रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (19:50 IST)

जयललितांच्या मृत्यूबद्दल 'या' गोष्टी दडवल्या गेल्या, चौकशी समितीनं म्हटलं...

Jayalalitha
डिसेंबर 2016 मध्ये तामिळनाडूच्या तेव्हाच्या मुख्यमंत्री जे. जयललितांचा मृत्यू झाला. पण या मृत्यूनंतरच्या काही गोष्टी जयललितांच्या सहकारी शशिकला यांनी लपवून ठेवल्या असा ठपका चौकशी आयोगाने ठेवलाय.
 
न्या. ए. अरुमुगास्वामी यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अपोलो हॉस्पिटलमधल्या डॉक्टरवरही आरोप ठेवला आहे. त्यांनी जयललिता यांचा अँजिओग्राम काढू दिला नसल्याचं चौकशी समितीनं म्हटलं आहे.
 
आपल्यावरील उपचारांबद्दल जयललिता यांचं काय म्हणणं होतं, शशिकला यांच्याव्यतिरिक्त इतर कोणाची चौकशी करणं गरजेचं आहे याबद्दल अहवालात भाष्य केलं आहे.
 
22 सप्टेंबर 2016 ला जयललितांना चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं गेलं. तब्बल अडीच महिने उपचार केल्यानंतर 5 डिसेंबर 2016 च्या रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा हॉस्पिटलने केली. त्या रात्री चेन्नईतच नाही तर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. अपोलो हॉस्पिटलबाहेर पाऊल ठेवायला जागा नव्हती.
 
पण पाठोपाठ त्यांच्या मृत्यूबद्दल काही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला कुजबूज आणि नंतर उघडपणे आरोप होऊ लागले. याची चौकशी करण्यासाठी न्या. ए. अरुमुगास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमला गेला होता.
 
सहा वर्षांनंतर, 18 ऑक्टोबर 2022 ला आयोगाने आपला अहवाल तामिळनाडूच्या विधानसभेत सादर केला आणि शशिकलांसह इतर 3 जणांची चौकशी करण्याची शिफारस केली.
 
या अहवालातून काही धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यात म्हटलंय, "हॉस्पिटलने जयललितांचा मृत्यू 5 डिसेंबरला रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी झाल्याचं म्हटलं पण प्रत्यक्षदर्शी म्हणतात की त्यांचा मृत्यू 4 डिसेंबर 2016 ला दुपारी 3 ते 3.50 वाजेच्या दरम्यान झाला होता."
 
जयललिता बेशुद्ध होत्या
ज्या दिवशी जलललितांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं त्या दिवशी त्यांना चक्कर आली होती. त्या बाथरूममधून आपल्या पलंगाकडे येत असताना त्यांना चक्कर आली. तेव्हा शशिकला आणि तिथे उपस्थित असलेल्या इतरांनी जललितांना आधार दिला. त्या हॉस्पिटलमध्ये आल्या तेव्हा बेशुद्ध होत्या. यानंतर काय घडलं हे शशिकला यांनी उघड केलं नाही.
 
जयललितांना तातडीने ऑक्सिजन लावण्यात आला होता. त्यांना अँब्युलन्समधून अपोलो हॉस्पिटलमध्ये आणून अॅडमिट केलं गेलं. प्राथमिक निदानानंतर त्यांना ICU मध्ये दाखल केलं तेव्हा त्या स्ट्रेचरवर होत्या आणि शुद्धीवर आल्या होत्या.
 
या अहवालात असंही म्हटलंय की जयललिता हॉस्पिटलमध्ये असताना खोल्यांमध्ये शशिकलांच्या नातेवाईकांचीच गर्दी जास्त होती. 2012 साली जेव्हा जयललिता आणि शशिकला पुन्हा एकत्र आल्या तेव्हापासूनच त्यांच्या नात्यात काहीसा तणाव होता.
 
