जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) मान्यता अजूनही मिळालेली नाही. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही (FDA) 'कोव्हॅक्सीन'ला मंजूरी दिलेली नाही.
 
एकीकडे 'कोव्हॅक्सिन'चे दोन्ही डोस घेतलेल्या कोट्यावधी भारतीयांसमोर परदेश प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला असताना. दुसरीकडे पंतप्रधानांना अमेरिकेत जाण्याची परवानगी कशी मिळाली? यावर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
पंतप्रधान मोदींनी घेतली 'कोव्हॅक्सिन' लस
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 मार्चला दिल्लीतील ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (AIIMS) कोरोनाविरोधी लशीचा पहिला डोस घेतला.
 
पंतप्रधान मोदींनी लशीचा डोस घेतल्यानंतर वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांनुसार, आत्मनिर्भर भारताचं व्हिजन मांडणाऱ्या नरेंद्र मोदींनी संपूर्णत: भारतीय बनावटीची भारत बायोटेक कंपनीची 'कोव्हॅक्सिन' लस घेतली आहे.
पहिला डोस घेतल्यानंतर एप्रिल महिन्यातच मोदींनी 'कोव्हॅक्सिन'चा दुसरा डोस घेतला.
 
भारतात आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांना 'कोव्हॅक्सिन' लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
 
मोदींच्या प्रवासावर सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आले प्रश्न
मोदींनी घेतलेल्या कोरोनाविरोधी 'कोव्हॅक्सिन' लशीला मान्यला नसल्याने, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांच्या परदेशी प्रवासाबाबत संभ्रम अजूनही कायम आहे. त्यामुळे, मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'चे प्रोड्यूसर निखील अल्वा यांनी नरेंद्र मोदींनी खरचं कोणती लस घेतली? असा सवाल ट्विटरवर उपस्थित केलाय.
 
ते लिहीतात, "पंतप्रधानांप्रमाणे मी देखील आत्मनिर्भर 'कोव्हॅक्सिन' लस घेतली. आता इराण, नेपाळ आणि मोजकेच देश सोडले. तर, मी इतर कोणत्याच देशात जाऊ शकत नाही. पंतप्रधान अमेरिकेला गेले हे ऐकून मी गोंधळून गेलोय. याचं कारण, अमेरिकेत 'कोव्हॅक्सिन'ला मान्यता नाही."
 
कोव्हॅक्सिन लस घेतलेले नरेंद्र मोदी अमेरिकेला गेलेच कसे? असा प्रश्न कॉंग्रेसच्या सोशल मीडियाचे समन्वयक विनय कुमार डोकानिया यांनीही उपस्थित केलाय. निखील अल्वा यांच्या ट्वीटवर ते लिहितात, "पंतप्रधानांना अमेरिकेत जायची परवानगी कशी मिळाली? जेव्हा त्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. ज्याला अमेरिकेत मान्यता नाही?"
 
पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनीदेखील ट्विटरवर कोव्हॅक्सिनला अमेरिकेत मान्यता नाही. मग मोदींना अमेरिकेत जाण्याची परवानगी कशी मिळाली? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
 
मोदींना परवानगी का मिळाली?
कोव्हॅक्सिनला मंजूरी मिळालेली नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेने परवानगी कशी दिली? हे आम्ही आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
ते म्हणाले, "लसीचा मुद्दा फक्त भारताचा नाही. जगभरातील अनेक देशांसमोर हा प्रश्न आहे. प्रत्येक देशात अमेरिकेने आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिलेली कोरोनाविरोधी लस उपलब्ध आहे असं नाही. त्यामुळे सवलत द्यावी लागेल."
पंतप्रधान अमेरिका दौऱ्यायत संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. जगभरातील 193 देशांचे प्रमुख त्याठिकाणी येणार आहेत.
 
शैलेंद्र देवळकर पुढे सांगतात, "ज्यावेळी परराष्ट्रसंबंधविषयक दौरे होतात. राजदूतांना विशेष सवलती दिल्या जातात. तशाच प्रकारच्या सवलती यावेळी दिल्या जातील."
 
वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलेले अनिल त्रिगूणयात बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "राष्ट्राचे प्रमुख, सरकार आणि राजदूतांना विशेषाधिकार देण्यात येतात. जेणेकरून त्यांना आपलं कर्तव्य बजावता येईल आणि अधिकृत संवाद पार पाडता येतील."
 
