शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (18:28 IST)

सावरकरांनी गांधीजींच्या सांगण्यावरून माफी मागितली- राजनाथ सिंह यांच्या विधानावरून वाद

विनायक दामोदर सावरकर यांनी मागितलेल्या माफीचं प्रकरण एका विशिष्ट वर्गाने चुकीच्या पद्धतीने पसरवलं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. तुरुंगात शिक्षा भोगत असताना सावरकरांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून माफी मागितली होती, असा दावा राजनाथ सिंह यांनी केलाय.
 
राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादांना सुरुवात झालीय. अनेक नेते, इतिहास तज्ज्ञ आणि पत्रकार याविषयी मतं मांडत आहेत.
 
उदय माहूरकर आणि चिरायु पंडित यांनी लिहीलेल्या 'वीर सावरकर हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन' या पुस्तकाच्या दिल्लीत झालेल्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये बोलताना राजनाथ सिंह यांनी हे विधान केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राजनाथ सिंह म्हणाले, "सावरकरांविषयीच्या खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या. त्यांनी इंग्रजांसमोर वारंवार माफीनामा दिल्याचं सांगण्यात आलं. पण सत्य हे आहे की त्यांनी स्वतःला माफी मिळावी म्हणून क्षमा याचिका दाखल केली नव्हती तर त्यांनी अशी याचिका दाखल करावी असं महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं होतं. महात्मा गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी क्षमा याचिका दाखल केली होती."
 
"सावरकरांना सोडण्यात यावं, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण आंदोलन करतोय त्याप्रमाणे सावरकरांसाठीही आंदोलन करण्यात यावं, असं आवाहन महात्मा गांधींनीही केलं होतं. पण सावरकरांनी माफी मागितली, आपल्या सुटकेची याचिका केल्याच्या गोष्टी निराधार असून त्यांना बदनाम करण्यासाठी पसरवल्या जात आहेत."
"वीर सावरकर महानायक होते आणि यापुढेही राहतील. इंग्रजांनी त्यांना दोनदा आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली यावरूनच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची प्रबळ इच्छाशक्ती दिसते. काही विशिष्ट विचारसरणीचे लोक अशा राष्ट्रवादी पुरुषाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत."
 
"सावरकर नाझीवाद, फॅसिस्ट होते असा आरोप करतात. पण प्रत्यक्षात असा आरोप करणारे लोक लेनिनवादी, मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव असणारे होते आणि आजही आहेत."
 
याच कार्यक्रमाला हजर असणारे संघ प्रमुख मोहन भागवत म्हणाले, "स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच वीर सावकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली. आता यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद यांना बदनाम करण्याचाही प्रयत्न होईल. कारण सावरकरांवर या तिघांच्या विचारांचा प्रभाव होता."
 
"सावरकरांचं हिंदुत्व, विवेकानंदांचं हिंदुत्व असं बोलण्याची सध्या फॅशन आहे. हिंदुत्व एकच आहे, आणि ते पूर्वीपासून होतं आणि शेवटपर्यंत तसंच राहील."
 
