गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (18:03 IST)

प्रताप सरनाईकांना दणका, ईडीने जप्त केलेली संपत्ती परत मिळणार नाही

pratap sainaik
एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांची मार्च 2022 मध्ये सक्तवसुली संचलनालयाकडून 11.4 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात प्रताप सरनाईकांनी अपील न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती.
 
पण संपत्तीच्या जप्तीचा निर्णय योग्यच असल्याचे न्यायाधिकरणाने सांगितले आहे, ही माहिती ईडीच्या सूत्रांनी बीबीसी मराठीला दिली.
 
ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती.
 
पुढे झालेल्या घटनाक्रमात एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि प्रताप सरनाईक हे शिंदेंसोबत गेले. ते शिंदेंसोबत गेल्यानंतर त्यांच्यावरील ईडीची कारवाई कशी थांबली असा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या गटाकडील नेते सातत्याने विचारत होते.
 
या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई झाली आहे.
 
ईडीने 11.4 कोटींची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय दिला होता, तो योग्य आहे असे निर्वाळा न्यायाधिकरणाने दिला आहे.
 
मार्चमध्ये ईडीने त्यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोडमधील जमिनीचे जप्त केले होते. या कारवाईविरोधात सरनाईक यांनी न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती.
 
मात्र, ईडीची जप्तीची कारवाई योग्य असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यानंतर आता जप्त केलेली संपत्ती ईडीच्याच ताब्यात राहणार आहे.
 
2016 मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीआधारे आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी एनएसईएल प्रकरणात त्याचे संचालक आणि एनएसईएलचे प्रमुख अधिकारी एनएसईएलचे 25 जण आणि इतरांवर मनी लाँड्रिंग तपास सुरू केला होता.
 
आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचला, त्यांना नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (NSEL) च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले आणि बोगस वेअरहाऊस पावत्यांसारखी बनावट कागदपत्रे तयार केली, बनावट खाती तयार केली, असे आरोप या प्रकरणात करण्यात आले आहेत.
 
आस्था ग्रुपने 21.74 कोटी रूपये विहंग आस्था हाऊसिंगमध्ये ट्रान्सफर केले होते. यातील 11.35 कोटी रूपये विंहग एंटरप्रायझेस आणि विहंग इम्फ्रा या कंपन्यांना देण्यात आले होते असं ईडीचं म्हणणं आहे. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक यांच्या नियंत्रणात आहेत.
 
कोण आहेत प्रताप सरनाईक?
आधी ठाण्यातील बांधकाम व्यवसायात नाव कमावलेल्या प्रताप सरनाईक यांनी 1997 साली राजकारणात प्रवेश केला.
 
1997 सालच्या ठाणे महापालिका निवडणुकीत ते विजय होऊन पहिल्यांदा नगरसेवक झाले.
 
ठाणे महापालिकेत ते सलग दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले.
 
मग 2008 साली प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते ठाण्यातील ओवळा-माजीवडा मतदारसंघातून आमदारही झाले. याच मतदारसंघातून ते सलग तीनवेळा म्हणजे 2009, 2014 आणि 2019 साली आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले.
 
प्रताप सरनाईक हे आता ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि तिथूनच विधानसभेत प्रतिनिधित्व करत असले, तरी ते मूळचे ठाण्याचे नाहीत.
 
प्रताप सरनाईक यांचा जन्म 1964 साली वर्धा जिल्ह्यात इंदिराबाई आणि बाबुराव सरनाईक यांच्या पोटी झाला. मग हे कुटुंब मुंबईतील दादरमध्ये स्थलांतरित झालं. तिथून मग ते ठाण्यात स्थलांतरीत झालं.
 
आचार्य अत्रेंचे सहकारी बाबूराव सरनाईकांचा मुलगा
तुम्हाला इथं एक गोष्ट थोडीशी कुतुहलजनक वाटली असेल, ती म्हणजे 'बाबूराव सरनाईक.'
 
हो, तेच बाबूराव सरनाईक आहेत, जे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे सहकारी होते.
 
बाबूराव सरनाईक यांनी आचार्य अत्रेंच्या 'दैनिक मराठा'मध्ये मुख्य मुद्रितशोधक म्हणून काम केलं होतं. अत्रेंवरील त्यांचं 'तो एक तळपता सूर्य' हे पुस्तक खूप गाजलं.
 