त्यांनी पुढे सांगितलं, "कोरोनाकाळ सर्वांसाठीच नवीन आहे. विविध देश एकसमान मानकं विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. याचदरम्यान, राजकीय संवाद सुलभ करण्यासाठी यजमान देश आपल्या इमिग्रेशन प्रक्रियेत सुधारणा करू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीसाठी असं केलं जातं."
 
मोदींना जाता आलं पण आमचं काय?
मुंबईत रहाणाऱ्या निता परब (नाव बदललेलं) यांना अमेरिकेतील वॉशिंगटन विद्यापिठात उच्चशिक्षणाची ऑफर आलीये.
 
निता यांनी कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले आहेत. त्या सांगतात, "मलाही कोव्हॅक्सिन लशीचा डोस मिळाला. जानेवारीमध्ये अमेरिकेत पोहोचायचं आहे. पण, कोव्हॅक्सिनला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेची किंवा यूएस एफडीएची मान्यता नाही."
 
कोव्हॅक्सिनला मान्यता नसल्याने "अमेरिकेत परवानगी मिळेल का? प्रवेश देण्यात येईल?" हा प्रश्न त्यांना सतावतोय.
 
अशीच अवस्था भारतातील अनेक लोकांची आहे. ज्यांनी कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत.
 
अमेरिका प्रवास निर्बंध शिथिल करणार?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यापासून भारतासोबत जगभरातील 33 देशातील लसीकरण झालेल्या नागरिकांसाठी अमेरिकेत प्रवास सुरू करण्याची मुभा देण्यात येणार आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसने सोमवारी दिली आहे.
 
कोरोनासंसर्गानंतर अमेरिकेने प्रवासावर निर्बंध घातले होते. अत्यावश्यक आणि आपात्कालीन परिस्थिती, विद्यार्थी किंवा महत्त्वाच्या कामांसाठीच अमेरिकेकडून फार कमी संख्येने प्रवासासाठी व्हिसा देण्यात येत होता.
 
सद्यस्थितीत परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या नागरिकांना प्रवासाच्या तीन दिवसातील निगेटिव्ह कोरोना चाचणी रिपोर्ट किंवा 90 दिवसात कोरोनातून बरं झाल्याचं प्रमाणपत्र दाखवणं अनिवार्य आहे. प्रत्येक प्रवासी हा वेगळा आहे, असं अमेरिकेच्या सरकारचं म्हणणं आहे.
 
कोव्हॅक्सिनचं घोडं कुठे अडलंय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, 'कोव्हॅक्सिन' निर्मात्यांचा लशीच्या मंजूरीसाठी अर्ज मिळाला आहे. मात्र, लस निर्मात्यांकडून अधिक माहितीची गरज आहे.
 
कोव्हॅक्सिनला मान्यता केव्हा मिळेल? या प्रश्नावर प्रसारमाध्यमांना जून महिन्यात माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या होत्या, "भारत बायोटेकसोबत चर्चा सुरू आहे. लशीच्या मान्यतेसाठी डोसिअर द्यावं लागतं. ज्यात, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम आणि लस निर्मितीची माहिती असते."
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनच्या निर्मात्यांकडून क्लिनिकल ट्रायलची संपूर्ण माहिती मागिवली आहे.
 
कोव्हॅक्सिनच्या आपात्कालीन वापराच्या परवानगीसाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेची बैठक होण्याची शक्यता आहे.
 
कोव्हॅक्सिनच्या मान्यतेबाबत विचारलेल्या प्रश्नावर भारत बायोटेकने 17 सप्टेंबरला प्रतिक्रिया दिली होती. भारत बायोटेकच्या माहितीनुसार, "जुलै महिन्यात कोव्हॅक्सिनच्या आपात्कालीन वापरासाठी सर्व क्लिनिकल ट्रायल डेटा जागतिक आरोग्य संघटनेकडे सूपूर्द करण्यात आलाय."
 
कंपनीच्या माहितीनुसार, "जागतिक आरोग्य संघटनेने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेचा वाट पहात आहोत. पण लशीला मान्यला केव्हा मिळेल याबाबत अंदाज लावणं योग्य ठरणार नाही."