'भाजप सरकार सावरकरांना राष्ट्रपित्याचा दर्जा देणार नाही का?'
राजनाथ सिंह यांनी केलेल्या दाव्याविषयी प्रतिक्रिया देताना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "इतिहासाची मोडतोड करून हे लोक तो मांडत आहेत. एक दिवस हे लोक महात्मा गांधींचा राष्ट्रपित्याचा मान काढून सावरकरांना तो दर्जा देतील. गांधीहत्येमध्ये सावरकरांचाही सहभाग असल्याचं न्यायाधीश जीवन लाल कपूर यांच्या तपासात आढळलं होतं."
महात्मा गांधींनी सावरकरांना लिहीलेल्या पत्राविषयी ओवैसी यांनी ट्वीट केलंय. ओवैसींनी लिहीलंय, "सर राजनाथ सिंह, हे आहे गांधीजींनी सावरकरांना लिहिलेलं पत्र आणि इंग्रजांची माफी मागण्याचा यात कुठेही उल्लेख नाही."
राजनाथ सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यावरच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
आधुनिक राजकारणाच्या इतिहासाचे जाणकार सैय्यद इरफान हबीब ट्वीटमध्ये म्हणतात, "हो, इतिहास एकांगी सादर केला जातोय आणि गांधींनी सावरकरांना माफीनामा लिहायला सांगितल्याचा दावा करणारे मंत्री याचं नेतृत्त्व करताय. किमान त्यांनी माफीनामा लिहिला होता, हे तरी त्यांनी स्वीकार केलंय. जेव्हा मंत्री दावा करतात तेव्हा त्यांना कागदोपत्री पुराव्याची गरज नसते. नवीन भारतासाठी नवा इतिहास."
महाराष्ट्र सरकारमधले मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी ट्वीट केलंय, "इतिहास, इतिहासच राहील. भाजपचे महानायक असणाऱ्या सावरकरांनी इंग्रजांना एक-दोन नाही तर 6 क्षमा याचिका (1911,1913,1914,1915,1918 आणि 1920) लिहिल्या होत्या. याद्वारे ते माफीची याचना करत होते."
पत्रकार सागरिका घोष लिहितात, "सावकरांची प्रतिमा साफ करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याविषयीची मतं बदलता येणार नाहीत. RSS सांगत असलेला इतिहास खरा नाही."
9 वर्षांत 6 माफीपत्रं
सावरकर कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनसंघाचे सदस्य नव्हते. पण तरीही संघ परिवारात सावरकरांचं नाव आदराने घेतलं जातं.
 
भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान - भारतरत्न सावरकरांना देण्यात यावा असा प्रस्ताव 2000 साली वाजपेयी सरकारने तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्याकडे पाठवला होता. पण नारायणन यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
 
सावरकरांना पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांच्या राजकीय विचारांमुळे काढून टाकण्यात आलं होतं. 1910साली त्यांना नाशिकच्या कलेक्टरच्या हत्येमध्ये हात असल्याच्या आरोपाखाली लंडनमधून अटक करण्यात आली.
 
सावरकरांविषयी संशोधन करणारे निरंजन टकले सांगतात, "1910मध्ये नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येच्या आरोपाखाली आधी सावरकरांच्या भावाला अटक करण्यात आली होती. भावाला लंडनहून एक पिस्तुल पाठवल्याचा सावरकरांवर आरोप होता. याच पिस्तुलाचा वापर हत्येसाठी करण्यात आला होता. एम. एस. मौर्य नावाच्या एका जहाजावरून सावरकरांना भारतात आणण्यात येत होतं. हे जहाज फ्रान्सच्या मार्से बंदरावर थांबलेलं असताना सावरकरांनी जहाजाच्या शौचालयाच्या 'पोर्ट होल' मधून समुद्रात उडी मारली."
 
पुढची 25 वर्षं सावरकर कोणत्या न कोणत्या प्रकारे इंग्रजांच्या कैदेत होते.
 
निरंजन टकले सांगतात, "सावरकरांच्या आयुष्याकडे मी अनेक टप्प्यांमध्ये पाहतो. त्यांच्या आयुष्याचा पहिला टप्पा हा रोमँटिक क्रांतिकारकाचा होता. या काळात त्यांनी 1857च्या लढाईवर पुस्तक लिहिलं. यात त्यांनी अतिशय चांगल्या शब्दांत धर्मनिरपेक्षतेविषयी लिहिलं होतं."
 
"अटक झाल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष परिस्थितीशी सामना झाला. 11 जुलै 1911ला सावरकर अंदमानला पोहोचले आणि तिथे पोचल्याच्या दीड महिन्यातच 29 ऑगस्टला त्यांनी इंग्रजांना पहिलं माफी पत्र लिहीलं. यानंतरच्या 9 वर्षांमध्ये त्यांनी 6 वेळा इंग्रजांना माफीनामा दिला."