सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 मे 2020 (18:20 IST)

कोरोना लॉकडाऊन : डिजिटल शाळांचा पर्याय किती व्यवहार्य?

रोहन नामजोशी
लॉकडाऊनमुळे समाजव्यवस्थेत मोठे बदल पहायला मिळत आहेत. खरंतर संपूर्ण जगातच जगण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले. दैनंदिन गोष्टीतही मोठे बदल पहायला मिळत आहेत. डिजिटल शाळा हा त्यापैकीच एक.
 
शाळा म्हटलं की, युनिफॉर्म घालून, बसची वाट पाहत, किंचित कंटाळलेल्या चेहऱ्यांनी जाणारे लहान मुलं दिसतात. तीच मुलं आता लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर बसलेले दिसतात.
 
त्याचे फोटो सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून फिरत आहेत. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही ही व्यवस्था नवीन आहे. पण याची खरंच गरज आहे का? किती दिवस हे चालणार? त्यामुळे शिक्षणाचं डिजिटायजेशन व्हायला मदत होईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.
 
डिजिटल शाळा भरते कशी?
डिजिटल शाळेचे अनेक प्रकार आहेत. मुख्यत: शाळेचं काम हे झूम या अॅपवरून चालतं. त्याच्या सोबतीला व्ह़ॉट्स अॅप, इमेल, विविध अॅप या सोयी आहेतच. केशव शिंदे सोलापूरमध्ये सुयश गुरुकुल नावाची संस्था चालवतात. पहिली ते बारावी असलेली ही शाळा सध्या डिजिटल स्वरुपात गेली आहे. सध्या या शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग झूमवर सुरू असतात.
 
याबद्दल माहिती देताना त्यांनी म्हटलं, "या संकटाच्या काळात शाळा कशी चालवायची याची आम्ही फार तयारी केली नव्हती आम्ही झूम डाऊनलोड केलं. गुगल मीटिंग ट्राय केलं. एक महिना झाला आता. 22 मार्चपासून आम्ही ही शाळा सुरू केली. त्यात बारावी NEET, च्या विद्यार्थ्यांना शिकवलं. आमच्या शिक्षकांनाही फारशी माहिती नव्हती.
 
ही परिस्थिती किती काळ राहील याची कल्पना नाही त्यामुळे आम्ही आमच्या शिक्षकांना उत्तम ऑनलाईन शिक्षक होण्याचं आवाहन केलं. आम्ही बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. ज्याच्याकडे लॅपटॉप आहे त्यांच्यावरून स्क्रीन शेअर कशी करायची हे आम्ही शिकलो. तसंच गुगल बोर्डचा वापर शिकून घेतला. त्यामुळे नोट्स लिहायला मदत झाली. त्याचा फायदा झाला. ऑनलाईनची खरंतर गरजच नाही. फक्त नीटला बसणाऱ्यांचा हा प्रश्न आहे. मुलांना स्क्रीन मोठी पाहिजे. मुलं बोलत नाही. व्हीडिओ ऑफ करतात. बोला म्हटलं तरी बोलत नाही. सारखं त्यांना आवाज येतो का हे विचारण्यात वेळ जातो. टीव्हीवरून ही सगळी व्यवस्था फार उत्तम होऊ शकते."
 
"आम्ही दहा मिनिटांचा व्हीडिओ करतो. त्याचाही मुलांना फायदा होतो. दिवसातून पाच ते सहा तास शाळा असते. त्यात दहा पंधरा मिनिटं ब्रेक असतो. सकाळी आठ ते एक आणि मोठ्या वर्गाला 3 ते सात अशी वेळ असते. प्रत्येक तास 35 मिनिटांचा असतो.आता पाचवीपासूनच्या वर्गाला आम्ही शनिवार रविवार शाळा सुरू करण्याचा विचार आहे. व्हॉट्स अपचा वापरही आम्ही विपुल प्रमाणात करतो. तरी हवं तसं मनासारखं अजून झालेलं नाही. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत," ते पुढे सांगतात.
 
मुंबईतील एका रायन इंटरनॅशनल शाळेतील शिक्षिका हेमलता सुरवाडे यांनीही या पद्धतीची माहिती दिली. त्यांच्यामते त्यांच्या शाळेनी ही पद्धत चांगली राबवली आहे. त्यांच्या शाळेचं एक अॅप आहे ते झुमच्या सहाय्याने चालतं. एका वेळेला 30 मुलं असतात. एक तासिका 30 मिनिटांची असते. त्यात दहा मिनिटांची विश्रांती असते. अगदी बालवाडीपासून दहावीच्या मुलांचे वर्ग इथे भरतात.
 