अँजिओग्राफी का केली नाही?
अहवाल सांगतो की प्रत्यक्षदर्शींचं सांगणं आणि कागदपत्रांच्या आधारे असं दिसतं की जयललितांना "स्थूलपणा, ताण, आटोक्यात नसलेला मधुमेह, हायपोथायरॉइडिझम, तीव्र अतिसारासह इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आणि जुना ब्राँकायटिस असे त्रास होते तसंच त्यांना 5 ते 7 दिवस जुलाबांचा त्रास होत होता. त्यांच्यावर मूत्रमार्गाचं इन्फेक्शन तसंच एटॉपिक डर्मटायटिससाठी उपचार सुरू होते."
 
ब्रिटीश डॉक्टर रिचर्ड बील, अमेरिकन डॉक्टर स्टुअर्ट रसेल आणि डॉ. समीन शर्मा यांनी अँजिओग्राम करण्याच्या सूचना केल्या होत्या. पण अखेरपर्यंत त्यांची अँजिओग्राफी का केली गेली नाही असंही या अहवालात विचारलं गेलं आहे.
 
शशिकला यांच्या चौकशीची शिफारस
जयललिता यांच्या सहकारी व्ही. के. शशिकला, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर के. एस. शिवकुमार, राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर तसंच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव जे. राधाकृष्णन यांची चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
 
अपोलो हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रताप रेड्डींची चौकशी करावी का, याबद्दल राज्य सरकारने निर्णय घ्यावा हे असंही आयोगाने म्हटलं आहे.
 
जयललिता हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना कधीही डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, असं सांगणारा जो रिपोर्ट प्रकाशित केला गेला तोही खोटा होता, असं अहवालात म्हटलं आहे.
 
जयललिता- शशिकला एकमेकींच्या संपर्कात कशा आल्या?
एमजी रामचंद्रन मुख्यमंत्री असताना जयललिता पक्षाच्या प्रचार सचिव होत्या. त्यावेळी पहिल्यांदा शशिकला आणि जयललिता एकमेकांच्या संपर्कात आल्या.
 
सरकारमध्ये जनसंपर्क अधिकारी असलेले शशिकला यांचे पती एम. नटराजन यांनी प्रशासकीय अधिकारी चंद्रलेखा यांच्या मदतीने शशिकला यांची भेट जयललिता यांच्याशी केली.
 
एमजीआर यांच्या मृत्यूनंतर जयललिता यांना पक्षात डावलण्यात आलं त्यावेळी शशिकला आणि जयललित यांची जवळीक वाढली. काही काळातच जयललिता यांच्यासोबत राहण्यासाठी शशिकला त्यांच्या पोएस गार्डनमधल्या वेदनिलायम या बंगल्यात गेल्या.
 
शशिकला यांच्यासोबत त्यांची बहीण आणि मुलंही राहण्यासाठी गेले. शशिकला यांच्या एका भाच्याला जयललिता यांनी दत्तक घेतलं.
 
दत्तक घेतलेल्या याच मुलाच्या भव्यदिव्य लग्नामुळे जयललिता यांच्या संपत्तीवर आयकर विभाग आणि माध्यमांचं लक्ष गेलं.
 
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात जयललिता यांच्यावर 1991-96 दरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेव्हा त्या मुख्यमंत्री होत्या. निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांना घर सोडावं लागलं.
 
काही काळानंतर शशिकला पुन्हा जयललिता यांच्या घरी परतल्या पण परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही.
 
2011 मध्ये जयललिता यांनी शशिकला यांची आपल्या घरातून हकालपट्टी केली. शशिकला यांचे नातेवाईक पक्ष आपल्या हातात घेण्याचा कट रचत असल्याचा संशय जयललिता यांना होता. पण तरीही जयललिता यांच्यानंतर शशिकला यांनाच पक्षाच्या क्रमांक दोनच्या नेत्या मानलं जात होतं.
 
पक्षाची धोरणं आणि संवाद कौशल्य यामुळे शशिकला यांची ताकद पक्षात वाढत गेली.
 
कालांतराने शशिकला यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी 2017 मध्ये न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली.

Published By -Smita Joshi