शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (16:39 IST)

सातारा बलात्कार : गर्भवती तरुणीची घरातच प्रसूती, बाळाला परस्पर दिलं दत्तक

- स्वाती पाटील
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत कसून चौकशी सुरू केली आहे.
 
धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर बाळाला परस्पर मुंबई येथे दत्तक दिल्याची माहिती समोर आली आहे.
 
दरम्यान, या प्रकरणी 13 लोकांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
 
"बलात्कार प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीची प्रसुती झाल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चौकशी केली असता महाबळेश्वर इथल्या एका 17 वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडल्याचं पोलिसांना कळालं," असं साताऱ्याचे एसपी अजय कुमार बंसल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
त्यांनी पुढे सांगितलं, "पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः पुढाकार घेत तपास सुरू केला. पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवत सामाजिक कार्यकर्त्या महिलांची मदत घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. याप्रकरणी अधिक तपास केला असता काही आरोपींची नाव समोर आली. त्यानंतर पोक्सो आणि बलात्काराच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला."
 
या प्रकरणी दोन लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती एसपी बन्सल यांनी दिली. पीडित मुलीची तसंच अटक केलेल्या संशयितांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 
बलात्काराच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या बाळाला मुंबईत परस्पर दत्तक दिल्याचं पोलिसांना कळलं आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
 
दरम्यान, CWC म्हणजेच बाल कल्याण समितीच्या परवानगी शिवाय कुणालाही अशापद्धतीनं बेकायदेशीरपणे दत्तक घेता येत नाही. त्यामुळं juvenile justice act 2015 या कायद्यानुसार या प्रकरणात सहभागी लोकांवर तसंच संशयितांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असं बन्सल यांनी सांगितलं.
 
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये महाबळेश्वर येथील स्थानिक शिवसेना नेत्याच्या दोन मुलांचा देखील समावेश आहे. महाबळेश्वर इथं राहणारे सागर उर्फ आबा गायकवाड आणि आशुतोष बिरामणे याना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी या प्रकरणात या अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या बाळाला बेकायदेशीररीत्या दत्तक दिल्य प्रकरणी सहभागी असलेल्या आणखी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा एकूण 13 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
यामध्ये महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांचे दोन पुत्र सनी उर्फ सात्विक बावळेकर आणि योगेश बावळेकर यांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळाल्यानं महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.
 
याप्रकरणी आबा उर्फ सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे या मुख्य संशयित आरोपींसह सनी बावळेकर, आनंद चौरासिया, सुनील चौरासिया, पूनम चौरासिया, सुनीता कदम, संजय कुमार जंगन, योगेश बावळेकर, मंजूर रफिक नालबंद आणि अनुभव कमलेश पांडे या अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 13 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
पीडित मुलगी बलात्कार प्रकरणातून गर्भवती राहिल्याचे समजल्यानंतर गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपींपैकी एका महिलेनं या मुलीची आपल्या घरीच प्रसूती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर परस्पर दत्तक घेणाऱ्या कुटुंबाचा शोध घेत संशयित आरोपींनी नवजात बाळाला दत्तक दिले.
 
पोलिसांना तपासादरम्यान नवजात बाळाला मुंबई येथील चौरसिया कुटुंबियांना दत्तक दिल्याचं समजलं. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता सातव्या महिन्यात जन्माला आलेल्या नवजात बाळाला मुंबईत मालाड येथे उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुख्य दोन संशयित आरोपींसह इतर 11 संशयित आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.