तिथे पालकांना व्हीडिओ सुरू ठेवायला सांगितलं जातं त्यामुळे मुलं आहेत की नाही हे लगेच कळतं. मुलांनी चुळबूळ केली की त्यांना लगेच सांगता येतं. एकाच वेळेला अनेकांनी बोलू नये म्हणून शिक्षकच सगळ्यांना म्यूट करतात प्रश्न विचारलं की अनम्युट केलं जातं. त्यामुळे गोंधळ होत नाही. इतकंच काय तर प्रार्थनासुद्धा तिथे होते असं त्या म्हणाल्या.
 
मुलं व्यवस्थित बसतात. शिकण्याचीही नवीन पद्धत मुलांना आवडते आहे. सुरवाडे यांचा मुलगाही डिजिटल शाळेत जातो. त्यामुळे शिक्षक आणि पालक म्हणून त्यांना डिजिटल शाळेची चांगलीच ओळख झाली आहे.
 
पालकांना काय वाटतं?
पालकांना ही पद्धत आवडते आहे. पण ही कायमस्वरुपी व्यवस्था होऊ शकत नाही असं बहुतांशी पालकांचं मत आहे.
 
पुण्यातील प्राची कुलकर्णी-गरुड यांची मुलगी पहिलीत आहे. त्यांच्या मते आतापर्यंत शाळेत शिक्षक कसं शिकवतात हे कळायला फारसा मार्ग नव्हता. पण आता शिक्षकांची शिकवण्याची पद्धतही त्यांना घरबसल्या कळतेय.
 
त्याचा एक वेगळा फायदा आहे. मुलांना अशा पद्धतीने गुंतवून ठेवणं महत्त्वाचं असलं तरी शिक्षक आणि पालक यांच्यातला प्रत्यक्ष संवादही तितकाच महत्त्वाचा असल्याचं त्या नमूद करतात.
 
मुलांबरोबर पालकांचीही शाळा यानिमित्ताने होत असते. कारण लहान मुलं असले की त्यांच्या आसपास सतत रहावं लागतं. त्यांचं व्यवस्थित लक्ष आहे की नाही हे सतत पहावं लागतं. अनेकदा शिक्षक काहीतरी सांगत असतात आणि मुलं भलतंच काहीतरी करत असतात. त्यामुळे पालकांनाही सातत्याने लक्ष ठेवावं लागतं.
 
आशिष देवडे यांच्या मुलाची शाळा आता डिजिटल झाली आहे. त्या अनुभवाबद्दल ते सांगतात, "व्हीडिओ कॉल वर सर्वांना बघायची लहान मुलांमध्ये उत्सुकता असते. पण टीचर दिसणार म्हंटलं की, नको वाटत होतं मला. जसं शिक्षकांना हे प्रकरण सोपं नाही तसंच दोन तास मुलांना एकाच ठिकाणी बसवण्यासाठी पालकांनाही फार कसरत करावी लागते.
 
आधी तर या दिवसात बराच वेळ प्रत्येक मुलाचा टीव्ही समोर जायचा. आता त्यात भर लॅपटॉपची. पहिल्या दिवशी आम्ही लांबून बघत होतो. माझ्या मुलाबरोबरचे बाकीचे सुद्धा विद्यार्थी चक्क शाळा सुरू असताना झोपले होते."
 
कठीण समय येता..
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा हा काळ संकटाचा आहे. त्यात एप्रिल-मे महिना सुरू आहे. त्यामुळे इतक्या घाईने खरंच शाळा सुरू करायची गरज होती का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यात अनेक मुलांकडे लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट ही साधनं नाहीत. ग्रामीण भागात ही समस्या मोठी आहे. डिजिटल शाळांची गरज आहे का या प्रश्नावर तज्ज्ञ मिश्र प्रतिक्रिया नोंदवतात.
 
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यामते ही चांगली पद्धत आहे. पण फक्त पुस्तकी शिक्षण हा या शाळेचा उद्देश असता कामा नये. शिक्षणाबरोबरच विविध कला जोपासणे, काही वेगवेगळे उपक्रम, चांगले व्हीडिओज यांचाही या उपक्रमात समावेश करायला हवा असं त्यांना वाटतं.
 
त्यासाठी दूरदर्शन सारख्या वाहिन्यांशी शासनाने टायअप करून काही प्रबोधनपर गोष्टी दाखवाव्यात असं ते म्हणाले.
 
महाराष्ट्रातील मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांच्या मते डिजिटल पद्धतीने शाळा चालवणं एक प्रकारे फायदेशीर आहे.
 
गेल्या काही काळापासूनच शिक्षणाला तंत्रज्ञानाची, समाजमाध्यमांची जोड देण्याची सुरुवात झाली होती. प्रत्येक वर्गाचा व्हॉट्स अप ग्रुप असतो. त्याचे अॅ़डमिन त्या वर्गाचा वर्गशिक्षक असतो. तिथेच गृहपाठ, पालकांसाठी काही सूचना अशा प्रकारचा संवाद साधला जातो. या सगळ्या ग्रुपवर मुख्याध्यापकांचं नियंत्रण असतं.
 