'बाबूजी' या टोपणनावाने सर्वांना परिचित असणाऱ्या बाबूराव सरनाईक यांनी काही मराठी पुस्तकांचं लेखन केले. 'हा कुंभ अमृताचा', 'तो एक सूर्य होता', 'कोरांटीची फुले', 'ज्योतिषशास्त्र एक दिव्य दृष्टी', 'स्वप्न साक्षात्कार' ही पुस्तकं बाबूराव सरनाईकांच्या नावे आहेत. 2017 साली त्यांचं निधन झालं.
 
एक मुलगा नगरसेवक, दुसरा मुलगा MCA सदस्य, पत्नी नगरसेविका
बाबूराव सरनाईक यांना तीन मुलं, प्रताप सरनाईक आणि विलास सरनाईक, तर प्रतिभा सरनाईक ही मुलगी. यांपैकी प्रताप सरनाईक यांचं कुटुंब राजकारणात आहे.
 
कुटुंब राजकारणात म्हणजे काय, तर स्वत: प्रताप सरनाईक आमदार आहेत, पत्नी परिषा सरनाईक या नगरसेविका, तर दोन्ही मुले विहंग आणि पूर्वेश हे राजकारणात सक्रीय आहेत.
 
पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आणि नगरसेवक आहेत, तर विहंग सरनाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत.
 
प्रताप सरनाईक यांच्या राजकारणाप्रमाणेच त्यांच्या व्यावसायिक कामांची सुद्धा नेहमी चर्चा होत राहते. बांधकाम क्षेत्रातील त्यांची कामगिरी नेहमीच चर्चेत असते. बांधकाम आणि हॉटेलिंग क्षेत्रातील 'विहंग ग्रुप ऑफ कंपनी'चे प्रताप सरनाईक हे अध्यक्ष आहेत.
 
तसंच, संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन ते करतात. यातील दहीहंडीचं आयोजन अनेकांना परिचितही आहे.
 
'मातोश्री'वर होती थेट पोहोच
दैनिक लोकमतचे ठाणे ब्यूरो चीफ नारायण जाधव सांगतात, "प्रताप सरनाईक हे मूळचे ठाण्याचे नसले तरी त्यांनी आता आपली जागा निर्माण केलीय. दोन-अडीच दशकांहून अधिक काळ ते ठाण्यातील राजकारणात सक्रीय सुद्धा आहेत."
 
"राष्ट्रवादीत असताना अजित पवार यांच्या जवळचे होते, तसे आता ते उद्धव ठाकरे यांच्याही जवळचे आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद राखून असतात. या सर्व गोष्टींचा त्यांना त्यांच्या राजकीय वाटचालीत फायदाच झालाय."
 
"व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या प्रताप सरनाईक यांनी राजकारणात आल्यापासून आजवर मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या राजकीय वाटचालीवर नजर टाकल्यास लक्षात येतं की, त्यांच्या पदांचा आलेख कायमच चढता राहिलाय," असंही नारायण जाधव सांगतात.
 
ठाण्यातील सर्व नेत्यांशी ते मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असतात. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतची त्यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे.
 
राष्ट्रवादीत असताना प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांना दिलेल्या हिरेजडित मोबाईल भेटीचीही खूप चर्चा झाली होती.
 
अजित पवारांना हिरेजडित मोबाईल गिफ्ट
2008 साली राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याआधी प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांना तब्बल 15 लाख 55 हजार 555 रुपयांचा हिरेजडित मोबाईल भेट दिला होता.
 
अज्ञात भाविकाने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात हा हिरेजडित मोबाईल दान केला होता. मंदिराच्या विश्वस्तांनी या मोबाईलचा लिलाव केला. त्यावेळी ठाण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या प्रताप सरनाईक यांनी तो मोबाईल खरेदी केला आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांना भेट दिला होता.
 
मात्र, पुढे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुन्हा तो मोबाईल सिद्धिविनायक मंदिराकडे सुपूर्द केला. त्यावेळी या सर्व घटनाक्रमाची प्रचंड चर्चाही झाली होती.
 
'पहिल्यांदाच सरनाईक चौकशीच्या फेऱ्यात'
"प्रताप सरनाईक यांची राजकीय कारकीर्द वीस-पंचवीस वर्षांची आहे. या काळात त्यांची अशाप्रकारे चौकशी कधीच झाली नाही. त्यामुळे ईडीच्या निमित्ताने त्यांना पहिल्यांदाच चौकशीला सामोरं जावं लागतंय," असं वरिष्ठ पत्रकार रवी मांजरेकर सांगतात. राजकारणात येण्याच्या आधीपासूनच ते व्यवसायात होते आणि ते जगजाहीर होतं, त्यामुळे त्याबाबत कुणी आक्षेपही घेतले नाही, असं मांजरेकर म्हणतात.

Published By -Smita Joshi