Last Modified: शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (17:28 IST)
आयटी उद्योगांनी केले बजेटचे स्वागत
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी (आयटी) सातत्याने होणारी वाढ पाहून या क्षेत्रासाठी आगामी वर्षांत जवळपास १ हजार ६८० कोटी रूपये देण्यात आले आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रात याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे.
ग्रामीण भागात एक लाख ब्रॉडबॅंड इंटरनेट आधारीत सेवा केंद्रांची स्थापना करण्यासाठी एक योजना सुरू करण्यात येणार असून केंद्राच्या सहाय्याने राज्यव्यापी नेटवर्कचीही (स्वान) स्थापना करण्यात येणार आहे. याचे सर्व आयटी उद्योगांनी स्वागत केले आहे. या उद्योगातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया अशाः
पंकज जैन (अध्यक्ष व सीओओ वेबदुनिया.कॉम)- एक लाख इंटरनेट एनेबल्ड कॉमस सर्व्हिस सेंटर्स आणि राज्यव्यापी नेटवर्क (स्वान) माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. पण तरीही तंत्रज्ञानापासून दूर राहिलेल्या एक अब्ज लोकांच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत 'आयटी' पोहोचविण्यासाठी दरवर्षी हा आकडा किमान पाचपट असावा अशी अपेक्षा पंकज जैन यांनी व्यक्त केली.
प्रदीप गुहा ( अध्यक्ष- सायबर मीडीया)- ज्ञानाधारीत समाजाची निर्मिती करण्यासाठी सरकारने योजलेले उपाय स्वागतार्ह आहेत. त्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय जसे तीन नव्या आयआयटी, संशोधनासाठी शिष्यवृत्ती, विद्यापीठे जोडण्यासाठी नॅशनल नॉलेज नेटवर्क उभारणे, या बाबी नक्कीच स्वागत करण्यासारख्या आहेत.
कपिल देव ( काऊंटी मॅनेजर, आयडीसी इंडिया)- शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला अधिकाधिक निधी देणे आणि नव्या राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरवात यांच्या माध्यमातून देशाच्या विकासात हातभार लावणार्या ज्ञानाधारीत उद्योगांसाठी एक सकारात्मक संदेश दिला गेला आहे.
असोक के. लाहा ( व्यवस्थापकीय संचालक आणि मुक्य गुणवत्ता अधिकारी, इंटरल आयटी, नॉयडा)- अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्याचे संकेत देऊन हा प्रकल्प आपल्या हातात घेतला आहे. या कार्यात त्यांना साथ देण्यासाठी ज्ञानाधारीत उद्योग कटिबद्ध आहेत.