कोरोनाच्या काळातही तोच कित्ता पुढे गिरवला. शिक्षणाबरोबरच काही चांगली व्याख्यानं, प्रबोधनपर चित्रपट यांच्या लिंक पालकांना पाठवल्या जातात. त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संवाद राहतो.
 
त्याचवेळी शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर मात्र डिजिटल शिक्षणपद्धतीबदद्ल मत व्यक्त करताना महाराष्ट्रात फक्त 20 टक्के विद्यार्थी स्मार्टफोनची सुविधा वापरू शकतात हे निरीक्षण नोंदवतात. अशा वेळी डिजिटल शिक्षणाचा अट्टाहास का असा प्रश्न ते विचारतात. ग्रामीण भागात ही अडचण खूप मोठी आहे. त्यामुळे आताच्या काळात त्याची गरज नव्हती असं त्यांचं मत आहे.
 
"सध्याच्या काळात डिजिटल, ऑनलाईन प्लेटफॉर्म्सला विरोध करणे योग्य होणार नाही. त्याची एक मर्यादा असली तरी ज्यांच्याकडे ग्याझेट्स आहेत त्यांच्यासाठी उपयुक्तता मोठी आहे. कोणकोणत्या गोष्टी ऑफलाइन करता येतील याचाही अत्यंत गंभीरपणे विचार करायला हवा.स्क्रीन टाइम जितका वाढेल तितके मुलांच्या मानसिक आरोग्यावर घातक परिणाम संभवतात काय? सर्वंकष विचार करुन एक नीट दिशा घ्यायला हवी. कारण पुढील काही काळ आपल्याला करोनासोबत जगायला लागणार आहे." असं ते म्हणतात.
 
शिक्षण हा एक मोठा कॅनव्हास आहे. सध्याचा काळ कठीण आहे. त्यामुळे डिजिटल शाळांचा अट्टाहास न धरता निरनिराळी पुस्तकं वाचणे, वेगवेगळे उपक्रम करणे, अशा गोष्टी कराव्यात आणि एकूणच ही पद्धत विचारपूर्वक राबवावी असा आग्रह ते धरतात.
 
स्क्रीनटाईमचं काय?
लहान मुलांनी मोबाईल, टॅब, लॅपटॉप हाताळावा की नाही याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. हाताळला तरी किती वेळ हाताळावा यावर अनेक लेख प्रसिद्ध झालेत. लहान मुलांना मोबाईल देऊ नये असं एक सर्वसाधारणपणे मतप्रवाह पहायला मिळतो. डिजिटल शाळेत नेमकं तेच होतं. कितीतरी वेळ मुलं त्यासमोर बसलेली असतात.
 
मनोविकारतज्ज्ञ अक्षता भट यांच्यामते डिजिटल शाळा चालवताना शिक्षक आणि पालकांनी भरपूर काळजी घेण्याची गरज आहे. मुलं लहान आहेत त्यांना काही समजत नाही अशा भ्रमात न राहण्याचा प्राथमिक सल्ला त्या देतात.
 
त्यांच्या मते शाळेची एक व्यवस्थित वेळ असावी. पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष द्यावं. दर अर्ध्या तासाने मुलांना डोळ्याचे व्यायाम करायला सांगायला हवेत. दुरवर दिसणारी झाडं पहावीत. त्यामुळे डोळ्याला त्रास होणार नाही. तसंच होमवर्क हाताने लिहायला प्रोत्साहन द्यावं. शिक्षणाच्या बाहेरही काही गोष्टी त्यांना करू द्याव्यात याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
 
तसंच मुलं ज्या लॅपटॉपवर शिकताहेत त्यावर सोशल मीडियाच्या अकाऊंट्सचे पासवर्ड, बँकेचे पासवर्ड नसावेत असं भट यांना वाटतं.
 
पाटी ते डिजिटल पाटी असा शिक्षणाचा प्रवास झाला आहे. त्यात अनेक मोठे बदल झालेत. शाळेत जाऊन शिक्षकांची भेट घेण्यापेक्षा पालक शिक्षकांना थेट फोन करून आपल्या पाल्याची प्रगती विचारताहेत.
 
व्हॉट्स अॅप च्या माध्यमातून शंकाचं निरसन होतंय हे बदल स्वागतार्ह आहेतच. पण शिक्षक- विद्यार्थी यांच्यातला थेट संवादही तितकाच महत्त्वाचा आहे. लॉकडाऊनच्या काळात डिजिटल शाळेची एक नवी पद्धत समाजाने अंगीकारली खरी. पण ती प्रत्यक्ष शाळेला पर्याय ठरेल का या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच ठरवेल.